Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

अग्रलेख

चौथा तडाखा!

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत जी उत्तरे दिली, त्याने भल्याभल्यांची गाळणच उडाली आहे. राहुल गांधी गेल्या महिन्यात केरळमध्ये कोचीला एका छोटेखानी पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यानंतर या प्रचार मोहिमेतली त्यांची पत्रकारांना थेट सामोरे जायची ही तिसरी वेळ, पण ज्या आत्मविश्वासाने त्यांनी ही फलंदाजी केली ती लक्षात घेता त्यांच्या वयाएवढी वर्षे निव्वळ

 

राजकारणात घालवणारे आणि या खेपेला काहीही करून पंतप्रधानपद मिळवायचेच, अशी सुप्त इच्छा बाळगणारे अनेकजण आपल्या तपश्चर्येचे हेच का फळ, म्हणून नशिबालाच दोष देऊ लागले असतील तर त्यात नवल नाही. लालकृष्ण अडवाणींपासून शरद पवारांपर्यंत बहुतेकांना हा जबर झटका आहे. आधी सोनिया गांधींनी ‘आजकाल बऱ्याचजणांना पंतप्रधानपद हवे आहे,’ असे सांगून या ‘बऱ्याचजणां’ची पंचाईत करून ठेवली. मग प्रणव मुखर्जीनी पवारांच्या पक्षाचा नामोल्लेखही न करता जेमतेम दहा जागा मिळवू शकणारा पक्ष पंतप्रधानपदाचा दावेदार कसा बनू शकतो, असा प्रश्न करून पवारांच्या भिरभिरत्या चाकाला पंक्चर करून टाकले. त्यानंतर खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पवार वा पवारांची पाटीलकी करणारे कुणी काय म्हणतात, त्याची दखलही न घेता ‘काँग्रेसने पंतप्रधानपदाचा आपला उमेदवार जाहीर केला आहे,’ असे सांगून तरीही कुणाच्या डोक्यात तशी हवा असेल तर तीही काढून टाकली. त्यावर कडी केली ती राहुल गांधींनी. त्यांनी एकाच वेळी सर्वच महत्त्वाकांक्षी मंडळींचे पंख छाटून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. यात भाजप आला, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आली, लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि रामविलास पासवानांचा लोकजनशक्ति पक्षही आला. ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’चे अस्तित्व हे केवळ भाजपच्या मनातच आहे, असे सांगताना त्या आघाडीत असणाऱ्या नीतिशकुमारांच्या बिहारमधल्या विकासकामांची त्यांनी तरफदारी केली. जे मोठमोठय़ा राजकारण्यांना जमत नाही, ते त्यांनी केले आणि भाजपप्रणित आघाडीत होणाऱ्या संभाव्य भूकंपाची ‘रिश्टर स्केल’ वर नोंद केवढी असेल, त्याचे आधीच भाकित करून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी संख्येने सर्वात मोठा पक्ष बनू द्या, मग पंतप्रधानपदाचा पर्याय त्यांच्यासाठी स्वाभाविकच खुला राहील, असे सांगताना त्यांनी डाव्यांनाही फटकारले. डाव्यांचे १८० ते १९० च्या आसपास उमेदवार निवडून आले तर आम्हीच त्यांना पाठिंबा द्यायला पुढे येऊ, असे सांगून त्यांनी ती शक्यता नसल्याचे सूचित केले. ज्यांना कुणाला उडय़ा मारायच्या असतील, तर त्यांना अडवणारे आपण कोण, हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मार्क्‍सवाद्यांचे अध्वर्यू प्रकाश करात, सीताराम येचुरी असोत, की भारतीय कम्युनिस्टांचे ए. बी. बर्धन, सगळ्यांचीच गणिते कशी कच्ची आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सध्या त्यांच्या आणि तिसऱ्यांच्या आघाडीत असणाऱ्या एन. चंद्राबाबू नायडू आणि जयललिता यांच्याही कर्तबगारीला चुचकारायला ते विसरलेले नाहीत. त्यामुळे एम. करुणानिधींचा द्रविड मुन्नोत्र कळघम आता काँग्रेसवर रुसणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या आज होणाऱ्या, मतदानाच्या चौथ्या फेरीचा मुहूर्त साधून राहुल गांधी पत्रकारांशी बोलले. निवडणुकीत जर आपल्या पक्षाला सरकार बनवता येणे अशक्य असेल तर लोकशाहीत दुसरा पर्याय काय उरतो? विरोधी बाकावर बसणे, तेच आपण करू, असे त्यांनी सांगून टाकले. राहुल गांधी सक्रिय राजकारणात पाच वर्षे आहेत आणि एवढय़ा अत्यल्प काळातच त्यांनी ही तडफदार राजकीय फलंदाजी आत्मसात केली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी अलीकडल्या एका मुलाखतीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यास आपण काही काळ पंतप्रधानपदावर राहू आणि एका क्षणी तरुण सदस्याकडे हे पद सोपवायला तयार होऊ, असे सांगून हा तरुण कोण ते सूचित केले आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरू, एवढा दिलासा राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेद्वारे समस्त जनतेला दिला आहे. धर्मनिरपेक्षता, अर्थव्यवस्था आणि विकासाचे राजकारण, या तीन महत्त्वाच्या मुद्यांना डावलून या देशात काहीही घडू शकणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आजवरच्या