Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राजकीय पदाधिकाऱ्यांना धास्ती निवडणूक निकालाची
वार्ताहर / धुळे

लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, यापेक्षा अमूक एक उमेदवार पराभूत झाल्यावर कोणत्या भागावर काय परिणाम होऊ शकतो, याचीच चर्चा अधिक प्रमाणात धुळे मतदारसंघात होत असून राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकालाची

 

आतापासूनच धास्ती घेतल्याचेही चित्र दिसत आहे.
निवडणुकीच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, त्याप्रमाणे कोणत्या उमेदवाराने कुठे अधिक मते मिळवली असतील, याविषयी चर्चा रंगत आहे. विशिष्ट एखादा उमेदवार निवडून येईल, यावर काहींमध्ये पैजाही लागल्या आहेत. काँग्रेस आघाडीचे अमरिश पटेल, भाजप-सेना युतीचे प्रतापदादा सोनवणे, जनता दलाचे निहाल अहमद व लोकसंग्रामचे अनिल गोटे यांच्यामध्ये तीव्र चुरस असल्याने कोण विजयी होईल, याचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. धुळे मतदारसंघ खुला झाल्याने निवडणुकीआधीच राजकीय पक्ष, संघटना आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये तर तीव्र स्पर्धा होती. धुळे शहर व ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव शहर व ग्रामीण अशा विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघ विभागला गेल्याने भौगोलिक असमतोलाची किनारही त्यास लाभली आहे. नाशिक व धुळे जिल्ह्य़ातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश लोकसभा मतदारसंघात झाला आहे हे विशेष. त्यामुळेच संपूर्ण मतदारसंघात पोहोचणे सर्व उमेदवारांसाठी एक दिव्य बनले. गोटे यांनी प्रचारादरम्यान आपण एकटे या मतदारसंघातील भूमिपूत्र असून उपऱ्यांना मतदारांनी थारा देऊ नये, असा दांडोरा पिटला होता. सोनवणे यांनी संपूर्ण जिल्ह्य़ात आपला संपर्क असल्याचा दावा केला होता. निहाल अहमद यांनी धुळे व मालेगावसह ग्रामीण भागातूनही आपणास प्रतिसाद मिळाल्याचा तर पटेल यांनी विकासाच्या मुद्यावर सर्वत्र आपण पोहोचल्याचे सांगितले. उमेदवारांच्या या दावे-प्रतिदाव्याच्या खेळाची मजा नागरिक घेत असले तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र वेगळीच चिंता सतावू लागली आहे.
मतदारसंघातील सर्वच प्रमुख उमेदवारांचे आपआपल्या भागात वर्चस्व असले तरी संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव पडेल, असा एकही उमेदवार रिंगणात नसल्याचे यावेळी उघड झाले. त्यामुळे निकालानंतर पटेल हे विजयी झाल्यास त्याचा धुळ्याला अधिक फायदा तर मालेगाव, बागलाणकडे दुर्लक्ष अशी स्थिती निर्माण झाल्यास काय करणार, किंवा सोनवणे हे विजयी झाल्यास विकास कामांच्या बाबतीत मालेगाव, बागलाणला काही प्रमाणात झुकते माप मिळेल, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. विजयी झालेल्या उमेदवाराने आपणास कोणत्या भागातून कमी मतदान झाले, त्याचा राग न धरता विकासात्मक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण मतदारसंघात कामे करावीत, अशी भावनाही व्यक्त करण्यात येत आहे.