Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

मिहानमधील जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या याचिका रद्दबातल
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

नागपुरात होऊ घातलेल्या मिहान प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या जमिनींच्या अधिग्रहणास विलंब झाल्यामुळे ही कार्यवाही रद्दबातल ठरवावी अशी मागणी करणाऱ्या बऱ्याच याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवल्या आहेत. मिहान प्रकल्पासाठी शिवणगाव, खापरी, कलकुही, दहेगाव, तेल्हारा यासह बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले आहेत.

धिटुकल्या शिरीनला गवसला गाजर गवत निर्मूलनाचा ‘मंत्र’
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

नागपुरातील सेंटर पॉईंट शाळेत दहाव्या वर्गात शिकणाऱ्या शिरीन जयस्वाल या विद्यार्थिनीने शेतीसाठी धोकादायक असलेले गाजर गवत नियंत्रणात आणण्यासाठी तयार केलेले संशोधन ९ ते १५ मे दरम्यान अमेरिकेत होणाऱ्या इंटेल आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. व्यक्तिगत पातळीवर या स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणारी शिरीन ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक ठरली आहे. शेतात वाढणारे गाजर गवत पिकांसाठी अत्यंत धोकादायक असते. कुठेही वाढणाऱ्या गाजर गवतामुळे पिकांना मोठय़ा प्रमाणात धोका असतो. त्यातच शेतकरी या गवताची वाढ रोखण्यासाठी अनेक रासायनिक खतांचा वापर करतात.

भोवरीत दरोडा, २० लाखाचा ऐवज पळविला
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

रखवालदारांना मारहाण व कोंडून ठेवून दरोडेखोरांनी वीस लाखाचा ऐवज पळवल्याची घटना मौद्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील भोवरी येथील राधाकृष्ण स्टिल कंपनीत रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. मौदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोवरी गावापासून थोडे दूर राधाकृष्ण स्टिल कंपनी असून ती सध्या बंदच आहे. तेथे अनिल पटेल व मन्सुरी हे दोखे रखवालदार रात्री झोपले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर त्या दोघांना जाग आली. कंपनीच्या आवारात दहा-बारा जणांचे टोळके होते. त्यांच्या हातात लोखंडी पाईप व काठय़ा होत्या.

वेगवेगळ्या चार अपघातात, चौघांचा मृत्यू
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

नागपूर शहर व ग्रामीण भागात दोन दिवसात चार अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला. वेगात जाणाऱ्या ऑटो रिक्षाच्या धडकेने तरुणी ठार झाली. हुडकेश्वर मार्गावरील नाल्याच्या पुलाजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दीपिका हिरामण सवई (रा. महात्मा गांधी नगर) हे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. सकाळी ती रस्त्याने जाताना वेगात आलेल्या ऑटो रिक्षाची (एमएच ३१ एपी ५४६२) तिला धडक लागली. या अपघातात ती जागीच ठार झाली. सक्करदरा पोलिसांनी ऑटो रिक्षा चालक आरोपी महेश भास्कर बरगड (रा. मिरे ले-आऊट) याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली.

यवतमाळचे अमित व संदीप राठोड चमकले
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्य़ातील दोन तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यवतमाळात वास्तव्यास असलेले आणि आर्णी तालुक्यातील येरमल हेटी येथे शेती करणारे भरत राठोड यांचा मुलगा अमित राठोड तसेच पुसद येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एम. राठोड यांचा मुलगा डॉ. संदीप राठोड अशी या दोन तरुणांची नावे आहेत. अमित राठोड याने येथील विवेकानंद विद्यालयात शालेय शिक्षण तर अमोलकचंद महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर अमित दिल्लीत संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी गेला होता. भरत आणि छाया राठोड यांचा मुलगा अमित याच्या यशाबद्दल माजी मंत्री शिवाजीराव मोघे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक बोबडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी त्याचे अभिनंदन केले. डॉ. संदीप राठोड एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. संदीप राठोड याने दुसऱ्यांदा संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ३४ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीही तो उत्तीर्ण झाला होता मात्र, तेव्हा त्याचा क्रमांक २६७ होता. संदीपचे वडील एम.ए.बी.एड. आहेत तर आई गृहिणी आहे. वडील बंधू डॉ. राजीव सर्जन आहेत. डॉ. संदीपच्या यशाबद्दल डॉ. पंकज पवार, डॉ. टी.सी. राठोड इत्यादींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

द्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

आनंद, प्रेम, विरह अशा अनेक विविध भावना घेऊन मराठी व हिंदी गाण्याच्या चालीवर आधारित शहरातील ११ शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गणेश वंदना, पोवाडा, गोंधळ, पर्यावरण, संदेश गाण, देशभक्तीवरील गीतांवर आधारित नृत्य सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात ४९ व्या महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या मुख्य उपस्थितीत सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, महसूल उपायुक्त एम.ए.एच. खान, उपविभागीय अधिकारी सुधाकर कुळमेथे, विभागीय समाज कल्याण अधिकारी मोहन शेल्टे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर, शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग व विविध मान्यवर उपस्थित होते. संचालन डॉ. दीपक साळीवकर यांनी केले, तर आभार दमके यांनी मानले.

