Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

नवनीत

अदृश्य आणि सूक्ष्म अशा हिरण्यगर्भाच्या आदिसंकल्पापासून सारी सृष्टी निर्माण झाली. जशी मानवी शरीरात जाणीव व्यापून असते, तसे सबंध दृश्य विश्वाला जी जाणीव व्यापते तिला हिरण्यगर्भ म्हणतात. मातेच्या उदरात गर्भधारणा झाली की, मन, शरीर, गुणधर्म या सर्वाना व्यापणारी जाणीव येते. त्यातून सुंदर मूल जन्मते. ही सुंदरता हिरण्यगर्भात असते. कधी विनाश वस्तूचा अंत होतो. वस्तू अदृश्यात जाते. तो मृत्यू असतो.
ज्या ठिकाणी गती असते, दिशा असतात, तिथे काळ असतो. जसे, गाढ झोपेत बाहय़

 

विश्व विराम पावल्याने काळाचे भान नसते. त्याप्रमाणे हिरण्यगर्भाच्या ठिकाणी कालाचे अस्तित्व नाही. म्हणजे दृश्य विश्वाचे प्रकटीकरण झाले की, काळ निर्माण होतो. यासाठी मुळापर्यंत जाण्याची शोधक वृत्ती लागते. ती तपातून येते. तप म्हणजे जळणे-तापणे. (जळण्याचा ‘तो’ अर्थ इथे नाही.) विश्व निर्माण करण्यासाठी प्रजापतीने तप केले. आपली सारी शक्ती पणास लावली. ती सारी मनापासून एकवटली नि त्याच्या निश्चयाचे रूपांतर संकल्पात झाले. ऋषींच्या मते, हे विश्व संकल्पाने निर्माण झाले. याचा भावार्थ असा, साधकाने अशा प्रकारचा भव्य संकल्प जीवनात करावयास हवा. मात्र संकल्पाला पकडून ठेवू नये. ‘मी यंव करीन. त्यंव करीन’ अशा गर्जनांनी काय होणार? गर्जेल तो पडेल काय! संकल्प अवश्य करावा. फक्त संकल्पात येणारा ‘मी’ काढून टाकावा. तो विवेकाने सहज काढता येतो. विवेकच समाजातील इतरांशी प्रस्थापित होणाऱ्या स्वभावाचे अंतरंग उलगडून दाखवितो. अशातून विविध प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विनम्र मनाने मूळ प्रश्नांचा सखोल विचार करण्याची गरज आहे. असे बृहदारण्यक उपनिषदातील ऋषींना वाटते. म्हणून ते विश्वाचा सखोल वेध घेण्यास उत्सुक असतात. त्यांचा ‘आदिसंकल्प’ हाच असतो. हाच त्यांचा ‘नारायण’ असतो. संत तुकाराम आपल्या अभंगात याचे सार सांगतात : ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ।।’
यशवंत पाठक

ग्रह वक्री वा मार्गी होतो म्हणजे काय?
पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्यामुळे तारे व ग्रह पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात; परंतु ग्रह हे सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालत असल्याने काही दिवसांच्या निरीक्षणांत ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर हे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असलेले दिसतात. हे ग्रह सामान्यपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असले तरी काहीवेळेस या सरकण्याच्या दिशेत बदल होतो आणि ते पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकल्याचे भासतात. यालाच ‘ग्रह वक्री झाला’ असे म्हटले जाते. काही काळानंतर ग्रह दिशा बदलून परत पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ लागतात. याला ‘ग्रह मार्गी झाला’ असे म्हणतात. अंतग्र्रहांच्या वक्री होण्याचे कारण समजून घेण्यासाठी जर ‘मेरी-गो-राऊंड’ची कल्पना केली, तर आपण व मेरी-गो-राऊंडचा खांब यामध्ये असताना त्याच्या घोडय़ाची दिशा जर डावीकडून उजवीकडे असेल तर खांबापलीकडे गेल्यावर त्याची दिशा उजवीकडून डावीकडे असले. त्याप्रमाणे अंतग्र्रह जेव्हा सूर्य व पृथ्वी या दरम्यान असेल तेव्हा आकाशात तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना (वक्री) दिसेल. सूर्यापलीकडे असताना तो मार्गी असेल. बहिग्र्रहांमध्ये मात्र ग्रहाच्या वक्री होण्याचे कारण पृथ्वीच्या गतिसापेक्ष ग्रहाच्या वेगात होणारा बदल हे आहे. पृथ्वीपेक्षा बहिग्र्रहांची सूर्याभोवती फिरण्याची गती कमी असते. जेव्हा पृथ्वी व ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असतील तेव्हा पृथ्वी व ग्रह एकाच दिशेने दोन मार्गिकांतून प्रवास करणाऱ्या वाहनांप्रमाणे जात असतात. पृथ्वीचा वेग ग्रहापेक्षा जास्त असल्याने जसजसे पृथ्वी व ग्रह यांच्यातील अंतर कमी होत जाते, तसतशी ग्रहाची गती मंदावल्याप्रमाणे वाटते. पृथ्वी ग्रहाला मागे टाकून आपल्या कक्षेत पुढे जाताना ग्रहाची गती उलटय़ा दिशेने असल्याचे भासते (पूर्वेकडून पश्चिमेकडे) व आपण तो ‘ग्रह वक्री झाला’ असे म्हणतो.
मृणालिनी नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

