Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पूररेषेतील गावांमध्ये आपत्ती नियंत्रण शिबीर
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
वार्ताहर / नंदुरबार

पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी दिले आहेत. पूर रेषेत येणाऱ्या गावांमधील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांचे प्रशिक्षण शिबीर घेऊन आपत्तीप्रसंगी काय करावे, याबाबत माहिती

 

देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिमल सिंह, अपर पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी टी. एम. बागूल, नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी जी. एल. तायडे, तळोद्याचे बी. के. बागूल, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद वळवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तापी नदीकाठावरील पूररेषेत येणाऱ्या २८ गावांमध्ये तहसीलदारांनी मान्सूनपूर्वीच भेट देऊन बाधितांना आपत्तीप्रसंगी कोणती मदत उपलब्द करून देता येईल, याविषयी अहवाल सादर करावा तसेच गोमाईच्या पाणी फुगवटय़ामुळे बाधित होणाऱ्या संभाव्य गावांची माहिती सादर करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. पूर परिस्थिती उद्भवल्यास पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक, संपर्क अधिकाऱ्यांची माहिती नियंत्रण कक्षाकडे संकलित करावी, पुरामुळे नुकसान होणाऱ्या पिकांची तसेच घरांची पाहणी करून पंचनाम्यासारखे प्रकार त्वरित होण्यासाठी कृषी, महसूल या विभागांसह ग्रामसेवकांना सूचना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरामुळे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्यायी रस्त्यांची माहिती ठेवावी तसेच अशा गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांचा पुरवठा करण्याविषयी पूर्वनियोजन आवश्यक असल्याचेही राव यांनी सांगितले.
जुनी झाडे, जीर्ण इमारतींची माहिती घेऊन जुनाट झाडे तोडणे व इमारत मालकांना सूचना देण्याविषयीचे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्यात साथीचे रोग उद्भवल्यास निर्मुलन पथके निर्माण करून नियंत्रण कसे ठेवावे असेही ते म्हणाले. पावसाळ्यात अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात अर्भक व बालमृत्यूंचे प्रमाण वाढू शकतात, त्यासाठीही बैठक घेण्याची सूचना परिमलसिंह यांनी यावेळी केली.
प्रकल्पग्रस्तांना सुविधा द्याव्यात
दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा, शेतजमीन सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी नर्मदा विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा पुनर्वसन विभागाने योग्य समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नर्मदा पुनर्वसन आढावा बैठकीत केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी गुलाब पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पुनर्वसन वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी, पूरनियंत्रण या सुविधा पुरविण्यासाठी नर्मदा विकास विभागाने तातडीने पावले उचलावीत, शेतीसाठी जमीन वाटप, रहिवासी भूखंड वाटप करण्यासाठी कार्यक्रम आखण्याची सूचनाही त्यांनी दिली. आरोग्य सुविधा नियमित उपलब्ध करून देण्यासाठी तरंगता दवाखाना तसेच आरोग्य केंद्रांमधील पुरेसा औषध साठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे आदेशही राव यांनी दिली.