Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

विचार विनिमय.. सेलिब्रिटी समाजसेवेचा
अलिकडेच शाहरूख खानने दोन काश्मिरी मुलांच्या उपचारांसाठी मदत केली, अमिताभ बच्चनने तर पल्स पोलिओ मोहीम जनमानसापर्यंत पोहोचविली. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या चाहत्याची भेट हृतिक रोशनने घेतली. आमीर खानने नर्मदा बचाव आंदोलनात भाग घेतला होता. असे असले तरी सेलिब्रिटींच्या समाजकार्याबद्दल अनेकांना आक्षेप असतो. त्यांच्या मते प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सेलिब्रिटी अशा काही समाजकार्याचा भाग होतात. याबद्दल सेलिब्रिटींचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ‘स्क्रीन बिग पिक्चर’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शक राजकुमार हिरानी, अभिनेता इम्रान खान, अभिनेत्री दिया मिर्झा व गुल पनाग यांना निमंत्रित करण्यात आले होते.

माटुंगा वर्कशॉप
प्रवाशांचे प्राण.. त्यांच्या हाती!

गेली अनेक वर्षे माटुंग्याच्या झेड ब्रिजवरून पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेच्या दिशेने जाताना उत्सुकता खूप ताणली जायची.. इथेच डाव्या बाजूला माटुंग्याचे प्रसिद्ध रेल्वे वर्कशॉप आहे. खालच्या बाजूला काय चालले आहे ते आपल्याला काहीच कळत नाही एरव्ही. पण सामान्यांना वर्कशॉपमध्ये काय चालले आहे, ते पाहण्यापाहून रोखणाऱ्या पट्टय़ांतील काही पट्टय़ा कुठेना कुठे नक्कीच निखळलेल्या असतात, असा अनुभव आहे. प्रत्येक जण त्या निखळलेल्या पट्टीजवळ काही क्षण थबकतो.. ज्यांना अधिकच उत्सुकता आहे ती मंडळी तर काही मिनिटे रेंगाळतात आणि खाली काय काय सुरू आहे, ते पाहून घेतात. खालच्या बाजूला रेल्वेच्या रुळांवरून धावणारी काहीशे वजनाची ती लोखंडी चाके वेगळी केलेली असतात आणि त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असते. एरवी एखाद्या गाडीचे गॅरेज पाहणे वेगळे आणि मोठय़ा आकाराच्या या रेल्वेगाडय़ांचे वर्कशॉप पाहणे वेगळे. कारण या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. अगदी अलीकडे प्रत्यक्ष राजमार्गाने म्हणजे या वर्कशॉपच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच ‘सिटीवॉक’च्या निमित्ताने आत जावून त्यांचा अवाढव्य पसारा पाहण्याचा योग आला आणि एक वेगळीच दुनिया समोर उलगडत गेली.

‘जोडी जमली रे’ पालकांनी अवश्य पहावा
‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा ‘जोडी जमली रे’ हा कार्यक्रम विवाहोत्सुक तरुण-तरुणींना लग्न जुळविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरला आहे. म्हणूनच ‘यंग जनरेशन’ यात आपणहून सहभाग घेत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये गुरुवारच्या भागात नेहमीपेक्षा वेगळ्या ‘अॅक्टिव्हीटीज’ पाहायला मिळणार आहेत. स्पर्धक आपल्या बदललेल्या जोडीदारासह गाणी गाणार असून, नृत्यही करणार आहेत. गेल्या आठवडय़ात लग्न जुळवताना मुला-मुलींना आपापली मते मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे, त्यांना आपल्या जोडीदाराविषयी काय वाटते ते सांगण्याची पूर्ण मोकळीक मिळाली पाहिजे या महत्त्वाच्या विषयावर स्पर्धक तसेच पालकांनी सविस्तर चर्चा केली होती. या भागात स्पर्धक मुला-मुलींच्या पालकांना सूत्रधार अतुल परचुरे आणि कविता मेढेकर बोलते करणार आहेत. सून अथवा जावयाकडून पालकांच्या काय अपेक्षा आहेत याची चाचपणी पालकांकडून केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री १० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून प्रसारित होणारा ‘जोडी जमली रे’ कार्यक्रम प्रेक्षकांमधील लग्नाळू मुला-मुलींबरोबरच त्यांच्या पालकांनीही बघायलाच हवा असा आहे. सून अथवा जावयाकडून पालकांच्या अपेक्षा जाणून घेण्याव्यतिरिक्त गुरुवारच्या भागात पं. संदीप अवचट शकून-अपशकून या विषयावरही आपले विचार मांडणार आहेत. प्रतिनिधी