Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

विद्यार्थी मिळवण्यासाठी लाच देण्याची शिक्षकांवर वेळ
देवेंद्र गावंडे,चंद्रपूर, ५ मे

तीनशे रुपये पालकाला
मुलासाठी व्हीडीओ गेम
४० किलो तांदूळ
वर्षभरासाठी दहा ऑटो भाडय़ाने
विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर आता विद्यार्थी मिळावेत म्हणून चक्क लाच देण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकणारे शहरातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक आज चौथीच्या निकालाच्या दिवशी प्राथमिक शाळांसमोर रांगा लावून उभे असल्याचे सर्वत्र दिसून आले.

बुलढाणा जिल्हावासीयांचा पाण्यासाठी आर्त टाहो!
बुलढाणा, ५ मे / प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांत बुलढाणा जिल्ह्य़ातील पाणी टंचाई निवारणार्थ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांवर २६ कोटी वीस लक्ष रुपयांहून अधिक खर्च होऊन देखील जिल्ह्य़ातील ग्रामीण भाग हा तहानलेलाच आहे. जनता पाण्यासाठी आर्त टाहो फोडत असताना टंचाई निवारणाचा पांढरा हत्ती हा केवळ अधिकारी व कंत्राटदारांसाठीच जातो की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बुलढाणा जिल्हा पाऊस अवर्षणामुळे गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईच्या विळख्यात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील १२१९ गावांपैकी सुमारे १०५० हून अधिक गावात हे तीव्र पेयजल संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना वन खात्याच्या अधिकाऱ्यास अटक
सावनेर, ५ मे / वार्ताहर

शेतातील झाडे कापण्याचा परवाना देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारताना खापा येथील वनखात्याच्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. जयंत भानुदास टेकाडे (५१) असे लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो बोरगाव (बु), तह-कळमेश्वर येथील रहिवासी आहे. सावनेर तालुक्यातील ठकारा येथील शेतकरी श्रीकृष्ण खुशाल रुंगे यांची ठकारा शिवारात शेती आहे.

पर्यावरण शिबिरात ४० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
साकोली, ५ मे / वार्ताहर

स्थानिक कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत ग्लोबल नेचर व इको क्लबतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १० दिवसीय पर्यावरण, पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण शिबिराचे उद्घाटन संस्था सचिव विद्या कटकवार व कॉन्व्हेंटचे प्राचार्य दर्शन कटकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिबिराचे यंदाचे नववे वर्ष होते. या पर्यावरण शिबिरातून दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पक्षीमित्र, सर्पमित्र व निसर्गमित्राचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत ४०० हून अधिक विद्यार्थी हे निसर्गप्रेमी विद्यार्थी म्हणून तयार झाले आहेत, असे नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे संस्था सचिव विद्या कटकवार यांनी शिबिरांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणार्थ झटण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

शस्त्रक्रियेने बालिकेला जीवदान
चंद्रपूर, ५ मे /प्रतिनिधी

प्रसुतीनंतर एका महिलेने बालिकेला जन्म दिला. मात्र जन्मजात पोटाचा पडदा न बनल्याने बालिकेच्या आतडय़ा बाहेर होत्या. मृत्यूच्या दाढेत असलेल्या बालिकेवर जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. रोशन भिवापूरकर यांनी जोखीम पत्करून अडीच तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे बालिकेला जीवदान मिळाले आहे. दहा लाख बालकांमध्ये ‘ग्रेडर ओमफ्लोसिल’ आजाराचा एखादा बालक आढळतो. जिल्हा रुग्णालयात प्रथमच अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली.

हिंगणघाटात रक्तदान शिबीर
हिंगणघाट, ५ मे / वार्ताहर

रोटरी क्लबद्वारे प्रांतपाल राजेंद्र सिंघई यांच्या ६४ व्या वाढदिवसाच्या पर्वावर रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राजेंद्र सिंघई यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत मोहता व डॉ. अशोक मुखी व्यासपीठावर उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. रमेश राका यांनी केले. यावेळी साईनाथ रक्तपेढीचे डॉ. आशीष खंडेलवार यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. या शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी महेश अग्रवाल, सुरेश चौधरी, अशोक डालिया, भूपेंद्र शहाणे, एस.एस. पठाण व डॉ. संदीप मुडे यांनी सहकार्य केले.

