Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

निसर्गाकडे वळण्याची हाक देणारे ‘ग्लिम्प्सेस ऑफ नेचर’!
ठाणे/प्रतिनिधी

निसर्गविनाश असाच चालू राहिला तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढय़ा या सुंदर निसर्गसंपत्तीला मुकणार. भविष्यातील ही चिंता दूर होण्यासाठी समाजाने आतापासूनच निसर्गाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे, म्हणूनच समाजाला निसर्गाकडे वळण्याची हाक देणारे एक आगळे-वेगळे ‘ग्लिम्प्सेस ऑफ नेचर’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन तीन पर्यावरणप्रेमींनी आयोजित केले आहे.

उल्हासनगरसाठी लवकरच परिवहन सेवा !
शशिकांत कोठेकर

उल्हासनगरमधील प्रवाशांसाठी महापालिकेने लवकरच स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधा- वापरा -हस्तांतरित कराह्ण या तत्त्वावर सुरू करण्यात येणारी ही सेवा शहरातील नऊ मार्गावर पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले. फाळणीच्या वेळेस पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासित सिंधी भाषिकांसाठी उल्हासनदीच्या काठावरील जागा कँपसाठी सरकारने दिली होती. तेच आताचे उल्हासनगर म्हणून नावारूपास आले.

जकातचोरांवर आता आयुक्तांचा वॉच!
ठाणे/प्रतिनिधी :
आर्थिक मंदीमुळे महापालिकेच्या जकात वसुलीवर विपरीत परिणाम झालेला असतानाच, जकात चोरीही पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. पालिका कर्मचारी आणि जकात माफिया यांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याबरोबरच जकात चोरीवर अंकुश आणण्यासाठी सर्व नाक्यांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रणालीवर आपल्या कार्यालयातून आयुक्त स्वत: वॉच ठेवणार आहेत.
महापालिकेचा संपूर्ण आर्थिक डोलारा जकात उत्पन्नावर अवलंबून आहे.

‘शिक्षकांनी चौकस राहणे गरजेचे’
ठाणे/प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना आज जो मान आहे, तो अन्य क्षेत्रांत इतरांना अभावानेच मिळतो. त्यामुळे ज्ञानाचा विस्फोट होणाऱ्या काळात शिक्षकांनीही तत्पर व चौकस राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी येथे केले. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वर्तकनगर माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बोरवणकर, शिक्षण उपसंचालक वानखेडे, कवयित्री डॉ. सिसिलिया काव्र्हालो, तात्या जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

परदेशातील शैक्षणिक संधींविषयक परिसंवादास चांगला प्रतिसाद
डोंबिवली/ प्रतिनिधी

सध्याच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च शैक्षणिक संधींचा लाभ घेतल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल.
भारतातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण मर्यादित ठेवू नये, असा सल्ला परदेशातील उच्च शिक्षणातील तज्ज्ञ सुनील शहा यांनी दिला. ओंकार फाउंडेशन ट्रस्ट आणि श्रीगणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशातील उच्च शिक्षणाची संधी’ या विषयावर शुभमंगल सभागृहात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मध्यमवर्गीयांना परदेशातील शिक्षण महाग वाटते, पण परदेशातील शिक्षणासाठी ७५ ते १०० टक्के शिष्यवृत्ती मिळते. इंजिनीयरिंगसाठी चार वर्षांत ८ ते १० लाख रुपये परदेशात खर्च होतात, तर भारतातही तेवढाच खर्च येतो. शिवाय परदेशातील विद्यापीठाचा दर्जा उत्तम आहे. तेथे चांगले संशोधन होते. भारतातून दरवर्षी दीड लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, असेही त्यांनी सांगितले. ‘माहिती व तंत्रज्ञानातील ग्लोबल सर्टिफिकेटचे महत्त्व’ या विषयावर हर्षल कुलकर्णी यांनी, तर ‘व्यवस्थापनातील करियर’बद्दल जेफरसन सटिक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पांडुरंग पाटील यांना प्रकाश परांजपे पुरस्कार
ठाणे/प्रतिनिधी :
स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रातर्फे सामाजिक कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या खासदार प्रकाश परांजपे पुरस्कारासाठी यंदा पालिका सभागृह नेते पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे. सावरकर केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा केंद्राचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केली असून, २८ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रासाठी डॉ. विद्याधर ओक, सामाजिक कार्यासाठी शिवराम घैसास, क्रीडा क्षेत्रासाठी प्रणाली मांडवकर तर शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल समर्थसेवक मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी अभ्यासूवृत्तीने शहरासाठी काम करावे, यासाठी यंदापासून दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्यात आला असून, पहिल्याच पुरस्कारासाठी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आल्याचे ठाणेकर म्हणाले.

