Leading International Marathi News Daily
बुधवार, ६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जळगाव पालिकेतील सत्ताधारी-विरोधी पक्षनेत्यांच्या मनोमिलनाने संभ्रम
वार्ताहर / जळगाव

येथील महापालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची सत्ता असून विरोधी पक्षनेता पद भाजपकडे आहे. मात्र जैन हे शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांच्या गटानेही लोकसभा निवडणुकीत युती उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत आल्याने शहरात या

 

नेत्याबद्दल संभ्रमाचीच स्थिती निर्माण झाली आहे.
जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडी सत्तास्थानी असून महापौरपदी जैन यांचेच भाऊ रमेश जैन विराजमान आहेत. महापालिका निवडणुकीत ६९ जागांपैकी जैन गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या व तोच गट सत्तेत आला. त्यावेळी राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाच्या १४ जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेता याच पक्षाचा होईल असे गणित होते व त्यासाठी राष्ट्रवादीने शिवचरण ढंडोरे यांचे नाव सुद्धा जाहीर केले होते. मात्र यात काहीतरी राजकारण घडले व राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा असलेल्या भाजपच्या सुरेश भोळे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली.
जळगाव पालिका निवडणुकीत विरोधात असलेल्या सुरेश जैन व भाजप विधी मंडळ गटनेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत जुळवून घेतले. त्यामुळे या दोघा नेत्यांचे संबंध साऱ्या जिल्ह्य़ाला परिचित असताना पालिकेत भाजपचा माणूस जैन गटाला विरोध कसा करणार हा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. मात्र बहुदा त्याच उद्देशातून विरोधी पक्षनेता पदापासून राष्ट्रवादीला दूर ठेवण्यात आले व भाजप नगरसेवकाची तेथे निवड करण्यात आल्याची टीका त्यावेळी झाली.
आता जैन यांचा अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश झाल्याने ते युतीचे नेते म्हटले जात आहेत. जैन १९८० पासून विधानसभेमध्ये जळगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत होते. सलग आठ निवडणुका त्यांनी विविध पक्षांकडून लढून जिंकल्या आहेत. ते ज्याही पक्षात जातात त्यांचा संपूर्ण गटच त्या पक्षात जातो असा इतिहास आहे.
त्याच अनुषंगाने ते सद्यस्थितीत शिवसेनेत गेल्याने त्याचा गट सुद्धा सेनेचाच म्हटला जातो. हे लोकसभा निवडणूक प्रचारात स्पष्टपणे दिसून आले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातून जैन यांनी सेना नेते म्हणून भाजप उमेदवाराचा प्रचार केला. त्यांचे भाऊ महापौर रमेश जैन यांनीही प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्या गटाच्या सर्वच नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागात सक्रीय प्रचार केला.
महत्वाची बाब ही की, महापालिकेतील विरोधी पक्षनेता सुरेश भोळे (भाजप) हे सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरात फिरले. सत्ताधारी गटाचे नगरसेवक, महापौर व भोळे साऱ्यांनी एकत्रितपणे भाजप उमेदवाराचा प्रचार केला हे चित्र पाहता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
जैन शिवसेनेत गेल्याने त्यांचा गटही शिवसेनेत गेला म्हणून त्या गटाने मित्रपक्ष म्हणून भाजपचा प्रचार केला. आता महापालिकेतील सुद्धा सत्ताधारी व विरोधीपक्ष नेता मित्र पक्ष ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद भाजपकडे राहिलच कसे? हा प्रश्न संभ्रमात भर घालीत आहे.
भाजपने सुद्धा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पुढे येत आहे. राजकीय समीक्षकांनी तर भाजपने विरोधी पक्ष नेतापद स्वत: सोडावे असे म्हटले आहे. कारण सत्ताधारी व विरोधी नेता मित्र पक्षाचे ठरल्याने भाजप महापालिकेत प्रखरपणे विरोध नोंदवूशकणार नाही असे म्हटले जात आहे.