आजकाल मनोरुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदललाय; हा दृष्टीकोन बदलण्यास कारणीभूत ठरलेली एक व्यक्ती आहे सिग्मंड फ्रॉइड. तेव्हा मानसरोग ही एक विकृती नसून तो एक आजार आहे आणि त्यावर उपाययोजना केल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो, हे सिद्ध केले सिग्मंड फ्रॉइड यांनी. त्यांना आधुनिक मनोवैद्यकशास्त्राचा जनक म्हटले जाते.
मोराव्हियातील फ्रेलबर्ग येथे ६ मे १८५६ रोजी सिग्मंड फ्राइड यांचा जन्म झाला. वैद्यकशास्त्राची पदवी मिळवल्यावर त्यांनी संमोहन विद्येचे ज्ञान आत्मसात केले. मानसरोगाच्या आजाराच्या संदर्भात त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. पण त्यावर टीका झाली. कारण ‘स्टडीज इन हिस्टेरिया’ या पुस्तकातून दडपलेली कामवासना हे मनोविकाराचे मूळ कारण, असे प्रतिपादन केल्याने खळबळ माजली. तथापि मानसरोगाला वैयक्तिक, तसेच सामाजिक घटकही कारणीभूत असू शकतात हेही त्यांनी मान्य केलं.
मानवी मनाचे सुप्त व जागृत मन असे दोन भाग असून, त्यातून त्यांनी स्वनाश, जगण्यात इच्छा, सुखलालसा इत्यादी संकल्पना शास्त्रीयरीत्या मांडल्या. मनोरुग्णांना तपासण्यासाठी त्यांनी स्वप्न मीमांसा, साहचर्य मीमांसा इ. मनोविश्लेषणाच्या पद्धती तपासल्या. मनोविकार हा शारीरिक रोगांसारखा एक रोग असून, तो बरा होऊ शकतो. समाजाने त्यांना वाळीत टाकू नये हे लोकांमध्ये त्यांनी बिंबवले. युंग, अ‍ॅडलर कॅटेल, हॉर्ने, अलपोर्ट या मनोचिकित्सकांनीही नंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरुग्णांवर उपचार केले.
जग बदलण्यास काही ग्रंथ कारणीभूत आहेत. त्यापैकी ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ या त्यांच्या ग्रंथाचा समावेश आहे. याशिवाय ‘द इगो अँड द इड,’ ‘होटम अँड हॅबू’ ही त्यांची पुस्तके गाजली. सन १९३९ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

पाण्याचा एक थेंब होता. चकाकणारा, टपोरा, छान. थेंब आकाशामधून खाली पृथ्वीवर पडत होता. फार दु:खी झाला होता बिचारा या प्रवासात. कष्टी हृदयाने तो खाली खाली चालला होता. तो मनाशीच हळहळला, ‘काही काळाने माझा अंत होणार आहे. काय केले मी आयुष्यात? काहीच नाही. कुणालाही मी ठाऊक नाही. कुणी माझा विचार करत नाही. मला दुय्यम स्थानच कायम मिळाले. वर आकाशात मला कुणी समजून घेतले नाही. ढगाने मला दूर लोटले. हा दुष्ट वारा मला आणखी खाली नेतो आहे. मी कुणालाच नको आहे. काय माझे नशीब! का बरे असे केवळ दु:खच माझ्या वाटय़ाला आले. जन्मालाच आलो नसतो तर किती बरे झाले असते. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. अगदी रुक्ष आणि दु:खी जीवन आहे माझे.’ जगावर चिडत, स्वत:ची कीव करत थेंब हवेबरोबर आकाशातून खाली येत राहिला. वाटेत त्याला आनंदाने गाणारी पाखरे दिसली. उत्साहाने सळसळणाऱ्या हवेच्या लहरी भेटल्या. पृथ्वी जवळ आली तसे झाडांचे हलणारे हिरवेगार शेंडे दिसले. तो कुणाकडे पाहून हसला नाही की बोलला नाही. सगळय़ांचाच त्याला फार राग येत राहिला.
जमिनीवर पडताना त्याने पाहिले तर एक शिंपला दोन्ही पाकळय़ा उघडून आनंदात पहुडला होता. जणू कुणाची तरी वाटच पाहात होता. थेंबाला वाटले, कशाला पडायचे त्या धुळीत. बरं झालं हा शिंपला उघडा आहे. त्यातच पडूया झालं.
थेंब टपदिशी नेमका शिंपल्यात पडला. मग काय झालं? शिंपला लागला हळूहळू मिटायला. शिंपला पूर्ण मिटला गेला. कालांतराने शिंपल्याच्या आतमध्ये थेंबाचा तेजस्वी, टपोरा, पाणीदार मोती झाला. स्वत:च्याच झळझळीत तेजाने चमकू लागला.
काही काळाने मोत्याला शिंपल्यातून बाहेर काढले गेले. तो सुंदर मोती प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय झाला.
पदरी पडलेल्या आयुष्याला, स्वत:च्या नशिबाला दोष देण्यापेक्षा जीवनाच्या प्रवासात कुठले ध्येय गाठायचे, कोण व्हायचे हे थेंबासारखे आपणही ठरवू शकतो. मातीत पडून केवळ वाफ होऊन नाहीसे होण्यापेक्षा शिंपल्यात राहून मोती व्हायचे प्रत्येकाच्या हातात असते.
आजचा संकल्प - परिस्थिती स्वीकारून मी पुढे जात राहीन. माझे ध्येय निश्चित करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com