Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

उन्हाच्या तडाख्याने सध्या सर्वचजण पोळून निघत आहेत. एरवी आंब्याच्या वनी विहार करण्यात आनंद मानणारा मोर सुद्धा या उष्म्याने चांगलाच अस्वस्थ झाला असणार. त्यामुळेच कदाचित नाशिकच्या ‘मेरी’ परिसरातल्या या भिंतीच्या कठडय़ावर चढून आकाशाकडे मान वेळावून पाहताना पावसाची दूरवर तरी काही चिन्हं दिसतात का, याचा वेध हा पक्षीराज घेत असावा.

‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर प्रशासनातर्फे खबरदारी
जळगावातील मृत जनावरांची संख्या चिंताजनक

प्रतिनिधी / नाशिक

जळगाव जिल्ह्य़ात डुकरे, शेळ्या आणि कोंबड्यांचा मोठय़ा संख्येने संशयास्पद मृत्यू होवू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिकसह धुळे व नंदुरबार या भागातील जिल्हा प्रशासन सजग झाले असून सध्या जगभर सुरू असलेली ‘स्वाइन फ्लू’ची चर्चा लक्षात घेता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी व विमानतळ अधिकारी यांच्या सहकार्याने खबरदारीचे उपाय आखण्याची तयारी सुरू केली आहे. जळगावच्या हजारो कोंबडय़ांचा मृत्यूमागे उष्माघात हे कारण असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले गेले असले तरी तत्सम रोगाचा फैलाव इतरत्र होवू नये याकरिता खास नियोजन करण्यावर स्थानिक प्रशासनातर्फे प्रामुख्याने भर दिला जात आहे.

नाशिकमध्ये चर्चा ‘तिसरा कौन’ची!
निकालाचे काउण्टडाऊन

अभिजीत कुलकर्णी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातल्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडून दोन आठवडय़ांचा कालावधी उलटत आला असताना निकालाचा थांग लागणे तर दूरच उलट पक्षोपक्षांकडून करण्यात येणाऱ्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे संभाव्य निकालांबाबतच्या अनिश्चिततेत भरच पडत आहे. मतदारसंघांची अमूलाग्रपणे बदललेली रचना, बहुरंगी लढती, बंडाळ्या, अंतर्गत गटबाजी, जातीय समीकरणे, पैशाचा मुक्त हस्ते झालेला वापर आणि त्यातच मतदानाची मर्यादित स्वरुपातील टक्केवारी या घटकांमुळे एरवीचे सगळेच ठोकताळे बदलले असल्याने निकालाचा नेमका अंदाज बांधणे अत्यंत गुंतागुंतीचे बनत आहे.

विवेक घळसासी यांचे आज व्याख्यान ‘शेवाळकर नावाचा माणूस’
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक आणि आपल्या अमोघवाणीने समस्त मराठी मनाला मोहविणारे वक्ता दशसहस्त्रेशू प्राचार्य राम शेवाळकर यांचे रविवारी ३ मे रोजी नागपूर येथे देहावसान झाले. शेवाळकर यांचा नाशिककर तसेच वसंत व्याख्यानमालेचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. वसंत व्याख्यानमालेच्या वतीने उद्या, बुधवार दि. ६ मे रोजी सा. ७ वाजता यशवंतराव महाराज पटांगण, गंगाघाट येथे श्रद्धांजलीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अमृतवक्ता अशी ख्याती असलेले सोलापूरचे विवेक घळसासी ‘शेवाळकर नावाचा माणूस’ या विषयावर यावेळी व्याख्यान देणार आहेत.

वीजवाहिन्यांना कवेत घेत अतिक्रमणांची चढती भाजणी
विजेशी खेळ (२)

प्रतिनिधी / नाशिक

भारतीय वीज पुरवठा कायदा, भारतीय टेलिग्राफ कायदा, वीज कायदा यांच्यासह भारतीय विद्युत कायद्यानुसार उच्चदाब व लघु वीज वाहिनी उभारताना घरापासून तिचे अंतर किमान १.२ मीटर असणे बंधनकारक आहे. सिडको विभागात वाहिन्यांचे जाळे निर्माण करताना वीज कंपनीने सिडकोच्या मंजूर आराखडय़ानुसार रस्त्यालगतच्या घरांपासून तीन मीटर अंतर सोडले होते. तथापि, पुढील काळात अतिक्रमणांचा असा वेढा पडला की, तीन मीटर दूरवर दिसणाऱ्या उच्चदाब व लघु दाबाच्या वीज वाहिन्या थेट घराघरात शिरल्याचे सर्वत्र पहावयास मिळते.