मराठा आरक्षणासाठी जनजागरण मोहीम
अकोला, ५ मे / प्रतिनिधी

ओबीसींमध्ये समाविष्ट न करता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी, तीव्र लढा उभारण्याचा निर्णय माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांनी घेतला असून, यासाठी विदर्भात सर्वत्र जनजागरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तीव्र मोहीम राबविण्याचा निर्णय अकोल्यात घेण्यात आला आहे. यासाठी माजी आमदार जगन्नाथ ढोणे, आमदार हरिभाऊ भदे, बालमुकुंद भिरड, करामतशाह आदींनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी विदर्भात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या बैठका घेतल्या जाणार असून, लवकरच या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. ओबीसीमध्ये समाविष्ट न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या भूमिकेतून अकोल्यातून आंदोलनाला सुरुवात होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा जनतेची गळचेपी सुरू असल्याचा आरोप डॉ. ढोणे यांनी केला आहे.

हिंगणघाटात राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे लोकार्पण
हिंगणघाट, ५ मे / वार्ताहर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या पर्वावर येथील तुकडोजी वॉडॉत राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे लोकार्पण पार पडले. ३० एप्रिलला संत वासुदेव महाराज यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या पुतळ्याची स्थापना सनी पटेल यांनी त्यांचे पिता अशोक पटेल यांच्या स्मरणार्थ केली. हा पुतळा मूर्तीकार हरिभाऊ पेंढे यांनी तयार केला.
यावेळी रावजीभाई पटेल यांच्या जवळ असलेल्या तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका, अस्थिकलश व महाराजांनी दिलेला चंदनाचा हार लोकदर्शनासाठी ठेवण्यात आला. पटेल परिवाराने जाम तसेच हिंगणघाट येथे मुख्यमार्गावर संत तुकडोजी वॉर्डात महाराजांचे पुतळे उभारली आहेत. कार्यक्रमाला पटेल परिवारातील सदस्य हरिहर मे. पेंदे, अनिल भोंगाडे, राजेश कोचर, अभिजीत डाखोरे, डॉ. संजय हिवरकर, प्रा. डॉ. सरिता पुंजे उपस्थित होते.

सामूहिक सोहोळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध
ब्रह्मपुरी, ५ मे / वार्ताहर

धम्मप्रचार केंद्राच्या वतीने ‘धम्मभूमी’ येथे झालेल्या सामूहिक विवाह सोहोळ्यात विविध धर्माच्या २१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. १४ जोडप्यांचे विवाह बौद्ध पद्धतीने तर ७ जोडप्यांचे हिंदू पद्धतीने पार पडले. पंचम आखरे यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने उद्घाटन पार पडले. त्यानंतर, बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, म. फुले व शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रा. राजेश कांबळे, बाजार समितीचे सभापती खेमराज तिडके, गणपत शिवणकर, पुरुषोत्तम भिसीकर व नेताजी मेश्राम आदींनी पुष्पांजली अर्पण केली. पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रेमलाल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रेमलाल यांनी केले. सामूहिक विवाह सोहोळे राजकारणासाठी नव्हे, तर समाजिक ऋण फेडण्यासाठी आयोजित करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद वानखेडे यांनी ‘व्यथा निळ्या-पाखरांची’ हा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला. संचालन डी.एम. रामटेके यांनी केले. आभार यू.के. लांजेवार यांनी मानले. या कार्यक्रमास हंसराज वासनिक, वाय.आर. मेश्राम, खुशाल डांगे, रामदास गायकवाड, मनोहर मेश्राम, मनोज गायकवाड, आनंद मेश्राम आदी उपस्थित होते.

