Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मतदारांच्या मौनाचा अर्थ शोधण्यासाठी सर्वेक्षण प्रकल्प
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा पुढाकार
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाकडे मुंबई, पुणे, ठाणे अशा

 

प्रमुख शहरांमधील मतदारांनी मोठय़ा संख्येने पाठ फिरवली. देशासमोर खूप मोठी आव्हाने असतानाही बहुसंख्य मतदारांनी मतदानच न केल्यामुळे त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय, याचे उत्तर शोधण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ‘मौन-मतदार-पाहणी’ प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदान न केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शिवाय मतदान न करणाऱ्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी एसएमएस आणि इंटरनेटच्या माध्यमातून ७ ते १२ मे या पाच दिवसांच्या कालावधीत प्रबोधिनीने विविध यंत्रणा राबविण्याचे ठरविले आहे. प्रबोधिनीच्या नियोजन आणि संशोधन केंद्राच्या वतीने पुण्यात अनुपस्थित मतदारांचे सर्वेक्षण हाती घेतले जाईल. तसेच, विचारपूर्वक मतदान न केलेल्या पण आपले गाऱ्हाणे मांडण्याची इच्छा असलेल्यांसाठी प्रबोधिनीने आपल्या संकेतस्थळावर सोय उपलब्ध करून दिली आहे (ँ३३स्र्://६६६.२्र’ील्ल३५३ी१२३४८ि.१ेस्र्ल्ल६ीु.१ॠ/). तिथेही मौन मतदारांना आपली भूमिका मांडता येणार आहे. या शिवाय ९३२१२६०५३२ या क्रमांकावर एसएमएस पाठवून अथवा प्रबोधिनीच्या १७, चंचलस्मृती, गं. द. आंबेकर माग्र, श्रीराम इंडिस्ट्रियल इस्टेट समोर, वडाळा, मुंबई - ३१ येथील कार्यालयात समक्ष भेटून तिथल्या मतपेटीत गुप्त मतदान करून मतदान न केलेल्या मतदारांना आपले मौन समाप्त करता येईल.
‘मतदारांच्या मौनाचे सोयिस्कर अर्थ काढण्यातून लोकमानसाचा योग्य अंदाज लागू शकणार नाही. ही गफलत टाळून मौन-मतदारांच्या मनाचा थांग शोधण्यासाठी’ हा आगळा-वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची भूमिका प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्त्रहबुद्धे यांनी मांडली आहे.
प्रबोधिनीचे रवींद्र साठे, यशवंत ठकार, रत्नाकर पाटील व सुनील मिश्रा अशा चार जणांची समिती या प्रकल्पावर काम करीत असून निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी १४ मे रोजीच प्रबोधिनी या पाहणी प्रकल्पाचा अहवाल प्रकाशित करणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी स्वप्ना हासे (मुंबई) यांच्याशी ०२२-२४१३६९६६ तसेच यशवंत ठकार (पुणे) यांच्याशी ९४२२०८६०६८ संपर्क साधावा.