Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

अडीच किमी अंतरासाठी अडीचशे किमी ‘वायरिंग’चे महाजाल
प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवरील गॅ्रण्टरोड ते महालक्ष्मी स्थानकांमधील सर्व सिग्नल व इंटरचेंज पॉइंटच्या नियंत्रणासाठी मुंबई सेंट्रल येथे नवी ‘रुट रिले इंटरलॉकिंग’ (आरआरआय) यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जेमतेम अडीच किमी अंतरासाठी उभारलेली ही यंत्रणा एकप्रकारे वायरचे महाजाल असून, रेल्वेमार्ग आणि आरआरआय केबिनमधील या वायरची एकत्रित लांबी सुमारे अडीचशे किमी म्हणजे मुंबई-पुणेदरम्यानच्या अंतराहून अधिक आहे. या यंत्रणेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार मराठी वाङ्मयाचा इतिहास
सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण
प्रतिनिधी

स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील मराठी वाङ्यमयाच्या इतिहासाचा आढावा घेणारा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार आहे. या ग्रंथात १९५० ते २००० या कालखंडातील साहित्याचा समग्र आढावा घेण्यात येणार असून या महिन्यातच पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन होणार आहे. ‘मसाप’तर्फे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेणारे खंड प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम आता पूर्ण झाले आहे. या सातव्या खंडाचे तीन भाग करण्यात आले असून त्यात सुमारे चाळीस विषय हाताळण्यात आले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या संपादनाखाली सातवा खंड तयार होत आहे. ‘मसाप’चे वि. भा. देशपांडे हे कार्यकारी संपादक आहेत. या खंडात मराठी चरित्र वाङ्मय, प्रवासवर्णन, विज्ञान, स्त्रीवादी, बाल साहित्य, संगीत, शिल्प व चित्रकला यासह अन्य विषयांचा या खंडात समग्र आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. वसंत आबाजी डहाके, निरंजन घाटे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि अन्य मान्यवर व लेख या खंडामध्ये आहेत. ‘मसाप’चा १०३ वा वर्धापन दिन येत्या २७ मे रोजी असून त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सातव्या खंडाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात येणार आहे.

मोफत निसर्गोपचार शिबिराचे आयोजन
पनवेल -
शांतीवन येथील स्नेहलता निसर्गोपचार आश्रमतर्फे नेरे येथे सात दिवसीय योग- निसर्गोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ७ ते १३ मे या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीमध्ये होणारे हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य आहे. यात कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, दमा, संधीवात, लठ्ठपणा आदी आजारांवर योग आणि निसर्गोपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय स्टीमबाथ, कटीस्नान, मसाज, मातीलेप, एनिमा आदी उपचारही करण्यात येणार आहेत. संपर्क : ९५२१४३-२३८०४४, ९४२३०४१५९५

कोमसापची नवी कार्यकारिणी
पनवेल -
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेत झालेल्या निर्णयानुसार शाखेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट छाया गोवारी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी वसुधा पितळे, तर कार्यवाहपदी माधुरी थळकर यांची निवड करण्यात आली. हिरा नलावडे, सुनीती साठे, परशुराम महाबळ, सुनीता जोशी, मानसी कान्हेरे, विजया एरंडे, फातिमा मुजावर यांचीही कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे.