Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

‘बंद’ ची कोंडी कायम, राज्यभर आंदोलनाचा इशारा
पुणे, ५ मे/विशेष प्रतिनिधी

रिक्षा दरकपातीच्या मुद्दय़ावरून शहरातील रिक्षा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेला संप मिटण्याऐवजी चिघळण्याचीच चिन्हे आता दिसू लागली आहेत. १ मेपासून लागू केलेल्या दरकपातीस स्थगिती देण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी ठामपणे नकार दिला असून, शहरांतर्गत प्रवासाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विविध पर्यायांवर त्यांनी विचार सुरू केला आहे, तर दरकपात स्थगित न केल्यास रिक्षा संपाची व्याप्ती राज्यभर वाढविण्याचा निर्धार बेमुदत उपोषणाला बसलेले कृती समितीचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.

‘सीएनजी’ व ‘दरकपात’ हे स्वतंत्र मुद्दे
असल्याचा साक्षात्कार बंड यांना कधी झाला ?

‘सीएनजी’ व ‘रिक्षा भाडेकपात’ हे दोन स्वतंत्र विषय होते, तर या दरकपातीला दोन महिन्यांची स्थगिती देताना ‘सीएनजी बसवा, रिक्षाच्या भाडय़ात कपात होऊ देणार नाही,’ असे आश्वासन दिलीप बंड यांनी कोणत्या अधिकारात दिले, असा परखड सवाल डॉ. बाबा आढाव यांनी आज येथे उपस्थित केला. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २६ फेब्रुवारी ०९ ला केलेल्या ठरावामध्ये पुण्यातील सर्व रिक्षाचालकांनी दोन महिन्यांत सीएनजी बसवून घेतल्यास पुण्यात दरकपात लागू केली जाणार नाही, असे म्हटले होते. आता मात्र प्राधिकरणाला या ठरावाचा विसर पडला असून ‘सीएनजी’ व ‘दरकपात’ हे दोन स्वतंत्र मुद्दे असल्याचा साक्षात्कार बंड यांना झाला आहे.

पुणेकरांच्या सोयीसाठी आजपासून दोनशे बसची सेवा -दिलीप बंड
रिक्षा भाडेकपातीचा निर्णय शासनाच्या आदेशानुसार घेतलेला असून तो बदलू नये असा वाढता दबाव पुणेकरांकडून येत असल्याने आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिलीप बंड यांनी आज स्पष्ट केले. रिक्षा नसल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी टॅक्सी संघटनांबरोबरच अनेक स्वयंसेवी संघटनाही पुढे आल्या असून शहरातील विविध शिक्षणसंस्थांनी आपल्या स्कूल बसेसही देऊ केल्या आहेत. अशा दोनशे स्कूल बसेस त्यांच्या चालकांसह उद्या पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत, अशी माहितीही बंड यांनी दिली.शिक्षण संस्थांकडून येणाऱ्या या बसेसवर वाहक नेमून त्याचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पीएमपीएमएलवर सोपविण्यात आली आहे.

पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढले
रिक्षा संपामुळे गेल्या पाच दिवसात पीएमपीएमएलच्या उत्पन्नांत दररोज मोठी वाढ होत असून काल ते ९४ लाखांवर पोहोचले आहे. पीएमपीएमएलचे दैनंदिन सरासरी उत्पन्न ६० ते ६४ लाख इतके असते. मात्र, रिक्षा संपामुळे १ मे पासून त्यामध्ये दररोज वाढ होत आहे. १ मे रोजी ते ७७ लाख, २ मे रोजी ८० लाख, तर ३ मे रोजी ते ८९ लाखावर गेले होते. पीएमपीएमएलच्या ताफ्यातील १४०० पैकी सर्वाधिक म्हणजे १२५८ बसेस आज रस्त्यावर धावत होत्या. सीएनजीसाठी अनुदान देण्याची शिफारस सीएनजी किट बसविण्यासाठी महापालिकेने रिक्षाधारकांना दोन हजार रुपयांचे अनुदान द्यावे, असे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतेच महापालिका आयुक्तांना दिले असल्याची माहिती दिलीप बंड यांनी आज दिली. एलपीजी किटसाठीही महापालिकेकडून अशाप्रकारचे अनुदान देण्यात आले होते.

