Leading International Marathi News Daily

बुधवार, ६ मे २००९

विविध

‘से नो टू बंगलोर अ‍ॅण्ड येस टू बफेलो’; ओबामांचा नवा मंत्र
वॉशिंग्टन, ५ मे/पीटीआय

‘से नो टू बंगलोर अ‍ॅण्ड येस टू बफेलो.’ हा नवा मंत्र दिला आहे, मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याकरिता जीवापाड प्रयत्न करणारे त्या देशाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी.. बंगलोरसारख्या ठिकाणी आपल्या कामांचे आऊटसोर्सिग करणाऱ्या अमेरिकेतील कंपन्यांना देण्यात येणाऱ्या करसवलती बंद करण्याची घोषणा बराक ओबामा यांनी सोमवारी केली. अशा रीतीने अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची ओबामा यांनी पूर्तता केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विषारी दारूने ११ जणांचा मृत्यू
कोलकाता, ५ मे/पीटीआय

पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे ११ जण मरण पावले तर अन्य ३० जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूकांडाची चौकशी करण्याचे आदेश पश्चिम बंगाल सरकारने दिले आहेत. अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मृतांची संख्या २४ वर पोहोचल्याचे व १०० जणांना कोलकाता व ताल्मुक जिल्ह्यातील रुग्णालयांत दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. पण या माहितीला दुजोरा मिळू शकलेला नाही.

मुंबई हल्लाप्रकरणी पाच दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानी न्यायालयात पुरावे सादर
इस्लामाबाद, ५ मे/पीटीआय

मुंबईमध्ये गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोपावरून अटक केलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या पाच दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानी पोलिसांनी दहशतवादविरोधी न्यायालयात आज पुरावे व चलान (आरोपपत्र) सादर केले.
दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश सखी मुहम्मद काहूत यांच्या समोर हे पुरावे सादर करण्यात आले. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या पाच दहशतवाद्यांना सध्या कडक सुरक्षा व्यवस्थेत रावळपिंडी येथील अदियाला कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी होत आहे.

विमाधारकाच्या अनुमतीशिवाय पुढील तारखेची
पॉलिसी काढण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई
नवी दिल्ली, ५ मे/पीटीआय
विमाधारकाच्या परवानगीशिवाय कोणतीही विमा कंपनी भविष्यकाळातील तारीख टाकून संबंधित विमाधारकाला विमा पॉलिसी देऊ शकणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भविष्यकाळातील तारखेपासून पॉलिसी द्यायची असेल तर विमा कंपनीने एकतर्फी निर्णय न घेता विमाधारकाची त्यासाठी अनुमती घेणे आवश्यक आहे,

पाकिस्तानमध्ये १५ तालिबानी ठार
इस्लामाबाद, ५ मे/पी.टी.आय.

तालिबान्यांविरोधातील मोहीम पाकिस्तानी लष्कराने आज आणखी तीव्र केली असून, स्वात खोऱ्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याचे आवाहन सरकारने केले. दरम्यान, लष्करी कारवाईत स्वात खोऱ्यातील आदिवासी भागात १५ तालिबानी ठार झाल्याचा दावा लष्कराने केला आहे.

‘काश्मीरप्रश्नी भारतावर अमेरिकेचे दडपण येण्याची शक्यता’
नवी दिल्ली, ५ मे/पीटीआय

ओबामा सरकारने पाकिस्तानवर अमेरिकेने लक्ष केंद्रित केल्यामुळे काश्मीर प्रश्नी भारतावर दडपण येण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी म्हटले आहे. पाकिस्तान हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासमोरील यक्षप्रश्न आहे असे सांगून ब्लॅकविल म्हणाले की, पाकिस्तानला उत्तम सहकार्य करण्याची भूमिका ओबामा सरकारने स्वीकारली आहे.

