Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

एकेकाळी उन्हाळी सुटीत मुले ‘मामाच्या गावाला’ जात असत. आंबा-फणसांवर ताव मारत, जांभळांनी जिभा रंगवत, भुताखेताच्या गोष्टींनी रात्र जागवत सुट्टीचा आनंद लुटत. मात्र आता बहुेतकांचे ‘मामा’च मुंबईतच स्थायिक झाल्यामुळे गावाकडची वाटच बंद झाली. त्यामुळे आपसुकच तमाम बच्चेकंपनीची पावले उन्हाळी शिबिरांकडे वळू लागली. मुलांच्या हातात जांभळे-करवंदे असोत वा बास्केटबॉल .. त्यांच्या चेहऱ्यावरील सुट्टीचा आनंद तसाच कायम आहे.

‘२६ जुलै’सारख्या संभाव्य आपत्तीशी लढण्यासाठी यंदा मुंबईत केंद्रीय पथक !
प्रतिनिधी

हल्ली पावसाळा जवळ आला की मुंबईकरांच्या आणि पालिका प्रशासनाच्या छातीत धडकी भरते. पावसाळ्यात अनेकदा निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीत मुंबईकरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून पालिका अनेक उपाययोजना करते. यंदा तर मुंबईकरांच्या मदतीसाठी केंद्रीय आपत्कालीन व्यवस्थापनातील प्रशिक्षित जवान येणार आहेत. २००५ प्रमाणे यंदाही २६ जुलै धोक्याची तारीख असल्याने पालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे ठरविले आहे.

मकरंद अनासपुरे आता गंभीर भूमिकेत
सुनील डिंगणकर

‘सातच्या आत घरात’पासून मकरंद अनासपुरेने सुरू केलेली हसवणूक आजतागायत अखंडपणे सुरू आहे. मराठवाडी बोलीत संवादफेक करणाऱ्या या अभिनेत्याचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. गेल्या जवळपास सर्वच चित्रपटांत मकरंद केवळ विनोदी भूमिकांमध्येच दिसला. आता मात्र विनोदी अभिनेत्याच्या प्रतिमेला छेद देत ‘गोष्ट छोटय़ा डोंगराची’ या चित्रपटात मकरंद ‘सुशिक्षित शेतकऱ्या’च्या गंभीर स्वरूपाच्या भूमिकेत दिसणार आहे.

भारतातील ‘शैली’दार चित्रकार्यशाळा मुंबईत
प्रतिनिधी

ओरिसाच्या सुरत चौधरीची पट्टचित्रामध्ये हातोटी आहे. यात पाम वृक्षाच्या पानावर लोखंडी सुईने कोरून चित्र काढले जाते. त्यानंतर त्यात काजळी भरण्यात येते आणि सुंदर कलाकृती निर्माण होते. ओरिसामधील रघुराजपुर या गावातील पाच-सहा वर्षांच्या मुलापासून ते साठ-सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वजण या कामात गढून गेलेले आढळतात. सहा इंच रुंद आणि १२ इंच लांब आकाराचे चित्र काढण्यास आठ दिवस लागतात. राजस्थानचा प्रमोद शर्मा न्यूवुड च्या फ्रेमवर कोरून चित्र काढतो. या राजस्थानी शैलीत बहुतांश चित्रे देवदेवतांची असतात.

जीवनात ‘उत्क्रांती..’
गलापगॉस बेटांनंतर बिगलने पॅसिफिक महासागरातील सफरीसाठी मोर्चा वळवला.. आधी ठिपक्याएवढी ताहिती बेटं.. नंतर न्यूझीलंड.. तिथली हिंस्र मुखवटेधारी माओरी जमात.. पुढे ऑस्ट्रेलियात सिडनी येथून न्यू साऊथ वेल्स परगण्यात भटकंती करता करता डार्विनला अनेक चित्रविचित्र प्राणी आढळले.. फक्त ऑस्ट्रेलियात आढळणारे.. कांगारू.. रॅट कांगारू अन् बदकासारखे पाय अन् चोच असलेला प्लॅटिपस.. चार्ल्स चक्रावला.. इतकी प्रचंड विविधता.. जणू निराळीच सृष्टी असल्यासारखी.. पुढेऑस्ट्रेलियातील टास्मानिया,पर्थ करीत आता बिगल हिंद महासागरातील कोकोस बेटांवर पोहोचले.. प्रवाळ खडकांची कोकोस बेटं अन् नारळाची झाडं..

साडेतीन दशकांनंतर पुन्हा भरला पार्ले टिळक ‘टेक-थ्री’ च्या विद्यार्थ्यांचा वर्ग
प्रतिनिधी

पार्ले टिळक शाळेत १९७१ ते ७३ दरम्यान टेक्निकलच्या वर्गाला असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन अलिकडेच शाळेत पार पडले. आता वयाची पन्नाशी पार केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा उत्साहाने या संमेलनास उपस्थित होते. एवढा मोठा काळ लोटूनही तोंडपाठ असलेली प्रार्थना खडय़ा आवाजात म्हणून झाल्यावर या मुलांनी ३८ वर्षांपूर्वीच्या वर्गातील आपापल्या जागा पटकाविल्या.

