Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

प्रादेशिक

लालबागच्या पुलाचे ‘पाडकाम’ सुरू
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

एमएमआरडीएने आजपासून लालबागचा पुल जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले. स्थानिकांना या कामामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून एमएमआरडीएने पुलाच्या पाडकामाला सुरुवात केली. हेवीडय़ुटी कटर, वायर सॉ, कॉम्बी क्रशर, पोक्लेन, जेसीबी, जनरेटर्स आदी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पूल पाडण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत पुलाचा सुमारे १५ टक्के भाग तोडल्याचे सूत्रांनी सांगितले.

पवनचक्क्यांसाठी दिलेली २४३ हेक्टर जमीन सरकारने टाकली वनपट्टय़ात!
मुंबई, ५ मे/प्रतिनिधी

पवनऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलेली धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्याच्या ब्राह्मणवेल गावातील २४३ हेक्टर जमीन ‘वनपट्टय़ात’ समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी एक रिट याचिका उच्च न्यायालयात केली गेली आहे.मुंबईत मुख्यालय असलेल्या के. पी. पॉवर प्रा. लि. या कंपनीने ही याचिका केली आहे.

लालबागच्या रस्त्यावर गणपती कारखान्यांना मनाई
मुंबई, ५ मे/प्रतिनिधी

लालबाग येथे गणेश टॉकिजच्या जवळ अमेय सोसायटी व हरहरवाला मॅन्शन या समोरासमोर असलेल्या इमारतींबाहेरचे फूटपाथ व रस्ता यावर गणपती कारखान्यांच्या शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने आज मनाई केली. या ठिकाणी गणपती कारखाने काढणाऱ्या मूर्तिकारांना अन्यत्र शेड बांधण्याची परवानगी देण्यापूर्वी महापालिकेने वाहतूक पोलीस, अग्निशमन दल व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

‘लोककलावंतांना विमा योजनेचा लाभ देण्याबाबत शासन विचार करणार’
मुंबई, ५ मे/प्रतिनिधी

लोककलावंतांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्याची अंमलबजावणी केल्यानंतर कलावंतांना मेडिक्लेमसारख्या योजनेचा तसेच विमा योजनेचा लाभ देण्याबाबत राज्य शासन विचार करील, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिले. तमाशा, लावणी, शाहिरी, खडीगंमत, दशावतार या लोककला प्रकारासाठी अनुदान देण्याची घोषणा गतवर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत १२४ कला पथकांना अनुदानाचे धनादेश देण्याचा समारंभ आज रविंद्र नाटय़मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठणठणीत
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतची अफवा आज संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरल्याने ‘मातोश्री’ वरचे दूरध्वनी अखंड खणखणत होते. तसेच शिवसेनेचे विविध नेते, प्रसारमाध्यमे यांच्याकडेही बातमीबाबत खातरजमा केली जात होती. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनाप्रमुखांची तब्बेत ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांबाबत विचारणा करणारे सुमारे शंभर दूरध्वनी आपल्याला आल्याचे सांगून नार्वेकर म्हणाले की, अशा अफवा म्हणजे शिवसेनाप्रमुखांना दीर्घायुरारोग्य मिळणार असल्याचीच चिन्हे आहेत.

आरक्षण नसल्याने मेडिकल कौन्सिलची निवडणूक
पुन्हा घेण्याची मागणी
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण न ठेवून कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात, असे आवाहन डॉ. आंबेडकर मेडिकोज् कम्यून या संघटनेचे मुख्य निमंत्रक डॉ. तुषार जगताप आणि निमंत्रक डॉ. जितेंद्र जाधव यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. ही मागणी मान्य न केल्यास या विरुद्ध न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

छोटा शकीलच्या चार हस्तकांना अटक
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी
गुन्हेगारी जगतातील ‘खून के बदले खून’ची भाषा यापुढे टोळीयुद्धातील गुंडांसाठी न्यायालयात बाजू लढविणाऱ्या वकिलांच्या जीवावरही बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वकिलाच्या हत्येचा बदला वकिलाच्या हत्येनेच घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलच्या चार हस्तकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपाडा येथून अटक केली.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातील अडसर अखेर दूर!
निशांत सरवणकर, मुंबई, ५ मे