नागपूर गार्डन क्लबचा वार्षिक महोत्सव
नागपूर, ५ मे/प्रतिनिधी

नागपूर गार्डन क्लबचा वार्षिक महोत्सव क्लबच्या प्रांगणात नुकताच साजरा करण्यात आला. महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर हसबनीस, क्लबचे अध्यक्ष एस.एम. जोशी, उपाध्यक्ष चंद्रकांत सावदेकर, सचिव सुनिता शर्मा, कोषाध्यक्ष स्वाती गोखले उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या भागात मॉडर्न स्कूलचे निशांत महात्मे (तबला), राहुल वानखेडे (सिंथेसाईजर), सुरज शर्मा (कंट्रोलर), तनुश्री दास गुप्ता, सुचिता जैन, अनुश्री साठे, लता अंधारे यांनी सांगितिक कार्यक्रम सादर केला. महोत्सवाच्या दुसऱ्या भागात पर्यावरण, शिक्षा अभियान आणि अनेक खेळांशी निगडीत प्रश्नमंजूषा घेण्यात आली. या स्पध्रेत प्रथम पुरस्कार सविता राऊत, द्वितीय रोहिणी बंड, तृतीय प्रतिमा शास्त्री आणि प्रोत्साहनपर पुरस्कार सीमा शाहू, सुचिता जैन, कोमल ढोले यांना देण्यात आले. अतुलचंद्र मेंढेकर यांना वर्षभरातील उत्तम कामगिरीबद्दल ‘बेस्ट वर्कर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन सुनिता शर्मा यांनी केले. आभार स्वाती गोखले यांनी मानले.

रामधाममधील सामूहिक विवाह सोहोळ्यात ५१ जोडप्यांचा विवाह
नागपूर, ५ मे/प्रतिनिधी

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान, ग्रामीण आदिवासी युवक स्वयंरोजगार व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समाजकल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मनसर येथील रामधाममध्ये रविवारी पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळय़ात ५१ जोडप्यांचा विवाह पार पडला. या समारंभाला माजी खासदार बाळकृष्ण वासनिक, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार एस.क्यू.जमा, आनंद महाजन, हुकुमचंद आमदरे, चंद्रपाल चौकसे उपस्थित होते. मनसरमधील जिल्हा परिषद प्रायमरी शाळेतून संध्याकाळी ६ वाजता एक किलोमीटपर्यंत वरात काढण्यात आली. या वरातीमधील आदिवासी नृत्य सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र होते. विवाहस्थळी (चौकसे लॉन) नवरदेव पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या विवाह सोहळय़ाला सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते.

मद्यप्राशन; ११३ चालकांवर कारवाई
नागपूर, ५ मे / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी सोमवारी विविध कलमान्वये २७ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७ अन्वये १०, १०९ अन्वये २, ११० अन्वये ८, १५१(३)अन्वये १ तसेच ४१ अन्वये ३ असे एकूण २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदीद्वारे १ हजार ६८८ वाहनांची तपासणी केली आणि ३४ वाहन चालकांना चालान करून २ वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहतूक पोलिसांनीही विविध कलमांतर्गत ६०२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण ९७ हजार ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले. जादा प्रवासी वाहतूक, कॉर्नर पार्किंग, बस थांब्याजवळ पार्किंग, सिग्नल तोडणे, कर्कश हॉर्न, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मर्यादेपेक्षा जास्त गती आदींप्रकरणी ही कारवाई झाली. तीन आसनी ऑटो रिक्षा- ८, दुचाकी- १३, चारचाकी १, अशी एकूण २२ वाहने डिटेन करण्यात आली़ मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ११३ चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी वाहन चालवताना कागदपत्र सोबत ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शशिकांत जोशी यांचा सत्कार
नागपूर, ५ मे/प्रतिनिधी

पतंजली योग समितीचे महासचिव शशिकांत जोशी अमेरिकेतील कॅलिफोर्निया, इडाहो, नेवाडा आणि ओरेगान राज्याचा दोन महिन्याचा दौरा आटोपून नुकतेच परतले. पतंजली योग समितीतर्फे दत्तात्रयनगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात जोशी यांचा आयुर्वेद प्रभारी डॉ. जिवेश पंचभाई व प्रभाकर सावळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी अॅड. नामदेव फटिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगतज्ज्ञ डॉ. विठ्ठल जिभकाटे होते. लॉसएंजेलिस, संडियागो, सन्निवले, सनफ्रान्सिस्को आणि सनरामोन येथे स्वामी रामदेव महाराजांचे मोठय़ा संख्येने प्रशंसक आहेत, अशी माहिती शशिकांत जोशी यांनी यावेळी दिली. स्वामींचे प्रशंसक हय़ूस्टन येथे रामदेव स्वामींचे केंद्र सुरू होण्याची आतूरतेने वाट पाहात असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती आणि भारतीय पक्वान्न तेथील लोकांना आवडत असून, त्यांच्याकडून आपल्याला शिस्त आणि स्वच्छता हे गुण घेण्यासारखे आहेत, असे जोशी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाजूराम शर्मा यांनी केले. प्रदीप काटेकर यांनी आभार मानले.