‘यूपीएससी’च्या यशाचा बनतोय ‘पुणे पॅटर्न’
पुणे, ५ मे/खास प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी पुण्यातील संस्थांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असून, यंदा महाराष्ट्रातून पात्र ठरलेल्या बहुतांश उमेदवारांनी या ‘पुणे पॅटर्न’चा लाभ घेतला आहे. राज्यात पहिला आलेल्या अनिकेत मांडवगणे याचे चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी हे ‘दैवत’. साहजिकच चाणक्य मंडलमुळेच हे यश मिळाल्याचे तो सांगतो. संस्थेच्या वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत यश मिळविले, असे सचिव पूर्णा धर्माधिकारी यांनी सांगितले. ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले.

बोरिवली व औरंगाबाद मार्गावर वातानुकूलित बस सेवा
पुणे, ५ मे / विशेष प्रतिनिधी

एसटी महामंडळाने पुणे- बोरिवली आणि पुणे- औरंगाबाद मार्गावर आजपासून वातानुकूलित बस सेवा सुरु केली आहे. पिंपरी- चिंचवड मार्गे मुंबईला जाण्यासाठी आरामदायी मर्सिडिस बसची सेवाही उपलब्ध केली आहे. एसटीचे पुणे विभाग नियंत्रक शिवाजी सोनवणे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. उन्हाळ्यात प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देता यावी यासाठी पुणे- बोरिवली मार्गावर वातानुकूलित बसेसच्या दहा फेऱ्या तर औरंगाबादसाठीही दहा फेऱ्या सुरु केल्या आहेत. या बरोबरच विविध मार्गावरील वातानुकूलित बससेवांचा विस्तारही करण्यात आला आहे.

मुनीर आतार यांना काळे फासण्याच्या घटनेचा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेकडून निषेध
पुणे, ५ मे/प्रतिनिधी

पंचायत समिती मुळशी गट विकास अधिकारी घुगे यांच्या हतबलतेमुळेच मुळशी तालुक्यातील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मुनीर आतार यांना प्राथमिक शिक्षकांनी कार्यालयात धक्काबुक्की करून काळे फासण्याचा अशोभनीय व निंदनीय प्रकाराचा महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार यांना राज्य अध्यक्ष पांडुरंग बोराटे व जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटना सोपान वेताळ यांच्या नेतृत्वाखालील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट देवून लेखी निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी भ्याड कृत्य करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत लेखी पत्र देऊन चर्चा केली. या घटनेच्या वेळी तालुक्याचे प्रमुख या नात्याने गटविकास अधिकारी यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांचाही निषेध करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन्हीही बाजूंची चौकशी करून दोषी व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मतदान याद्यांतील त्रुटींबाबत तक्रार करण्याचे आवाहन
पुणे, ५ मे/प्रतिनिधी

प्रशासन यंत्रणेतील त्रुटींमुळे पुण्यातील ज्या नागरिकांना मतदान करता आले नाही अशा नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न आमदार विनायक निम्हण यांच्या कार्यालयामार्फत केले जाणार आहेत. मतदारांच्या अनेक तक्रारी असून, त्या योग्य त्या पुराव्यांसह जिल्हा प्रशासन, निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देण्याची योजना आखण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी त्यांची लेखी स्वरूपातील तक्रारी ४४६ गोपी भवन, हॉटेल शैलजाजवळ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ या पत्त्यावर आणून द्याव्यात, असे आवाहन आमदार निम्हण यांनी केले आहे.

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
पुणे, ५ मे/ प्रतिनिधी

वेतनवाढीच्या तफावतीकडे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी एक तास काम बंद आंदोलन केले. युनायटेड फोरम व बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. वेतनवाढ करताना झालेल्या तफावतीबाबत कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोणत्याची कर्मचाऱ्याने खोटय़ा प्रचाराला बळी न पडता याला तीव्र विरोध करावा, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोरपडे यांनी केले. घोरपडे यांच्यासह जिल्हा सचिव नागेशकुमार नलावडे, पुणे कॅन्टोन्मेंट विभागाचे अध्यक्ष मुश्ताक शेख, सचिव दिलीप चोरघडे आदी प्रमुखांनी या आंदोलनत सहभाग घेतला.

