Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

विशेष

जगण्या देई प्रेरणा, सौंदर्याच्या या खुणा!
दोन पैशापैकी एक पैशाची भाकरी आणि एक पैशाचे गुलाबाचे फूल ही माणसाच्या जगण्यासाठीची दोन चाके आहेत. त्याला भाकरीही हवी आणि फूलही! फूल कशासाठी जगायचे ते शिकवील, असा दुर्दम्य विश्वास माणसाने आपल्या सर्जनशीलतेतून व्यक्त केला आहे. ‘तुला जर दोन पैसे मिळाले तर एक पैशाची तू भाकरी आण आणि एक पैशाचे गुलाबाचे फूल. भाकरी तुला जगवील आणि गुलाबाचे फूल तुला कशासाठी जगायचे ते शिकवील.’ जगण्यासाठी पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याला कोणत्या गोष्टींची गरज असते? अन्न आणि निवारा मिळाला की, कोणताही प्राणी जिवंत राहू शकतो आणि आपली जमात काळाच्या ओघात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अन्न आणि निवारा यामधील ‘निवारा’ नसला तरी प्राणी जगू शकतात. राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली नाही, तरी त्यांचे अस्तित्व पूर्णत: धोक्यात येत नाही. म्हणजे जगण्यासाठी अत्यावश्यक असणारे असे अन्न मिळाले तर प्राणिमात्रांना जगणे ही फारशी अवघड गोष्ट राहात नाही. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना बराच काळ शिकार, म्हणजे अन्न मिळाले नाही, तरी त्यांच्यात जगण्याची एक निसर्गत: असलेली ओढ असतेच.

व्हयं म्हाराजा!
‘काय बाबल्या, होतस खय? मतदानाक दांडी मारुन बाऱ्हेर फिरुक गेललय की काय?’
‘नाय हो तात्यानु, हयसर मुंबयक मतदान केलय आणि संध्याकाळची एस.टी. पकडून गेलय गावाक. माझ्यासारखो लालबागात रवणारो माणूस काय मतदान करुचो नाय की काय? तुमका काय वाटला मी काय पेडर रोडवरच्या उंच बिल्डिंगीत रवतय की काय?’
‘नाय बाबा, हल्ली सगळीकडची माणसा मतदानाक दांडी मारण्यात धन्यता समाजतत.’
‘नाय पण तात्यानू, मी अजून तरी त्यात मोडणय नाय. अजून तरी मी माणसात आसय.’
‘पण कायरे बाबल्या, काय गावाकडची गजाल काय?’
‘गावाकडे काय सांगलय तात्यानू, कोकणातली सगळी लोका मजेत आसत. सुखात आसत.’
‘असा प्रधानजी वरी उत्तर काय दितय.’

पाण्यासाठी दाही दिशा..!
जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिग) आणि हवामान बदल (क्लायमेट चेंज) हे शब्द गेल्या काही वर्षांत सर्वत्र प्रचलित झाले आहेत, असे नव्हे तर अनेकांच्या अनुभवाचे बोल बनले आहेत. कारण त्या तापमानाचे चटके आणि हवामानबदलाचे झटके, शहरी भाग असो किंवा ग्रामीण, सर्वानाच वेगवेगळ्या संदर्भात जाणवू लागले आहेत. पावसाचे बदललेले वेळापत्रक, हा त्याचाच परिपाक मानला जातो. आकडेवारीच्या भाषेत बोलायचे तर, पावसाच्या वार्षिक सरासरीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. गेली काही वर्षे तो सर्वसाधारणपणे ९५ ते १०० टक्के पडत आहे आणि याही वर्षी सुमारे ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोकण हा देशातील काही जास्त पावसांच्या प्रदेशांपैकी एक. दरवर्षी सुमारे तीन-साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस. पण उन्हाळ्यात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य; ही या प्रदेशाची कायमची डोकेदुखी आहे. मागील मोसमात इथे पावसाने वार्षिक सरासरी गाठली खरी, पण तो अशा विस्कळीत स्वरूपात पडला, की पावसावर अवलंबून असलेल्या इथल्या भातशेतीच्या उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम झाला. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आलेल्या मान्सूनने नंतर मात्र दीर्घकाळ दडी मारली. त्यामुळे लावण्या रखडल्या आणि कशाबशा लावण्या उरकल्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला. गणपती उत्सवानंतर सुमारे आठ दिवस त्याने सर्वत्र जोरदार धुमाकूळ घातला, पण त्यानंतर मान्सूनची सांगता झाल्यासारखे हवामान बदलले. कोकणात दिवाळीच्या सुमारास चांगले एक-दोन पाऊस होतात. गेल्या वर्षी तसा पाऊस झालाच नाही आणि त्याचे फटके गेल्या जानेवारी- फेब्रुवारीपासून कोकणवासीयांना बसू लागले आहेत. या भागातील बहुतेक नद्या तोपर्यंत कोरडय़ा पडल्या आणि विहिरी किंवा बोअरवेलचे पाणीही आटून गेले. हे चित्र कोकणात दरवर्षीच दिसते, पण या वर्षी त्याचा कालावधी सुमारे एक महिना अलिकडे आला आहे आणि हवामान बदलाच्या भावी परिणामांची चुणूक कोकणवासीयांना त्यातून अनुभवाला येत आहे.