Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

व्यापार - उद्योग्

नेक्सजेनकडून पुन्हा ‘शुगर एशिया २००९’ प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी:
अत्यंत प्रतिष्ठित म्हणून गणल्या जाणाऱ्या शुगर एशियाच्या द्वितीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन यंदा दिल्ली येथील प्रगती मैदान येथे २ ते ४ जुलै २००९ दरम्यान, करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या प्रदर्शनाला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीपर यंदाच्या प्रदर्शनातही यंत्रसामग्रीचे उत्पादक आणि पुरवठा, तंत्रज्ञान विकसित करणारे आणि त्याचा प्रसार करणारे, तसेच सेवा पुरविणारे व इतर लोकही या प्रदर्शनाला मोठय़ा संख्येने भेट देतील, अशी अपेक्षा आहे. साखर उद्योग आणि त्याच्याशी संबंधित इतर उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यांचे आविष्कार यांना लोकांपुढे आणण्यासाठी शुगर एशिया २००९ एक वैशिष्टय़पूर्ण व्यासपीठ म्हणून काम करते. त्याचप्रमाणे तयार उत्पादनांचे उत्पादक आणि विक्रेते, तसेच उसाच्या नवीन आणि विकसित प्रजातींसाठीदेखील हे प्रदर्शन म्हणजे एक सामाईक व्यासपीठच आहे. याशिवाय, ऊस पिकविण्याच्या व कापण्याच्या नवनवीन पद्धती यांविषयीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठीचीही दुर्मिळ संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे. तसेच इथेनॉल डिस्टिलेशन व त्याचा वीजनिर्मितीसाठीचा वापर आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे यासंबंधीचे तंत्रज्ञान व उत्पादनं यांचंही प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजक, नेक्सजेन एक्झिबिशन्सचे संचालक व्ही. के. बन्सल यांच्या मते, शुगर एशिया प्रदर्शनाद्वारे साखर कारखाने आणि डिस्टिलरी यांच्या मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि सेवांच्या विक्रेत्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध होते. या निमित्ताने जगभरातील तज्ज्ञांकडून शिकण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध होते. तिसरे वैशिष्टय़ म्हणजे, कार्यक्रमाची डिरेक्टरीद्वारे सर्व ग्राहकांपर्यंत पोहचणे शक्य होते आणि शेवटचे वैशिष्टय़ म्हणजे प्रायोजकांना त्यांच्या नेमक्या ग्राहक वर्गासमोर जाण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळते. केंद्रीय न्यू अॅण्ड रीन्युएबल एनर्जी मंत्रालय, नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. इथेनॉल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पेपर प्रॉडक्टस्च्या तिमाही नफ्यात ३८% वाढ
व्यापार प्रतिनिधी:
फ्लेक्झिबल पॅकेजिंग कंपनी असलेल्या दि पेपर प्रॉडक्टस् लिमिटेडने नुकतेच वित्तीय लेखा परीक्षण न झालेला ३१ मार्च २००९ रोजी संपलेला पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. कंपनीने १४२ कोटी १७ लाख रुपयांची निव्वळ विक्री केली. यात २००८ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १.९ टक्के घट झाली आहे. कंपनीला १६.०१ कोटी रुपये करपूर्व नफा झाला असून, यात ३८.५ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येकी समभागामागे मिळकत रुपये १.५० वरून वाढून १.७६ झाली. २०८ च्या चौथ्या तिमाहीअखेरीस याचे प्रमाण ०.६१ रुपये होते. काही कच्च्या मालांच्या किमती उतरल्यामुळे, उत्पादनांच्या किमती कमी कराव्या लागल्या, अशी विक्रीत घटीची कारणमीमांसा कंपनीने केली आहे.

प्रभाकर देव ग्रीव्हज् कॉटनचे नवे सीईओ
व्यापार प्रतिनिधी:
ग्रीव्हज् कॉटन लिमिटेडने आपल्या व्यवस्थापकीय संचालक तसेच सीईओ पदावर प्रभाकर देव यांची नियुक्ती घोषित केली आहे. इंजिन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्सच्या निर्मितीतील आघाडीचे स्थान कायम राखण्यासाठी कंपनीने आखलेल्या महत्त्वाकांक्षा विस्तार योजनेला चालना देण्याची त्यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी राहील. एक वर्षांपूर्वी सह-व्यवस्थापकीय संचालकपदावर देव हे ग्रीव्हज् कॉटन कंपनीत रुजू झाले होते. आयआयएम, अहमदाबादमधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देव यांच्याकडे विविध कंपन्यांत वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

नोकियातर्फे अत्याधुनिक ‘कन्सेप्ट सेंटर’
व्यापार प्रतिनिधी:
आपल्या ग्राहकांचा मोबाईल अनुभव अधिक सुधारित करण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने नोकियाने आज मुंबईत आपल्या नवीन ‘कन्सेप्ट दालना’चे उद्घाटन केले. हे दालन नोकियाच्या जागतिक ‘कन्सेप्ट दालना’च्या आराखडय़ावर आधारित आहे आणि ते शहरातील कुलाबा या खरेदीसाठी अत्यंत प्रसिद्ध व प्रतिष्ठेच्या गणल्या गेलेल्या भागात आहे. १००० चौ. फुटांच्या प्रशस्त जागेत असलेले हे जागतिक दर्जाचे इंटरअॅक्टिव्ह व माहिती देणारे दालन म्हणजे मोबाईल फोनच्या ग्राहकांना साधने व सेवांसहित र्सवकष आणि अद्ययावत मोबाईलविषयक सर्व उत्तरे ‘वन स्टॉप’ ठिकाण असेल. विक्रीचे सर्व पैलू पुरविण्यासाठी आणि त्याद्वारे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक परिपूर्ण व आनंददायक करण्यासाठी या नोकिया ‘कन्सेप्ट दालना’चे रूप एकसमान आणि सातत्यपूर्ण असेल. देशातील अशा प्रकारचे नववे असलेले हे मुंबईमधील नोकिया ‘कन्सेप्ट दालन’ ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभवातून नोकियाची अद्ययावत उत्पादने आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. नोकिया ‘कन्सेप्ट दालन’ ईमेल, संगीत, इमेजिंग व खेळ यांसहित नोकियाची उपकरणे, साधने आणि सेवांची संपूर्ण श्रेणी देऊ करते.