Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

बादल कुटुंबाची सत्तेची हाव अकाली दल-भाजपला भोवणार
सुनील चावके

अवघ्या दोन वर्षांंत प्रकाशसिंग बादल सरकारने जनतेच्या मनातील निर्माण केलेला रोष,

 

डेरा सच्चा सौदाशी अकाली दलाचे असलेले वैर, सत्तेसाठी हपापलेल्या बादल कुटुंबाची मनमानी याचा परिपाक यंदा पंजाबमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या तेरा जागांवर दिसण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदासाठीची उमेदवारीही यंदा पंजाबमधील निवडणुकीत रंगत आणणार आहे.
पंजाबमध्ये १३ मे रोजी दुसऱ्या टप्प्यात गुरुदासपूर, अमृतसर, खादूर साहिब, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगढ साहिब आणि फरीदकोट अशा नऊ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यात ‘हास्यसम्राट’ क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, अभिनेता विनोद खन्ना आणि लोकसभेचे उपाध्यक्ष चरणजीतसिंग अटवाल या दिग्गजांचे भवितव्य पणाला लागलेले असेल.
पंजाबमधील यंदाची निवडणूक प्रामुख्याने बादल आणि कॅप्टन अमिरदरसिंग या दोन घराण्यांतील लढत ठरणार आहे. अमिरदर सिंग यांची सत्ता संपुष्टात आणणाऱ्या अकाली दलाची सारी सूत्रे आज बादल कुटुंबियांच्या हाती आहेत. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, त्यांचे पुत्र सुखबीरसिंग बादल पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री, बादल यांचे पुतणे मनप्रीत राज्याचे अर्थमंत्री, जावई आदेशप्रताप सिंग कैरों अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नात्यातच असलेले जन्मेजय सिंग सेखोनही मंत्रिमंडळात. सत्तेची कुटुंबातच वाटणी करणाऱ्या बादल घराण्याने बठिंडामधून सून हरसिमरत कौर यांनाही लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उतरविले आहे. अर्थातच राज्यातील जनतेचा या घराणेशाहीला विरोध आहे. मात्र, अकाली दलाचा मित्रपक्ष असलेला भाजपने त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. राज्यात वीजेची टंचाई अचानक वाढली आहे, शेतीला पाणी मिळणे अवघड झाले आहे, जनतेच्या समस्या वाढत चालल्या आहेत आणि बादल कुटुंब सत्तेचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल, याचाच हिशेब करण्यात मश्गुल आहे. परिणामी बादल यांची प्रायव्हेट लिमिटेड झालेल्या अकाली दलाला संधी मिळताच दणका देण्यासाठी मतदार उत्सुक आहेत. मालवा प्रांतात प्रत्येक मतदारसंघात ६० हजार ते १ लाख मते असलेल्या डेरा सच्चा सौदाशी शत्रुत्व घेण्याचा फटका अकाली दलाला किमान पाच मतदारसंघात बसणार आहे. २००७ च्या निवडणुकीप्रमाणे ही सारे मते पुन्हा काँग्रेसलाच मिळण्याची चिन्हे आहेत. शिवाय भावी मुख्यमंत्री मानले जाणारे अकाली दलाचे ज्येष्ठ नेते कंवलजीत सिंग यांचा ‘अपघाती’ मृत्यूवरून अकाली दलाच्या समर्थकांमध्ये घोर शंका निर्माण झाल्या आहेत.
राज्यातील १३ पैकी किमान आठ जागांवर यंदा काँग्रेसचा विजय अपेक्षित आहे. गुरुदासपूरमधून १९९८ पासून सलग तीनवेळा निवडून आलेले भाजपचे विनोद खन्नांना काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांच्या विरोधात विजयासाठी जबरदस्त झुंज द्यावी लागत आहे. त्यांचा विजय यंदा गृहित धरता येणार नाही. अमृतसरमध्ये क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनाही काँग्रेसचे ओमप्रकाश सोनी जोरदार झुंज देत आहेत. फतेहगढ साहिबमध्ये लोकसभेचे उपाध्यक्ष अकाली दलाचे चरणजीतसिंग अटवाल यांना काँग्रेसचे सुखदेव सिंग यांनी जेरीस आणले आहे. खादूरसाहिब मतदारसंघात अकाली दलाचे डॉ. रतनसिंग अजनाला आणि काँग्रेसचे राणा गुरजीत सिंग यांच्याविरुद्ध लढत गमावण्याची चिन्हे आहेत. जालंधरमध्ये अकाली दलाकडून उतरलेले प्रसिद्ध पंजाबी गायक हंस राज हंस काँग्रेसचे मोहिंदरसिंग केपी यांचीही लढत तुल्यबळ ठरणार आहे. होशियारपूरमध्ये भाजपचे सोमप्रकाश आणि काँग्रेसचे संतोष चौधरी यांच्यातील लढतीत चौधरी यांचे पारडे जड मानले जात आहे. आनंदपूर साहिब मतदारसंघात अकाली दलाचे डॉ. दलजीतसिंग चीमा यांना काँग्रेसचे रवनीत सिंग चिवट लढत देत आहेत. लुधियानामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी अकाली दलाचे गुरुचरण सिंग गालिब यांच्याविरुद्ध विजयाची आशा बाळगून आहेत. गेल्यावेळी तिवारी यांना अकाली दलाचे शरणजित सिंग धिल्लों यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. फरीदकोटमध्ये अकाली दलाच्या परमजीत कौर गुलशन यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुखिवदर सिंग डॅनी बाजी मारतील अशी चिन्हे आहेत. थोडक्यात सत्ताधारी अकाली दल-भाजप युतीपुढे यंदा काँग्रेसने प्रत्येक जागेवर प्रबळ आव्हान उभे केले असून त्यात काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस किमान आठ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपला सिद्धू यांची अमृतसरची जागा टिकविता येईल, तर अकाली दलाचे संख्याबळ चार जागांपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. निकाल लागला तर पंजाबच्या पराभवाचे खापर बादल कुटुंबावरच फुटेल, यात शंकाच नाही.
प्रचाराचे मुद्दे
प्रगत पंजाबच्या घोडदौडीला बसलेली खीळ. वीजेची टंचाई, शेतीला अपुरा पाणीपुरवठा, नागरी व औद्योगिक समस्या.
२००४ चे चित्र
अकाली दल ५
भाजप ३
काँग्रेस १
एकूण काय?
बादल यांची घराणेशाही अकाली दल-भाजप युतीला भोवणार.