Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

राज्य

नांदेड जिल्ह्य़ात अलीकडेच जीप-मालमोटारीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात १० जण ठार झाले. त्यानंतर पोलिसांनी नांदेड-किनवट रस्त्यावरील अवैध प्रवासी वाहतूक थांबविली. परिणामी प्रवाशांचा सगळा भार एस. टी. महामंडळावर आला आहे. अवेळी धावणाऱ्या बसगाडय़ा, त्यांची अपुरी संख्या यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते. बसस्थानकावर सध्या प्रचंड गर्दी आहे.

सोनवी पुलावरील वाहतूक कोंडी पोलिसांसाठी ठरते आहे डोकेदुखी
संगमेश्वर, ५ मे/वार्ताहर

संगमेश्वर येथील सोनवी पुलावर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने या पुलाच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही वाहतूक कोंडी सोडविताना संगमेश्वर पोलिसांची अक्षरश: दमछाक होत आहे. सध्या चाकरमानी व पर्यटक मंडळी मोठय़ा संख्येने मुंबईकडून कोकणात येत आहेत. ३० एप्रिल रोजीचे मतदान आटोपल्यानंतर हा ओघ आणखी वाढला आहे. या स्थितीत सायंकाळी ७ ते ९ यादरम्यान संगमेश्वर सोनवी पुलाजवळ सर्वात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

‘टँकरमुक्त रायगड’ ही घोषणा फसवी
पेण, ५ मे/वार्ताहर
रायगड जिल्ह्यात सध्या १३ गावे व ७५ वाडय़ांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रायगड जिल्हा परिषदेची ‘टँकरमुक्त रायगड’ ही घोषणा फसवी ठरली असून, प्रशासन व सत्ताधारी हे रायगडच्या जनतेला पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरले असल्याची टीका जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी केली.

येऊरमधील सात बंगले जमीनदोस्त
ठाणे, ५ मे /प्रतिनिधी

निवडणुकांची रणधुमाळी संपताच येऊरमधील अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली असून, आज सात बंगले जमीनदोस्त करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर येऊरमधील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा एखादा ऐरणीवर आला आहे. मागील सुनावणीदरम्यान अनधिकृत बंगले तोडण्याची कारवाई चालूच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई थांबली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्याच न्यायालयात होणार आहे.

एसटी कामगारांचा मुख्यमंत्र्यांवर ‘टेलिग्राम’चा वर्षांव!
ठाणे, ५ मे/प्रतिनिधी

राज्यभरातील एस. टी. महामंडळाच्या हजारो कामगारांच्या सहनशीलतेचा सरकार अंत पाहत असल्याने अस्वस्थ बनलेल्या कामगारांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘कामगारांचा वेतन करार त्वरित करा’ या आशयाच्या तारा पाठविण्यास सुरुवात केली असून या अभिनव अभियानास राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

साखरा फाटय़ाजवळ दोन ट्रकची
धडक; सहा वऱ्हाडी ठार, १८ जखमी
मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश
साकोली / भंडारा, ५ मे / वार्ताहर

लाखांदूर तालुक्यातील साखरा फाटय़ाजवळ मंगळवारी पहाटे दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ वऱ्हाडी ठार तर १८ जखमी झाले. मृतात तीन बालकांचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील सिलेगाव (सिहोरा) येथील वऱ्हाड लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे लग्न आटोपून ट्रकमधून परत जात असताना साखरा फाटय़ाजवळ समोरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने वऱ्हाडय़ांच्या ट्रकमधील ५ जण घटनास्थळीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विद्यार्थी मिळविण्यासाठी लाच देण्याची शिक्षकांवर वेळ
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, ५ मे

३०० रुपये पालकाला
मुलासाठी व्हीडीओ गेम
४० किलो तांदूळ
वर्षभरासाठी १० ऑटो भाडय़ाने
विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर आता विद्यार्थी मिळावेत म्हणून चक्क लाच देण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकणारे शहरातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक आज चौथीच्या निकालाच्या दिवशी प्राथमिक शाळांसमोर रांगा लावून उभे असल्याचे सर्वत्र दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढल्याने मराठी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्या. अनेक नामवंत शाळांसमोर पटसंख्या टिकवण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

सेवानिवृत्त शिक्षक वेतनापासून वंचित
अमरावती, ५ मे / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेले नसल्याने सेवानिवृत्तांमध्ये असंतोष पसरला असून अनेक वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांची स्थिती अतिशय दयनीय बनली आहे. त्याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. अनेक सेवानिवृत्त शिक्षक आपल्या मुलाबाळांपासून वेगळे राहतात. निवृत्ती वेतनावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

उपोषणार्थी विद्यार्थ्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली
संगमनेर, ५ मे/वार्ताहर

येथील सिद्धकला महाविद्यालयाने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाचा काल दुसरा दिवस होता.मात्र महाविद्यालय प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील सिद्धकला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या शिक्षण संस्थेत प्रथम वर्षांसाठी प्रत्येकी ४५ हजार रुपये शुल्क भरून तालुक्यातील २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, वार्षिक परीक्षा जवळ आलेली असताना प्रथम सत्रातीलच अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

पोलिसांना निवडणूक भत्तावाटप नाही
हिंगोली, ५ मे/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीत बंदोबस्ताचे काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापि निवडणूक भत्ता मिळाला नाही. इतर अधिकारी -कर्मचाऱ्यांना भत्ता मिळाला असून, केवळ पोलिसांना उपेक्षित ठेवल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी आहे. हिंगोली मतदारसंघात सुमारे ३३ पोलीस अधिकारी व ८५० पोलीस कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून निवडणूक कामात सहभाग नोंदविला. याचबरोबर गृहरक्षक व बाहेरून पोलीस कर्मचारी बोलावले होते. निवडप्रक्रियेत भाग घेणाऱ्या इतर विभागाचेअधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता वाटप झाला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता वाटप न केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे.

बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन
खोपोली, ५ मे/वार्ताहर
खोपोलीतील परिवर्तन सामाजिक विकास संस्थेतर्फे ९ ते १२ मे या कालावधीत ‘बुद्ध जयंती महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. ९ मे शनिवारी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या नामफलकाचे अनावरण व रुग्णांना फळवाटप, १० मे रविवारी सायंकाळी ७ वाजता ‘भगवान बुद्धां’च्या प्रतिमेची धम्म रॅली, ११ मे सोमवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणावर पूज्य भन्ते बी संघपाल यांचे ‘बुद्ध चरित्र’ या विषयावर प्रवचन, १२ मे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता ‘भगवान बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा आद्यस्रोत’ या विषयांवर नागपूरच्या रूपाताई कुलकर्णी यांचे जाहीर व्याख्यान. रात्री ८.३० वाजता मुंबईस्थित आनंद शिंदे आणि पार्टीचा करमणुकीचा कार्यक्रम, अशी रूपरेखा आहे.

भिंतीच्या खर्चावरून थोरल्या भावाचा खून
संगमेश्वर, ५ मे/वार्ताहर
सामायिक घरामध्ये घातलेल्या भिंतीचा खर्च देण्यास असमर्थता दर्शविल्याने केवळ १२ हजारांसाठीच्या भांडणाचे पर्यवसान लहान भावाने मोठय़ा भावाचा खून करण्यात झाले. ही घटना गोळवली- जांभूळवाडीमध्ये सोमवारी घडली. संगमेश्वर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. गोळवली जांभूळवाडीमध्ये धोंडू करंडे (६०) व पांडू करंडे (५०) या सख्ख्या भावांचे सामायिक घर आहे. या घरामध्ये मध्यभागी चिऱ्याची भिंत घालण्यासाठी पांडू याने पैसे खर्च केले होते. यातील १२ हजारांचा खर्च धोंडू यांनी द्यावा, यावरून दोन भावांमध्ये गेले वर्षभर वाद सुरू होता. धोंडू यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना १२ हजारांचा खर्च देणे शक्य झाले नव्हते. त्यावरून सोमवारी दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन पांडू याने धोंडूचा खून केला. याप्रकरणी पांडू व त्याच्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली