Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

राजकीय पदाधिकाऱ्यांना धास्ती निवडणूक निकालाची
वार्ताहर / धुळे

लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, यापेक्षा अमूक एक उमेदवार पराभूत झाल्यावर कोणत्या भागावर काय परिणाम होऊ शकतो, याचीच चर्चा अधिक प्रमाणात धुळे मतदारसंघात होत असून राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकालाची आतापासूनच धास्ती घेतल्याचेही चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, त्याप्रमाणे कोणत्या उमेदवाराने कुठे अधिक मते मिळवली असतील, याविषयी चर्चा रंगत आहे. विशिष्ट एखादा उमेदवार निवडून येईल, यावर काहींमध्ये पैजाही लागल्या आहेत. काँग्रेस आघाडीचे अमरिश पटेल, भाजप-सेना युतीचे प्रतापदादा सोनवणे, जनता दलाचे निहाल अहमद व लोकसंग्रामचे अनिल गोटे यांच्यामध्ये तीव्र चुरस असल्याने कोण विजयी होईल, याचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. धुळे मतदारसंघ खुला झाल्याने निवडणुकीआधीच राजकीय पक्ष, संघटना आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये तर तीव्र स्पर्धा होती.

पूररेषेतील गावांमध्ये आपत्ती नियंत्रण शिबीर
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वार्ताहर / नंदुरबार

पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी दिले आहेत. पूर रेषेत येणाऱ्या गावांमधील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांचे प्रशिक्षण शिबीर घेऊन आपत्तीप्रसंगी काय करावे, याबाबत माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिमल सिंह, अपर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी टी. एम. बागूल, नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी जी. एल. तायडे, तळोद्याचे बी. के. बागूल, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद वळवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जळगाव पालिकेतील सत्ताधारी-विरोधी पक्षनेत्यांच्या मनोमिलनाने संभ्रम
वार्ताहर / जळगाव

येथील महापालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची सत्ता असून विरोधी पक्षनेता पद भाजपकडे आहे. मात्र जैन हे शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांच्या गटानेही लोकसभा निवडणुकीत युती उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत आल्याने शहरात या नेत्याबद्दल संभ्रमाचीच स्थिती निर्माण झाली आहे. जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडी सत्तास्थानी असून महापौरपदी जैन यांचेच भाऊ रमेश जैन विराजमान आहेत. महापालिका निवडणुकीत ६९ जागांपैकी जैन गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या व तोच गट सत्तेत आला. त्यावेळी राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाच्या १४ जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेता याच पक्षाचा होईल असे गणित होते व त्यासाठी राष्ट्रवादीने शिवचरण ढंडोरे यांचे नाव सुद्धा जाहीर केले होते. मात्र यात काहीतरी राजकारण घडले व राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा असलेल्या भाजपच्या सुरेश भोळे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली.

वीज भारनियमनामुळे आर्वीत पाणीटंचाई
धुळे / वार्ताहर

वाढते भारनियमन आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे तालुक्यातील आर्वी या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील पुरमेपाडा धरणात पाणी उपलब्ध असूनही कृत्रीम पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. दिवसभरात आणि रात्रीतून प्रत्येकी सहा तास वीज भारनियमन होत असल्याने गावाला पाणी पुरविणाऱ्या टाक्या या संदर्भात जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी वैयक्तीक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच धुळे तालुक्यात आर्वी गाव आहे. साधारणपणे पंधरा हजार लोकसंख्येच्या या गावात साऱ्यांनाच कृत्रिम पाणी टंचाईशी सामना करावा लागतो आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश गावांमध्ये विहिरी-विंधन विहिरी आटल्या असल्याने गावात प्यायला पाणी नाही, पण आर्वी गावाला पाणी पुरविणाऱ्या पुरमेपाडा (ता. धुळे) धरणात पाणी उपलब्ध असतानाही आर्वीकरांना प्यायला पाणी मिळू शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे. केवळ वीज भारनियमन हेच या कृत्रिम पाणी टंचाईचे मुख्य कारण ठरले आहे. गावात थ्री फेज आणि सिंगल फेज वाहिन्यांवरून वीज पुरविली जाते. गावात पाणी पुरवण्यिासाठी ज्या दोन टाक्या बांधल्या त्या भरून घेण्यासाठी थ्री फेज वीज जोडणीवरच पाण्याचे पंप चालतात, पण पुरवठा होण्याचा प्रश्नच नाही आणि सहा नंतर वीज प्रवाह सुरू झाला तर तो सिंगल फेज वाहिनीवरून करण्यात येतो. यामुळे याहीवेळेत पाणी पुरवठा होवू शकत नाही, यानंतर थ्री फेज वाहिनीवरून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजपर्यंत वीज पुरवठा होतो, पण या १० ते १२ तासातही तांत्रिक बिघाडामुळे अनेक वेळा वीज प्रवाह खंडीत होतो आणि पाण्याचे वीज पंप बंब पडतात. परिणामी पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरतच नाही. हे सगळे सुरू असताना त्याच वेळी गावात पाणी पुरविण्याचीही घाई झालेली असते. अशाच गावातील सर्वच लहान-मोठय़ा वसाहतींमध्ये कमी अधिक प्रमाणात पाणी पुरविण्याची कसरत यंत्रणेला करावी लागते. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर मग गावातील प्रत्येक नळासमोर रांगा लागतात. कुणाला किती पाणी मिळेल याचा भरोसा नसतोच. गावभर पाणी टंचाईची ओरड सुरू होते. सहा-सहा तासाचे भारनियमन बिनबोभाटा सहन करणाऱ्या ग्रामस्थांना पाणी पुरवठय़ासाठीचा तरी वीज पुरवठा होणे गरजेचे झाले आहे. संजय विठ्ठल चौधरी यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने ही टंचाईची बाब लेखी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे.