Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

क्रीडा

नाइट रायडर्स पुन्हा ‘गिऱ्हाइक’
दिल्ली ९ विकेट्सनी विजयी; अव्वलस्थानी झेप

दरबान, ५ मे / वृत्तसंस्था

कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खानला बहुतेक पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग नाही. सातत्याने पराभूत होणाऱ्या कोलकात्याचा संघ जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेला परतणार नाही, असा इशारा देत शाहरुख भारतात परतला, पण कोलकात्याला विजयाचा मुहूर्त सापडलेला नाही. कोणत्याही संघाने यावे आणि कोलकात्याच्या संघाला हरवावे इतपत हा संघ सर्वांचे ‘गिऱ्हाइक’ बनला आहे. आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध त्यांना ९ विकेट्सनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीने या विजयासह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांच्या खात्यात १० गुण आहेत.

राजस्थानचा पंजाबवर रॉयल विजय
ग्रॅमी स्मिथ सामन्यात सर्वोत्तम

दरबान, ५ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदविण्याचा मान आज गतविजेत्या राजस्थान रॉयलच्या संघाने पटकाविला आणि त्यापाठोपाठ किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ७८ धावांनी मोठा विजय मिळवून आपली घसरण रोखण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २११ धावापर्यंत मजल मारून आपल्या विजयाचा भक्कम पाया रचला. राजस्थानने ठेवलेले २१२ धावांचे आव्हान पंजाबला अजिबात पेलता आले नाही. धावांचे शतक लागण्यापूर्वीच त्यांचे सहा फलंदाज माघारी परतलेले असल्यामुळे ही लढत राजस्थानने आधीच जिंकली होती. युवराजसिंग (४८) व इरफान पठाण (१९) यांचा अपवाद वगळता पंजाबच्या मदतीला एकही फलंदाज धावून आला नाही. या दोघांनी केलेल्या प्रतिकारामुळे पंजाबने ८ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारली.

‘एक आयपीएल द्या मज आणुनी’
भारतीय महिला क्रिकेटपटूंची बीसीसीआयकडे मागणी

नवी दिल्ली, ५ मे/ पीटीआय

आयपीएलचा लखलखाट, ग्लॅमर, युवा खेळाडूंमधील पुढे आलेली सुप्त गुणवत्ता आणि प्रचंड पैसा हे सारे पाहून कोणाचे डोळे दिपणार नाहीत. प्रत्येक खेळाडूला आपल्यासाठीही आयपीएल असावी असेच वाटेल आणि त्यात काहीही गैर नाही. हे सारे यश पाहून भारतीय महिला क्रिकेटपटूंनी ‘एक आयपीएल द्या मज आणुनी’ अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे.

डेक्कन आणि मुंबईला ‘कुछ कर दिखाना है’
प्रिटोरिया, ५ मे/ पीटीआय

आयपीएलच्या या हंगामात सलग चार विजय नोंदविल्याने सर्वानाच डेक्कनचा संघाला स्पर्धेचा संभाव्य विजेता समजले जात होते. पण त्यानंतर पराभवाची हॅट्ट्रीक पदरात पडल्याने डेक्कनच्या संघाला अव्वल स्थानावर पायउतार व्हावे लागले असून त्यांचे ‘तारे जमी पर’ आले आहेत. तर दुसरीकडे अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघ आता सहाव्या साथानावर पोहोचला आहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या या दोन्हीही संघाना ‘चार्ज’ होण्याची गरज असून उद्या होणाऱ्या सामन्यात दोन्हीही संघाचे पारडे बरोबरीत दिसत आहे.

वीरू, माही माझ्यापेक्षाही तडाखेबंद - युसूफ पठाण
दरबान, ५ मे/वृत्तसंस्था

वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी हे माझ्यापेक्षा अधिक फटकेबाज आहेत, असे मत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या घणाघाती फलंदाजीने गाजविणारा युसूफ पठाण याने व्यक्त केले आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या युसूफ पठाण याने गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपल्या फटकेबाजीची छाप या स्पर्धेवर पाडली आहे. गेल्या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील कामगिरी पाहूनच त्याची भारतीय संघात निवड झाली.

खेळाडूंच्या सरावावर आयपीएलचा विपरित परिणाम
डायसन आणि फ्लॉवर यांची टीका

लंडन, ५ मे / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षांव होत असताना वेस्ट इंडिज व इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी मात्र या स्पर्धेला लक्ष्य केले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर आणि वेस्ट इंडिजचे जॉन डायसन हे दोघेही आयपीएलवर टीका केली आहे.

इंग्लंडपेक्षा ऑस्ट्रेलियाचे पारडे जड - बॉयकॉट
लंडन, ५ मे/वृत्तसंस्था
आगामी अ‍ॅशेस मालिकेत सध्या तरी ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड भासते आहे, असे मत इंग्लंडचा माजी कसोटीपटू जेफ बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. इंग्लंड संघासंदर्भात गेल्या वर्षभरात मैदानाबाहेर घडलेल्या घडामोडींमुळे आणि अँड्रय़ू स्ट्रॉस याच्या नेतृत्वाच्या मर्यादा यामुळे इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका अनिर्णीत राखण्यात यश मिळविले तर खूप होईल, असे बॉयकॉट यांनी बीबीसीच्या क्रीडा कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघात ली व सायमण्ड्स
मेलबर्न, ५ मे / पीटीआय

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज ब्रेट ली व अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमण्ड्स यांचा १५ खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त लीचा संघात समावेश केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रय़ू हिल्डिच यांनी सांगितले की, ब्रेट लीच्या प्रकृतीत वेगाने प्रगती होत असून पाकिस्तानविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यात ली खेळू शकेल.

अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसला सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान
लंडन: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस याला इंग्लंडचा २००८-०९ मधील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान देण्यात आला आहे. व्होडाफोन कंपनीतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. वेस्ट इंडिजबरोबर इंग्लंडचा पहिला कसोटी सामना या आठवडय़ात सुरू होत आहे. त्यापूर्वी हा पुरस्कार मिळाल्यामुळे स्ट्रॉसचे मनोधैर्य उंचावले आहे. स्ट्रॉसला दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ‘‘या पुरस्कारामुळे मला खूप आनंद झाला आहे. आगामी अ‍ॅशेस मालिकेकरिता मला हा पुरस्कार आत्मविश्वास उंचविणारा आहे,’’ असे ३२ वर्षीय खेळाडू स्ट्रॉस याने सांगितले.

राजस्थानचा पंजाबवर रॉयल विजय
ग्रॅमी स्मिथ सामन्यात सर्वोत्तम
दरबान, ५ मे / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदविण्याचा मान आज गतविजेत्या राजस्थान रॉयलच्या संघाने पटकाविला आणि त्यापाठोपाठ किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ७८ धावांनी मोठा विजय मिळवून आपली घसरण रोखण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २११ धावापर्यंत मजल मारून आपल्या विजयाचा भक्कम पाया रचला. राजस्थानने ठेवलेले २१२ धावांचे आव्हान पंजाबला अजिबात पेलता आले नाही.

बाद फेरीत ‘स्ट्रॅटेजी ब्रेक’ साडेसातऐवजी पाच मिनिटांचा?
नवी दिल्ली, ५ मे / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगमधील ‘स्ट्रॅटेजी ब्रेक’ वर टीका झाल्यानंतर या स्पर्धेच्या उपान्त्य व अंतिम सामन्यात या ब्रेकला कमी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी सांगितले की, अद्याप आयपीएलच्या तांत्रिक समितीने या ‘ब्रेक’बाबत निर्णय घेतला नसला तरी १५ मिनिटांचा हा ब्रेक १० मिनिटांवर आणता येईल. ते म्हणाले की, १० षटकांनंतर साडेसात मिनिटांच्या ब्रेकऐवजी प्रत्येक डावात अडीच मिनिटांचे दोन ब्रेक असतील. या दोन ब्रेकपैकी दुसरा ब्रेक घेण्याचा निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर अवलंबून असेल. त्यानुसार एका डावात एकूण ब्रेक पाच मिनिटांचा असेल. पहिला अडीच मिनिटांचा ब्रेक पहिल्या सहा षटकांनंतर घेता येईल तर दुसरा ब्रेक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपल्या सोईनुसार केव्हाही घ्यावा. साडेसात मिनिटांचा ब्रेक थोडा दीर्घ वाटतो, त्यामुळे तो पाच मिनिटांवर आणण्याचा विचार आम्ही करीत आहोत, असेही मोदी म्हणाले.

बुद्धिबळ
अरेशचेन्को अलेक्झांडर आघाडीवर

मुंबई, ५ मे/क्री.प्र.

गोरेगाव स्पोर्टस् क्लब, मालाड (प.) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीअंती युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर अरेशचेन्को अलेक्झांडर (एलो ग्रुप २६५७) याने एकटय़ाने आघाडी घेतली आहे. हा २३ वर्षांचा ग्रॅण्डमास्टर दुसरा मानांकित असून त्याने सर्व सहाही डाव जिंकून सहा गुण मिळविले आहेत. त्याने पहिल्या पटावर पांढऱ्या मोहऱ्या घेऊन भारताचा ग्रॅण्डमास्टर पाचवा मानांकित अभिजित गुप्ताचा पराभव केला.

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत
चीनचे निर्विवाद वर्चस्व
योकोहामा, ५ मे/पीटीआय

चीनच्या खेळाडूंनी पाचही विभागांत विजेतेपद मिळवित जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी हे यश लागोपाठ तिसऱ्यांदा मिळविले. बीजिंग ऑलिंपिकमध्ये पाचही विभागांत सुवर्णपदकांचा वेध घेणाऱ्या चीनने येथेही त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली.

श्रीलंका क्रिकेट संघासाठी सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती
कोलंबो, ५ मे / पीटीआय
श्रीलंका क्रिकेट संघासाठी मेजर जनरल (निवृत्त) लॉरेन्स फर्नान्डो यांची सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंवर मार्च महिन्यात लाहोर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात वाचले होते. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून श्रीलंका क्रिकेट मंडळाने १ मेपासून फर्नान्डो यांची सुरक्षा सल्लागार पदावर नेमणूक केली आहे असे मंडळाकडून येथे सांगण्यात आले. फर्नान्डो हे अतिशय कडक अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत श्रीलंकेतील दहशतवादी कारवायांवर अंकुश आणण्यात यश मिळविले होते. त्यांनी सेनाप्रमुख म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. त्यामुळेच संघासाठी तेच योग्य सुरक्षा सल्लागार आहेत असे मंडळाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

गोल्फ स्पर्धेत रशीद खानला आघाडी
गुरगाव, ५ मे / पीटीआय

रशीद खान याने ६६ पेनल्टी गुणांसह एलजी हरयाना चषक गोल्फ स्पर्धेत आज पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. करण वासुदेव व आदित्य भांडारकर यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी ७० पेनल्टी गुण आहेत. तरुण गोगोई व सूर्य विजयसिंग यांनी संयुक्तरित्या तिसरे स्थान घेतले आहे.