Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राहुल गांधी,
हेमा मालिनी ठरले ‘पोलिटिकल स्टाईल आयकॉन्स’
चंदीगढ, ६ मे / पीटीआय

नेता होण्यासाठी अभिनेता होण्याची गरज नसते. परंतु तरीही राजकीय क्षितिजावर स्वत:चे

 

नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करण्यासाठी लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडणे क्रमप्राप्तच असते. या राजकीय नेत्यांची भाषणाची लकब, हसणे, बोलणे, आदी साऱ्यांमुळे त्याची लोकप्रियता निर्माण होते. त्यामुळेच गांधी घराण्याचा वारसा चालविणारे काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी आणि अभिनयाकडून राजकारणाकडे वळल्यावरही आपली घोडदौड चालू राखणारी ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी ‘पोलिटिकल स्टाईल आयकॉन्स ऑफ द कंट्री’ ठरली आहे. भारतातील कार्यरत असलेल्या विविध फॅशन इन्स्टिटय़ूटमधील सुमारे १४,००० विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासानंतर ही निवड केली आहे. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाइन या संस्थेच्या देशभरातील सुमारे १५६ केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी राहुल गांधीची निवड केली आहे. या स्पध्रेत राहुलने माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना ३३ टक्के मतफरकाने पराभूत केले. या शर्यतीत युवा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचाही समावेश होता.या चाचपणीत समाविष्ट असलेले ९० टक्के मतदार १९ ते २३ वयोगटातील मुली होत्या. राहुल गांधी यांनी एकूण मतदानापैकी ५० टक्के मते मिळविली, अशी माहिती इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाइनच्या उपाध्यक्षा आदिती श्रीवास्तव यांनी दिली.महिला विभागात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हेमा मालिनीपुढे निभाव लागू शकला नाही. गडद रंगाची कांजीवरम साडी, सहज भुरळ घालणारे सौंदर्य आणि चेहऱ्यावर उजळ कांती या हेमा मालिनीच्या व्यक्तिमत्वाला वयाची मर्यादा आड येत नाही. त्यामुळे तरुणाईने तिला ‘पोलिटिकल स्टाईल आयकॉन ऑफ द इंडिया’ ठरविल्यास वावगे वाटू नये, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.हेमा मालिनीने ४७ टक्के मते मिळविली. तर सोनियाच्या वाटय़ाला ३१ टक्के मते आली. त्यापाठोपाठ अभिनेत्री आणि समाजवादी नेत्या जयाप्रदा (१० टक्के) आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.