शहर व उपनगरांतील ५६ म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात अडसर ठरलेल्या मुद्दय़ांवर आज म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठाम निर्णय घेण्यात आल्याने या वसाहतींच्या पुनर्विकासास आता जोमाने सुरुवात होणार आहे. पुनर्विकासात अडथळा ठरणारा ‘रिहॅब एरिया’ अखेर नव्या निर्णयामुळे उपनगरापुरता तरी गायब होणार आहे. लेआऊट मंजूर झाले नसले तरी २.५ एफएसआयनुसार या वसाहतींच्या पुनर्विकासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासही आज मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर ‘एरो-ब्रिज’ सह धावले विमान; प्रवासी सुखरुप
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

प्रवाशांच्या चढ-उतारासाठी असलेला एरो-ब्रिज न काढल्याने सांताक्रूझ विमानतळावर आज एअर इंडियाचे एक विमान अपघातग्रस्त झाले. १७९ क्रमांकाच्या मंगलोरकडे निघालेल्या या विमानाच्या दरवाजाचे अपघातात मोठे नुकसान झाले. सुदैवाने विमानातील १७२ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही.

डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या सिटी बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

राजभवन तसेच पोलिसांचे अधिकृत वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. विवेकानंद रेगे यांच्यावर क्षुल्लक कारणातून अगदी फिल्मिस्टाईल पद्धतीने हल्ला करणाऱ्या सिटी बँकेचा अधिकारी असलेल्या सचिन गजराज बाफना या ३२ वर्षे वयाच्या युवकाला दादर पोलिसांनी आज अटक केली. डॉ. रेगे हे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिमच्या सितलादेवी मंदिर येथील निवासस्थानाहून नागपाडा येथील पोलीस इस्पितळात निघाले होते.

छोटा शकीलच्या चार हस्तकांना अटक
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

गुन्हेगारी जगतातील ‘खून के बदले खून’ची भाषा यापुढे टोळीयुद्धातील गुंडांसाठी न्यायालयात बाजू लढविणाऱ्या वकिलांच्या जीवावरही बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वकिलाच्या हत्येचा बदला वकिलाच्या हत्येनेच घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलच्या चार हस्तकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट तीनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपाडा येथून अटक केली.

टाटा - रिलायन्स वीजखरेदी करारामुळे उपनगरवासीयांना दिलासा
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

टाटा आणि रिलायन्स या कंपन्यांमध्ये लवकरच वीजखरेदी करार होणार असल्याने उपनगरातील ग्राहकांना अखंड आणि खात्रीलायक वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये ५०० मेगाव्ॉट विजेच्या खरेदीसाठी लवकरच करार होणार आहे. हा करार व्हावा म्हणून ग्राहक संघटनांनी वीज नियामक आयोगापुढे आग्रही भूमिका घेतली होती. अनेक वर्षांपासून टाटा आणि रिलायन्समध्ये वीजखरेदी करारावरून न्यायालयीन लढाई जुंपली होती. यात कळीचा मुद्दा वीजवाटपाचे प्रमाण हा होता. टाटांनी बेस्ट आणि रिलायन्स यांच्यात दुजाभाव न करता ग्राहक आणि मागणी यांच्या प्रमाणात वाटप करावे, अशी रिलायन्सची मागणी होती. तर टाटांकडून ही मागणी धुडाकावून लावली जात होती आणि रिलायन्स करार करीत नाही, असे चित्र निर्माण केले जात असल्याची चर्चा होती.

कसाबवर आज आरोप निश्चित होणार
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि दोन भारतीय संशयितांविरुद्ध निश्चित करण्यात येणाऱ्या काही विशिष्ट आरोपांसंदर्भात संबंधित प्रशासकीय व्यवस्थांनी दिलेली परवानगीविषयक कागदपत्रे आज अभियोग पक्षाने विशेष न्यायालयात सादर केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनीही ही कागदपत्रे दाखल करून घेत बुधवारी कसाब आणि अन्य आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कसाब, फईम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख यांच्याविरुद्ध भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपासह त्यासाठी त्यांनी बेकायदेशीरित्या मुंबईत प्रवेश करून हल्ला केल्याच्या आरोपाचा मसुद्यात समावेश आहे. याशिवाय बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपांचाही त्यात समावेश आहे.

मुंबईत आज झीव एटनचा ‘रिदम’ सोहळा
मुंबई, ५ मे / प्रतिनिधी
दि कान्सुलेट जनरल ऑफ इस्त्रायल (मुंबई) व इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन यांच्या वतीने ‘जर्नी इन टू रिदम’ हा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. झीव एटन व त्यांचा ग्रुप हा रिदम संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम येत्या ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एनसीपीए थिएटरमध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या तिकीटसाठी २२८१९९९३-९६ (विस्तारीत क्रमांक ५०२) या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.