बडोदे मित्रमंडळाच्यावतीने सुवर्णजयंती महोत्सव
पुणे, ५ मे/प्रतिनिधी

पुणे आणि बडोदे या दोन शहरांमधील व्यक्तींमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी बडोदे मित्रमंडळ, पुणेच्या वतीने सुवर्णजयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजेंद्र माहुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या २५ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात प्रथमच कै. गंगुताई पटवर्धन स्मृती व्याख्यानमाला सुरु करण्यात आली असून, बालाजी तांबे यांच्या ‘सीमेपलीकडील बंधुत्व’ या विषयाने ती सुरू होणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून, या समारंभास जयनारायण व्यास, बालकृष्ण शुक्ला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. प्रभाकर जोशी, मेधाताई गोडबोले, नानासाहेब शितोळे, संजय दिवाणजी, सुजाता माथूर आदी उपस्थित होते.

राज्यातील सात हजार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू
पुणे, ५ मे/प्रतिनिधी

राज्यातील विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमणूक झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या २६ एप्रिल २००९ च्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली असून, राज्यातील सात हजार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत यांनी आज ही माहिती दिली. या निर्णयानुसार २००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ ही योजना लागू आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांकडून देय ठरणारे अंशदान म्हणजेच मूळ वेतन अधिक महागाईवेतन या रकमेच्या दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना वेतनातून प्रति महिना वसूल करण्यात येणार आहे. या निर्णय़ामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय संमत होण्यासाठी संघटनेचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत, कल्याण बरडे, आनंद गर्डी, प्रसाद गायकवाड, इंतकाम अहंमद, शिवाजी चव्हाण यांनी प्रयत्न केले.

भोसरीत कामगारांनी सुपरवाझरला तुडवले
पिंपरी, ५ मे / प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये मालक व कामगारांमध्ये चुगल्या करणाऱ्या सुपरवायझरला सुमारे १२ ते १४ कामगारांनी मालकाच्या कक्षामध्ये जाऊन तुडविले. याप्रकरणी कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनकुमार महेंद्रसिंग पटेल (वय ३८, रा. भागिरथी निवास, गवळीनगर, भोसरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गोविंद सिंग कारकी यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पटेल हे भोसरी एमआयडीसीतील केस निट वेअर कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी गोिवद हा मशिनवर काम करत नसल्याचे पाहून पटेल यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. पटेल यांनी त्याला मालकाच्या कक्षात बोलवून घेतले. गोविंद यांनी कामगारांना एकत्र करुन ‘पटेल मालकाचा चमचा आहे, आमच्या तक्रारी करतोस काय’ असे म्हणून लाथाबुक्क्य़ांनी हाताने मारहाण करुन खाली पाडून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव जाधव अधिक तपास करीत आहेत.

एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद
पिंपरी, ५ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी उद्या (बुधवारी) रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत महामंडळाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विलास साबळे यांनी दिली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी व व्हीएसएनएल, दिघी, एमईएस, औंध, तळवडे, चाकण, देहूरोड आदी भागातील नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा. शुक्रवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी व अपुऱ्या दाबाने होणार असल्याची नोंद नागरिकांनी ठेवावी, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

मतदान केंद्र सोयीच्या ठिकाणी असावे
नुकत्याच लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातले मतदान २३ एप्रिलला झाले. वडगावशेरी विभागात तर मतदानाने नीचांक गाठला. यामध्ये प्रामुख्याने मतदान नावनोंदणी ओळखपत्र निर्माण/ वितरण याद्यांचा घोळ इत्यादीबरोबर मतदारांना सोयीचे मतदान केंद्र देण्याऐवजी येरवडा पोस्टापासून नगरवाला शाळेसारख्या २ किलोमीटरवरच्या केंद्रावर जाण्याची सक्ती गेल्या १० वर्षांपासून केली जाते. मतदार का म्हणून हा त्रास घेतील? मतदारांना मतदानासाठी येण्यासाठी गाडी पाठवली जाते. शासकीय वसाहतीत विकासकामे करण्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींची उदासिनताही तितकीच जबाबदार आहे. लोकप्रतिनिधी या वसाहतीच्या समोरून डांबरी रस्त्यावरून भरधाव जातात तेव्हा गाडीच्या काचेतून अपूर्ण विकासकामांचा भाग नजरेआड होतो ही लोकशाहीतील प्रतारणा नव्हे काय? सोशिकपणा तरी किती ठेवणार? त्यालाही मर्यादा आहेत. वर्तमानात विजयी होणाऱ्या उमेदवाराने या समस्या विचारात घेतल्यास भविष्यात चित्र आकर्षक होईल.
विद्या गिरी, पुणे