Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

सर्वसामान्यांना विखेंचे पाठबळ - डॉ. कसबे
राहाता, ५ मे/वार्ताहर

संघर्षांतून व्यक्तिमत्त्व घडलेल्या खासदार बाळासाहेब विखे यांनी सर्वसामान्यांना जगण्याचे बळ दिले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी काढले.
खासदार विखे यांचा ७७व्या वाढदिवसानिमित्त लोणी येथे प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. कसबे बोलत होते. अध्यक्षस्थानी पायरेन्सचे अध्यक्ष एम. एम. पुलाटे होते. शिक्षण संकुलाचे सल्लागार सेवानिवृत्त जनरल समशेर मेहता उपस्थित होते.

निष्क्रिय कारभार, दूरदृष्टीचा अभाव
राजू इनामदार, नगर, ५ मे

शहरातील पाणीटंचाई पाणी नसल्यामुळे नाही, तर गेल्या १५-२० वर्षांतील नगरपालिका, महापालिकेतील सत्ताधारी, तसेच स्थानिक नेते व त्याबरोबरच प्रशासनाच्या निष्क्रिय, दूरदृष्टीचा अभाव असणाऱ्या कामकाजामुळे निर्माण झाली आहे. सन १९७२मध्ये झालेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणाचा विचारच इतक्या वषार्ंत प्रशासन व राज्यकर्त्यांकडून झालेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून नगरकरांना पिण्याच्या पाण्याचा त्रास फक्त उन्हाळ्यातच नाही, तर वर्षांचे बाराही महिने सहन करावा लागतो.

र्मचट्स बँक आदर्श मॉडेल - जैन
जामखेड, ५ मे/वार्ताहर

बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वस्त म्हणून काम करावे. नगर मर्चंटस् बँकेचे काम याच सेवाभावी वृत्तीने चालू आहे. ही बँक आदर्श मॉडेल असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री सुरेश जैन यांनी काढले. अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या जामखेड शाखेचे उद्घाटन श्री. जैन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे, बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपाध्यक्ष संजय बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पितळे, संचालक संजय चोपडा, अनिल पोखरणा, अशोक पितळे, मोहन बरमेचा, विजय मुथा, सुरेश मुनोत, किशोर गांधी, प्रमिला बोरा, मीनाताई मुनोत, शकुंतला बोरा, सुभाष भांड, विजय कोथिंबिरे, पूरन साखला, अनुलिंग वसेकर, सुभाष गांधी, तसेच उद्योगपती रमेश गुगळे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. राम शिंदे, जि. प. सदस्य दत्तात्रेय वारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

सहायक फौजदारासह दोघांना ८पर्यंत कोठडी
राजुरी मारामारीप्रकरण
जामखेड, ५ मे/वार्ताहर
तालुक्यातील राजुरी येथे झालेल्या सवर्ण-दलितांच्या दोन गटांतील मारामारीप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा राजुरीतील रहिवासी व सहायक फौजदार आश्रू काळदाते, तसेच अन्य एकास अटक केली. या दोघांनाही ८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता राजुरीस भेट देऊन स्थितीची पाहणी केली.

येडगावमध्ये ‘पिंपळगाव जोगे’चेही पाणी
श्रीगोंदेकरांना दिलासा
श्रीगोंदे, ५ मे/वार्ताहर
डिंबे धरणातून येडगाव धरणात सध्या दररोज साडेसहाशे क्युसेक पाणी सोडले जात आहे. पिंपळगाव जोगेतूनही मृतसाठय़ातील सव्वा टीएमसी पाणी येडगावमध्ये सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष वल्लभ बेणके व वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या बैठकीत झाला. त्यामुळे ११ मेपासून कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाचपुते यांनी दिली.

७० टक्के तलाव कोरडे
कैलास ढोले, नगर, ५ मे

उन्हाची तीव्रता आणि असह्य़ उकाडय़ात जनजीवन होरपळले असतानाच जिल्ह्य़ातील उपलब्ध पाणीसाठेही झपाटय़ाने आटू लागले आहेत. सुमारे ७० टक्के तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात तीव्र उन्हाळा जाणवू लागला. मात्र, आता वाढत्या तपमानाने कहर केला असून, ४३ अंशांवर पारा गेल्याने जलाशयांनीही तळ गाठला आहे.

समांतर पुलाचे काम वेगाने सुरू
कोपरगाव, ५ मे/वार्ताहर
कोपरगाव ते नगर रस्ता चौपदरीकरणाच्या कामाबरोबरच सध्याच्या मोठय़ा पुलालगत गोदावरी नदीवरील जुन्या मोठय़ा पुलाजवळ तयार होत असलेल्या समांतर पुलाचे काम वेगात सुरू आहे. ११ मोऱ्यांच्या पिलरचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या कामास जानेवारी २००८मध्ये सुरुवात झाली. सहा महिन्यांतच पुलाचे खांब उभे राहिले. जळगावच्या राम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कोपरगाव-नगर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेला आहे. शहराजवळ गोदावरी नदीवरील मोठय़ा पुलालगत होणाऱ्या या समांतर पुलाचे काम नाशिकच्या ए. बी. लोढा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या उपठेकेदारास दिले आहे. एकूण ११ मोऱ्यांचा यात समावेश आहे. पात्रापासून १५ मीटर उंचीच्या या पुलाचे काम पिस्ट्रेसिंग पद्धतीने करण्यात येत आहे. आरसीसी पद्धतीचा हा पूल असून, त्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या तीन-चार महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

विजेच्या धक्क्य़ाने खांबावरून पडल्याने तीन कर्मचारी जखमी
राहाता, ५ मे/वार्ताहर
मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या चिंचपूर फिडरच्या दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावरील तीन कर्मचारी धक्का बसून जखमी झाले. आज सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला. चिंचपूर येथील फिडर दुरुस्तीसाठी सकाळी साडेसात वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तेथे १३ ते १४ कर्मचारी कामास होते. चिंचपूर फिडरवरील रोहित्राचे काम चालू असतानाच अचानक वीजपुरवठा सुरू झाला. विजेचा धक्का बसल्याने माणिक राजाराम गोर्डे (वय ४४, गोगलगाव), दत्तात्रेय भानुदास विखे (वय ३०, लोणी), रवींद्र सोपान लव्हाटे (वय २४, चिंचपूर) हे खाली पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.