सोनसाखळी हिसकावून गोळीबार करणाऱ्या लुटारूस अटक
भिवंडी/वार्ताहर:
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाविंद्रा येथील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुटारूंचा धाडसी तरुणाने पाठलाग केला असता, त्याच्यावर गावठी कट्टय़ातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र सुदैवाने तो बचावला. ग्रामस्थांच्या मदतीने लुटारूस पोलिसांनी पकडले असून, त्यास अटक करण्यात आली आहे. चाविंद्रा गावात राहणारी ध्रुपदाबाई लुखा पाटील (६०) ही महिला गावातील नातेवाईकांकडे हळदी समारंभासाठी जात होती. त्याचवेळी मोहम्मद हुसेन कयुम शेख (२०, रा. किडवाईनगर, नागाव) या लुटारूने ध्रुपदाबाईच्या गळयात असलेल्या तीन तोळ्यांच्या सोनसाखळीस हिसका मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या महिलेने आरडाओरडा केल्याने जवळच उभ्या असलेल्या शिवाजी बाळाराम पाटील (२२, रा. चाविंद्रा) या धाडसी तरुणाने लुटारूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, लुटारू मोहम्मद याने शिवाजीच्या दिशेने गावठी कट्टय़ातून दोन गोळ्या झाडल्या, मात्र सुदैवाने गोळ्यांचा वेध चुकल्याने शिवाजी बचावला. लुटारू मोहम्मद हा नारायण कंपाऊंडच्या बाजूला लपून बसला होता. ग्रामस्थांनी त्याला घेराव घालून पोलिसांना पाचारण केले.

निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आणि परिसंवाद
डोंबिवली/प्रतिनिधी

ठाणे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लबच्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शन डोंबिवलीतील कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ८ ते १० मे दरम्यान सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांबरोबर दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम शनिवार, ९ मे रोजी आंबेडकर सभागृहाखाली, महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात वसंत डावखरे, आनंद परांजपे, वैशाली दरेकर आणि युसुफ खान हे उमेदवार सहभागी होणार आहेत. कोणत्याही राजकीय अथवा वादग्रस्त प्रश्नांखेरीज उमेदवारांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. उमेदवाराचा प्रचार, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम, ताणतणाव, निकालांच्या अपेक्षा आदी विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. या उमेदवारांशी संवाद साधतील पत्रकार केतन दुर्वे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

क्रिएटिव्ह समर कॅम्पचा समारोप
डोंबिवली / प्रतिनिधी

अंबरनाथच्या लोकनगरी क्लब हाऊस आणि नवरे नगर वसाहतीत झालेल्या १५ दिवसांच्या क्रिएटिव्ह समर कॅम्पमधील अनोख्या अनुभवांची शिदोरी घेऊन ५५ ते ६० मुले-मुली आता घरी परतली आहेत. या समर कॅम्पचा समारोप कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मीना गोडखिंडी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी नेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आणि सहभागी झालेल्या बालगोपाळांचे भरभरून कौतुक केले. गायिका वंदना देशमुख आणि नृत्यांगना नीलिमा मराठे यांनी आयोजित केलेल्या समर कॅम्पमध्ये ६ ते १४ वयोगटातील ६० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. चित्रकला, हस्तकला, रांगोळी, मेंदी काढणे यासारख्या कला शिकण्याबरोबरच सूर्यनमस्कार, योगासने, संगीत तसेच स्नॅक्समेकिंगही मुलांना शिकायला मिळाले. प्रोटिनयुक्त भेळ, पौष्टिक सॅण्डविच, कडधान्याच्या कोशिंबिरी कशा बनवायच्या, याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. त्याशिवाय वाद्यवादन आणि गायनकला दाखविण्याची संधी मुलांना मिळाली. फक्त खेळ आणि छंद जोपासणे एवढेच न करता स्नॅक्समेकिंग, योगासने शिकविल्यामुळे हा समर कॅम्प वैशिष्टय़पूर्ण ठरला.