तुर्कस्तानात ४४ ठार
मार्दिन (तुर्कस्तान), ५ मे/एपी

तुर्कस्तानमधील ग्रामीण भागात साखरपुडय़ाच्या समारंभात गोळीबार करून ४४ जणांना ठार मारणाऱ्या आठ बंदूकधाऱ्यांना सुरक्षारक्षकांनी अटक केली. मार्दिन शहराजवळ बिल्गे नावाच्या गावात काल, सोमवारी रात्री साखरपुडय़ाचा कार्यक्रम सुरू असताना काही बुरखाधारी हल्लेखोर स्वयंचलित शस्त्रांसह आतमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

कौटुंबिक समारंभात अंदाधुंद गोळीबार; तुर्कस्तानात ४४ ठार
मार्दिन (तुर्कस्तान), ५ मे/एपी

तुर्कस्तानमधील ग्रामीण भागात साखरपुडय़ाच्या समारंभात गोळीबार करून ४४ जणांना ठार मारणाऱ्या आठ बंदूकधाऱ्यांना सुरक्षारक्षकांनी अटक केली. मार्दिन शहराजवळ बिल्गे नावाच्या गावात काल, सोमवारी रात्री साखरपुडय़ाचा कार्यक्रम सुरू असताना काही बुरखाधारी हल्लेखोर स्वयंचलित शस्त्रांसह आतमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात ४४ जण मारले गेले. कौटुंबिक पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज अंतर्गत व्यवहारमंत्री बेसीर अटाले यांनी व्यक्त केला आहे. या भागामध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तेथील आदिवासी जमाती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यात नेहमीच तंटे सुरू असतात. आज सकाळी हल्ल्यात ठार झालेल्यांचा दफनविधी करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी मृत व्यक्तींचे मित्र आणि नातलगांना घटनास्थळी येण्यास परवानगी दिली, मात्र पत्रकारांना मनाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांनी या गावातील टेलिफोनच्या लाईन्सही कापून टाकल्या होत्या. मृतांमध्ये साखरपुडा झालेल्या मुलगा-मुलीचा समावेश आहे. घटना घडली तेव्हा तेथील प्रथेनुसार पुरुष आणि महिला स्वतंत्र खोल्यांमध्ये प्रार्थना करीत होते.

चार कि.मी. परिसरात प्रभाकरनला घेरले
कोलंबो, ५ मे / पी.टी.आय.
लिट्टेचा सर्वेसर्वा वेलुपिल्लई प्रभाकरन याला श्रीलंकेच्या सुरक्षा दलांनी पूर्णपणे घेरले असून या वेढय़ातून तो निसटण्याची शक्यता आता नाहीत, असा दावा श्रीलंकेचे पंतप्रधान रत्नासिरी विक्रमनायके यांनी आज संसदेत बोलताना केला. प्रभाकरनला कोणत्याही परिस्थितीत निसटू न देण्याची खबरदारी सुरक्षा दले घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकरन ४ किमी परिसरातील सध्या घोषित करण्यात आलेल्या ‘नो फायर झोन’ मध्ये दडलेला आहे. या संपूर्ण परिसर सशस्त्र सुरक्षा दलांनी घेरलेला असल्याने त्याला निसटण्याची संधी मिळणे अशक्य आहे. त्याला शरण येणे वा मरणे भाग आहे. तामिळ निर्वासित बनून किंवा रुग्ण बनून तो पळून जाण्याची शक्यताही आता उरलेली नाही. प्रभाकरन आणि त्याचे विश्वासू सहकारी याच भागात असलेयाची शक्यता श्रीलंका लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच व्यक्त केली होती. त्याला पंतप्रधान विक्रम सिंग यांच्या विधानाने पुष्टी मिळाली आहे.

ओरिसात विषारी दारूचे चार बळी
भुवनेश्वर, ५ मे / पी.टी.आय.

विषारी दारू प्यायल्याने चार लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ओरिसात घडल्याने खळबळ माजली आहे. अन्य २९ लोक अस्वस्थ असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.