बंदिवानांच्या श्रमाने ‘वाळा' बहरला
प्रतिनिधी

सृजनाची कोणताही क्रिया स्वतबरोबरच इतरांच्या जीवनातही आनंदाचे मळे फुलवू शकते, या सुविचाराची प्रचिती ठाणे कारागृहातील बंदिवानांनी गेल्या वर्षभरात घेतली असून इनरव्हील क्लब ऑफ ठाणे पश्चिम आणि मुलुंडच्या एस.एच. केळकर कंपनीच्या सहकार्याने तुरुंगाच्या शेतीत सुगंधी वाळयाचे यशस्वी पीक घेतले आहे. गेल्या आठवडय़ात १ मेच्या मुहूर्तावर या वाळ्याच्या कापणीस सुरूवात झाली. बंदिवानांच्या श्रमाने तुरूंगाच्या आवारात बहरलेला वाळा केळकर कंपनी परफ्युम तयार करण्यासाठी वापरणार आहे.

चित्रकलेतून कृष्णराव केतकर यांनी जीवनाला नवीन आयाम दिला - न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
प्रतिनिधी

ज्येष्ठ चित्रकार स्व. कृष्णराव केतकर यांनी कृतज्ञता भावनेतून चित्रकला जोपासली. चित्रकला हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर जीवनाला नवीन आयाम देणारा चित्रकला हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे कृष्णराव केतकर यांनी चित्रकलेवरही जीवापाड प्रेम केले, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी शनिवारी डोंबिवली येथे केले.

समाजाला निसर्गाकडे वळण्याची हाक देणारे ‘ग्लिम्प्सेस ऑफ नेचर’!
प्रतिनिधी

निसर्गविनाश असाच चालू राहिला तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढय़ा या सुंदर निसर्गसंपत्तीला मुकणार. भविष्यातील ही चिंता दूर होण्यासाठी समाजाचे आतापासूनच निसर्गाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे, म्हणूनच समाजाला निसर्गाकडे वळण्याची हाक देणारे एक आगळे-वेगळे ‘ग्लिम्प्सेस ऑफ नेचर’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन तीन पर्यावरणप्रेमींनी आयोजित केले आहे.

सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी

सारस्वत प्रकाशन विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात येणारे यंदाचे सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या ९ मे रोजी तेंडुलकर मंगल कार्यालय, मोगल लेन, माहीम येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या एका समारंभात त्याचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार व अर्थतज्ज्ञ दिवंगत गो. मं. लाड यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अर्थतज्ज्ञ व या विषयावर सातत्याने लेखन करणारे विनायक कुळकर्णी यांची निवड झाली आहे. अन्य पुरस्कारांचे मानकरी असे उद्योगपती सुरेश कारे, डॉ. विनोद घोटगे, संगीतकार अशोक पत्की, युवा संगीतकार मयुरेश पै, बुद्धिबळपटू निशिता बाळणी, गौड सारस्वत ब्राह्मण समाज ही संस्था, सामाजिक कार्यकर्ते द. श्री. कुळकर्णी, मनोहर पै-घुंगट. तसेच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ प्रसिद्ध शाल्मली सुखटणकर चा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास ‘सारस्वत चैतन्य’चे संपादक रवींद्र पाटकर हे अध्यक्ष तर विठ्ठल कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘विजय साळसकर-बेडर वर्दीवाला’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असतानाच विजय साळसकरांसारख्या धाडसी पोलीस अधिकाऱ्यावरील पुस्तक प्रकाशित होणे हा एक योगायोग आहे, असे उद्गार राज्याचे अपारंपारिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी काढले. स्टडी सर्कलने आयोजिलेल्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात जगदीश भोवड लिखित आणि नवचैतन्य प्रकाशन प्रकाशित ‘ विजय साळसकर - बेडर वर्दीवाला’ या पुस्तकाचे प्रकाशन शहीद विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनय कोरे, आमदार बच्चू कडू, डॉ. शिवरत्न शेटे, स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शेटे यांच्या ‘दहशतवादाला प्रत्युत्तर - शिवाजी महाराजांची रणनीती’ या व्याख्यानाने झाली. डॉ. शेटे यांनी महाराष्ट्रभर दिलेल्या व्याख्यानांचे मिळालेले मानधन यावेळी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या तसेच जखमी झालेले अरुण जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रदान केले. या वेळी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

संस्कार भारतीचा युवा कला महोत्सव
प्रतिनिधी

संस्कार भारती कोकण प्रांत युवा कलामहोत्सव-२००९ जुहू येथील विद्यानिधी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच पार पडला. अखिल भारतीय आणि राज्यस्तरीय पातळीवर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये कोकण प्रांतातील ४२ पैकी १५ समित्यांचे ३५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी पथनाटय़, चित्रकला, रांगोळी, नृत्य अशा विविध कला सादर केल्या. या महोत्सवातील रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शांतीदेव व वर्षां तळवळकर यांनी केले. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात भाईंदर, मालाड, घाटकोपर, भिवंडीमधील कार्यकर्त्यांनी विलेपार्ले विभागात जागोजागी पथनाटय़ सादर केले. तसेच वैभव वझे व अवधूत सप्रे यांनी तरुण चित्रकार नीलेश जाधव यांची मुलाखत घेतली. यावेळी जाधव यांनी चित्रकलेचे प्रात्यक्षिकही दाखवले. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात अरुण नलावडे, राजन जोशी, रवींद्र बेडेकर, दीपक ओक आदी मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन अवधूत सप्रे आणि शिल्पा शिंदे यांनी केले.