नेत्ररुग्णांना दृष्टी मिळवून देण्याचा संकल्प
अकोला, ५ मे / प्रतिनिधी

कमलकिशोर बियाणी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ३१ गरजू नेत्ररुग्णांना दृष्टी मिळवून देण्याचा संकल्प कलाश्रय संस्थेचे संस्थापक डॉ. राजीव बियाणी यांनी केला आहे.
बियाणी परिवाराने याआधीही अनेक नेत्ररुग्णांच्या लेन्सची शस्त्रक्रिया केली आहे. कमलकिशोर बियाणी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ३१ नेत्ररुग्णांना दृष्टी मिळवून देण्याचा संकल्प राजीव बियाणी यांनी केला आहे. त्यांच्या या समाजकार्यात उमादेवी बियाणी, सुजाता बियाणी, राजश्री जाजू, सत्यनारायण रांदड, श्रीकांत मालपाणी, नारायण भाला, संजीव पारेख, ईश्वर गट्टानी, अनिल भुतडा, श्यामसुंदर मालपाणी, मनोहर खंडेलवाल आदींनी सहभाग घेतला आहे.

स्वाईन फ्ल्यूची दहशत, आरोग्य यंत्रणा सतर्क
अकोला, ५ मे/प्रतिनिधी

स्वाईन फ्ल्यू या जीवघेण्या साथीच्या आजाराची दहशत जगभरात पसरली असून, या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. भारतात अद्याप स्वाईन फ्ल्यूची लागण झाली नसली तरी आवश्यक ती काळजी घेण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
स्वाईन फ्ल्यूची दशहत सध्या सर्वत्र पसरली आहे. विदेशात याची मोठय़ा प्रमाणात लागण झाली असली तरी, भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, हैद्रराबाद आणि कोची येथे विदेशातून आलेल्या तिघांमध्ये अशा प्रकारची लक्षण आ ढळली आहेत. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये जर्मनी, कॅनडा आणि ब्रिटनहून आलेल्या रुग्णांचा समावेश आहे. या जीवघेण्या आजारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने मात्र अद्याप या प्रकारचा कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तरीही दक्षता घेण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परिसरात विदेशी व्यक्ती आल्यास आणि ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे त्यामध्ये आढळल्यास तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहाव्या वेतन आयोगासाठी राज्यातील प्राध्यापकांची १५ जूनला ‘निदर्शने’
यवतमाळ, ५ मे / वार्ताहर

नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचे प्रश्न सोडविणे आणि सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन श्रेणी (चढ्ढा समितीची शिफारस) प्राध्यापकांना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व प्राध्यापक १५ जूनला त्या त्या विभागातील उच्च शिक्षण, सहसंचालकाच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. सर्व विभागांचे दुपारी चार वाजता ही निदर्शने होणार आहेत. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने(एम फुक्टो) मंजूर केलेल्या ठरावानुसार ही निदर्शने होणार आहेत. निदर्शनाबाबत तसेच सविस्तर मागण्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘नुटा’ तसेच राज्यातील इतर विद्यापीठांमधील सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हावार मेळावेही आयोजित आहे. यवतमाळ ६ मे रोजी असा मेळावा कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ‘नुटा’ अध्यक्ष प्रा. बी.टी. देशमुख व सचिव डॉ. एकनाथ कठाडे उपस्थित राहणार आहेत.

चोरटय़ांनीच केले ‘सावधान’चे फलक कापून सावधान!
यवतमाळ, ५ मे/ वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या सूचना फलकांचे लोखंडी ‘एंगल्स’ कापून लंपास करण्याचा सपाटा चोरटय़ांनी लावला आहे. त्यासाठी आधी फलक वाकवून ठेवायचे नंतर ते कापून न्यायचे अशी शक्कल त्यांनी लढवली आहे. यवतमाळ- धामणगाव मार्गावर तर ‘हळू चाला सावधान’ पुढे वळण रस्ता आहे. वेग मर्यादा २० अशा मजकुराचे जेवढे म्हणून लोखंडी सूचना फलक होते ते जवळ जवळ सारेच चोरटय़ांनी कापून नेले आहेत. चोटऱ्यांनी जणू काही ‘आम्ही कापून नेतो, तुम्हीच व्हा सावधान’ असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे.
दिवसा ढवळ्या सार्वजनिक मालमत्तेची अशी चोरी होत असली तरी पोलिसांकडे मात्र चोरीची तक्रार नसल्याचे समजते. तक्रार करून ‘आ बैल मुझे मार’ ची पोलिसांची झंझट कोण मागे लावून घेणार? असाच कदाचित अनुभव असेल.