विद्यापीठ ग्रंथपालांची आज नाशिकमध्ये परिषद
प्रतिनिधी / नाशिक

विद्यापीठ ग्रंथपालांची राज्यस्तरीय परिषद बुधवारी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील अकृषी व कृषी विद्यापीठांचे ग्रंथपाल या परिषदेत सहभागी होणार असल्याचे मुक्त विद्यापीठातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. कुलपती कार्यालयाच्यावतीने ही परिषद आयोजित करण्यात आली असून यावेळी कुलपतींचे सहसचिव विकासचंद्र रस्तोगी व उपसचिव सी. एम. आलेगांव मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पंडित पलांडे भूषविणार आहेत. राज्यभरातील विद्यापीठ ग्रथालयांच्या विकासासाठी समान पातळीवरील नियोजन करण्याबाबत परिषदेत विचारमंथन होणार असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे यांनी कळविले आहे.

सराफ बाजारातील सुरक्षेविषयी बैठकीत चर्चा
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पाश्र्वभूमीवर सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नाशिक सराफ असोसिएशनचे शिष्टमंडळ व पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्यातील बैठकीत सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली. नाशिक सराफ असोसिएशन श्री सोन्या मारुती मंदीर संस्थान व समन्वय समितीच्या बैठकीत मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. सराफ बाजारातील दुकानांमध्ये सी. सी. कॅमेरे व सायरन तसेच अंतर्गत सुरक्षा आदीबाबत दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. समन्वय समितीच्या सर्व सभासदांना ओळखपत्र देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. सराफ बाजार, बोहोरपट्टी, कापड बाजार, भांडी बाजार, दहीपूल, मेनरोड आदी भागामध्ये रहदारीचा व रिक्षा स्टँडचा, भाजी बाजार, फुल बाजार व फेरीवाल्यांचा मोठा प्रश्न आहे. मिश्रा यांनी या सर्व प्रश्नांकडे लक्ष देण्याचे मान्य केले. यावेळी सराफ असोसिएशनचे प्रसाद आडगावकर, कृष्णा नागरे, गिरीश टकले, राजेंद्र दिंडोरकर, शाम आडगावकर, संजय मंडलिक, गोविंद दंडगव्हाळ आदींचा सत्कार केला.

मनमाडला पाच दिवसाआड पाणीपुरवठा
मनमाड / वार्ताहर

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाची पातळी झपाटय़ाने खालवत असून परिणामी शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागिरकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पालिकेने दिलगिरी व्यक्त केली असून नागरिकांनी पाण्याचा अपव्यय थांबवावा, पाणी जपून वापरावे व पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी एन. एम. नागरे यांनी केले आहे. पाणीपुरवठा वितरणात बदल करण्यात आलेल्या निर्णयाची ३ मे पासून तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यात घट झाली तरी पाणी टंचाईच्या भावी काळातील संकटास तोंड देता येणे शक्य होईल असे मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे. खासगी नळ कनेक्शनची गळती संबंधितांनी स्वखर्चाने, पूर्वपरवानगीने तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी, यापुढे नळ गळती आढल्यास ती पालिकेतर्फे तात्काळ बंद करण्यात येईल तसेच बेकायदेशीर जोडलेले नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावेत अन्यथा पालिकेतर्फे कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नागरे यांनी दिला आहे. सध्या शहराचे तापमान ४३ अंशावर गेल्याने धरणातील पाणी साठय़ाचे झपाटय़ाने बाष्पीभवन होत आहे.

तरुणावर खुनी हल्ला
शहादा / वार्ताहर

विवाहाप्रसंगी निघालेल्या वरातीत नवरीला खांद्यावर बसवून नाचू देण्यास मज्जाव करण्यात आल्याने संतप्त झालेल्या युवकाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथे घडली. पवित्र अशा विवाह सोहळ्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ३ मे रोजी रात्री अंबाबारी गावात विवाह सोहळ्याप्रसंगी वरात निघाली होती. वरात सुरू असताना रमेश तडवी या युवकाने नवरीला खांद्यावर घेऊन नाचण्याचा आग्रह धरला. त्यास लालसिंग तडवी याने विरोध केला असता दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. रमेशने लालसिंगच्या पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी लालसिंगने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मेंढपाळांना संरक्षण देण्याची मागणी
धुळे / वार्ताहर

मेंढपाळांच्या वस्तीवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून त्यांना संरक्षण देण्याची मागणी अहिल्याबाई होळकर युवक मंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश वाघमोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ातही अलीकडे निरनिराळ्या ठिकाणी मेंढपाळांच्या वस्तीवर सशस्त्र दरोडे आणि हल्ले झाले. परंतु शासकीय पातळीवर यांची गंभीर दखल घेतली जात नाही. प्रशासनाने अशा मेंढपाळांच्या वस्तींच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी. असे हल्ले आणि दरोडय़ांचे सत्र दिवसागणिक वाढत असून मेंढपाळांना प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.