Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

संजय निरुपम यांना अटक करण्याची
राम नाईक यांची मागणी
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

मुंबई उत्तर मतदारसंघात २९ आणि ३० एप्रिलच्या मध्यरात्री काँग्रेसचे उमेदवार संजय

 

निरुपम आणि उत्तर मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अशोक सुत्राळे हे साथीदारांसह पैसे वाटत असल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येऊनही पोलिसांनी या दोघांना अटक न करता उलट तक्रारदारांनाच अटक केल्याची तक्रार युतीचे उमेदवार राम नाईक यांनी पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे केली आहे. तसेच निरुपम यांना निवडणूक काळात पैसे वाटप केल्याप्रकरणी तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे की, निरुपम आणि सुत्राळे पैसे वाटत असताना कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला संकुलातील नागरिकांनी आक्षेप घेतला.
त्यावर निरुपम यांच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तंग झाले. या घटनेची तक्रार नागरिकांसह शिवसेना, भाजपा, मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी समता नगर पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर दोन तासांनी आलेल्या निरुपम यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. निरुपम यांच्या विरोधात करण्यात आलेल्या दोन्ही तक्रारींनुसार आरोपींना तात्काळ अटक व्हायला हवी होती. मात्र निरुपम यांच्याविरोधातील पहिली तक्रार अजामीनपात्र असूनही पोलिसांनी कारवाई करणे टाळले. उलट पोलिसांनी शिवसेना- भाजपच्या चार स्थानिक कार्यकर्त्यांनाच अटक केली. हा उघड पक्षपात असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. मुंबई उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बळीराम पवार यांचेही या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आल्याचे नाईक यांनी नमूद केले आहे.