प्रचाराच्या चारही फेऱ्यांमध्ये राहुल गांधींनी कधीही पातळी सोडलेली नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रमाणेच आपण सभ्य आणि सुसंस्कृतपणात कुठेही कमी नाही, हेही त्यांनी यावेळी दाखवून दिले आहे. सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी, दिग्विजयसिंग, वीरप्पा मोईली हे एकवेळ घणाघाती शब्द वापरून प्रतिपक्षाला नामोहरम करायचा प्रयत्न करतील पण आपल्यासाठी सुसंस्कृत आणि अत्याधुनिक भाषा हीच अधिक मर्मभेदी आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे. अरुण जेटली यांच्यापासून अनेकांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर केलेली टीका ही त्याचेच द्योतक आहे. राहुल गांधींनी ठेवून दिलेला हा चौथा तडाखा पहिल्या फेरीपूर्वी बसला असता तर निदान आताच्या दिशाहिन काँग्रेसजनांना हडबडून जागे व्हायला तो उपयुक्त ठरला असता. महाराष्ट्रात तर काँग्रेसजन राष्ट्रवादी काँग्रेसचे बटिक बनून प्रचारकार्यात उतरले होते की काय, असे वाटावे अशी अवस्था होती, नव्हे, राष्ट्रवादीची मंडळी ते तसे असल्याचे समजून त्यांची फरफट कशी होईल, ते पाहात होते. त्यांची धुंदी राहुल गांधींच्या वक्तव्याने त्या स्थितीत निदान उतरली असती. हत्तीचे शेपूट शोधायला बाहेर पडणाऱ्या सात आंधळ्यांप्रमाणे पवारांच्या पक्षाने कुठेकुठे काम केले नाही, त्याची माहिती मतदानाच्या तीनही फेऱ्या पार पडून गेल्यावर काँग्रेसजन आता देऊ लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्याचा एक चिमुरडा पक्ष नेमका आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या विरोधातच आपले उमेदवार उभे करतो आणि वर जाब विचारला जाताच आपण ज्यांच्या कुणाच्या (म्हणजे शरद पवारांच्या) कोटय़ातून मंत्री झालो, त्यांनाच तुम्ही पाहिजे तर जाब विचारा, असे सांगून त्यांचाही पाणउतारा करायला कमी करत नाही, हे तरी कशाचे लक्षण? आपला बोलविता धनी कोण, तेही स्पष्ट करायचाच हा भाग झाला! महाराष्ट्रातल्या या आघाडीचे भवितव्य काय आहे, ते येत्या १६ तारखेलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत दम धरावा हे उत्तम! राहुल गांधींनी ज्या दिल्लीत परवा पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणच्या सात जागांसह एकूण ८५ लोकसभा मतदार संघात आज मतदान पार पडते आहे. सलग चार गुरुवारी मतदान पार पडल्यावर पाचवी फेरी मात्र पुढल्या बुधवारी म्हणजे १३ मे रोजी आहे. त्यावेळी उर्वरित ८६ मतदारसंघात ते होईल. आजच्या मतदानात राजस्थानात सर्वच्या सर्व २५ मतदार संघ भाग घेतील. त्याखेरीज पंजाबमध्ये चार, पश्चिम बंगालमध्ये १७, उत्तर प्रदेशात १८, हरयानात १०, बिहारमध्ये तीन, काश्मीरमध्ये एक मतदारसंघामध्ये मतदान पार पडेल. चौथ्या फेरीत एकूण १२ हजार ४८ खेडी संवेदनशील आहेत, की जिथे बाह्य़ शक्तींचा हस्तक्षेप होऊ शकतो. बाह्य़शक्ती म्हणजे केवळ नक्षलवादीच आहेत, असे नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि काही प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये अशा तऱ्हेची झुंडशाही मतदानात दिसू शकते. संपूर्ण देशात मतदानाच्या टक्केवारीची जबरदस्त घसरण झालेली असताना अशा शक्तींना ही सुवर्णसंधीच चालून आल्यासारखे वाटले तर नवल नाही. चौथ्या फेरीतले एकूण मतदार जरी साडेनऊ कोटींच्या आसपास असले तरी प्रत्यक्षात चार - साडेचार कोटींपेक्षाही कमी संख्येने मतदार आपले कर्तव्य पार पाडतील. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या मुख्यमंत्री मायावतींनी ‘डॉ. मनमोहनसिंग जर पंतप्रधान बनू शकतात, तर आपण का नाही?’ असा प्रश्न करून आपण शर्यतीत आहोत आणि खरी शर्यत पुढेच आहे, हे स्पष्ट केले आहे. डॉ. सिंग यांच्याशी तुलना म्हणून नव्हे, तर राज्यसभेचे सदस्य जर पंतप्रधानपदावर आरूढ होऊ शकतात, तर कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसणारी व्यक्ती पंतप्रधानपदावर का जाऊ शकणार नाही, हा त्यांच्या दाव्याचा मथितार्थ आहे. आपल्या लोकशाहीची पूर्व परंपराही त्यांच्या या उद्गारांशी विसंगत नाही. प्रकाश करातांनी ‘या खेपेला लोकसभेचा सदस्यच पंतप्रधानपदी दिसेल’ असे जे म्हटले त्यालाच मायावतींनी दिलेले हे उत्तर आहे. डाव्यांचे उर्वरित मुद्दे किती पोकळ आणि तकलादू आहेत, ते राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. डाव्यांकडे निदान मुद्दे आहेत, भाजपकडे आणि त्यांच्या परिवाराकडे बेछूट गुद्यांखेरीज काहीच नाही. त्यांनीही (जमल्यास) राहुल गांधींकडून राजकारणाचे धडे घ्यायला यापुढे हरकत नाही. पाहा जमते का ते!