Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

राहुल गांधी, हेमा मालिनी ठरले ‘पोलिटिकल स्टाईल आयकॉन्स’
चंदीगढ, ६ मे / पीटीआय

नेता होण्यासाठी अभिनेता होण्याची गरज नसते. परंतु तरीही राजकीय क्षितिजावर स्वत:चे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करण्यासाठी लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडणे क्रमप्राप्तच असते. या राजकीय नेत्यांची भाषणाची लकब, हसणे, बोलणे, आदी साऱ्यांमुळे त्याची लोकप्रियता निर्माण होते. त्यामुळेच गांधी घराण्याचा वारसा चालविणारे काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी आणि अभिनयाकडून राजकारणाकडे वळल्यावरही आपली घोडदौड चालू राखणारी ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी ‘पोलिटिकल स्टाईल आयकॉन्स ऑफ द कंट्री’ ठरली आहे.

मतदारांच्या मौनाचा अर्थ शोधण्यासाठी सर्वेक्षण प्रकल्प
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा पुढाकार

मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाकडे मुंबई, पुणे, ठाणे अशा प्रमुख शहरांमधील मतदारांनी मोठय़ा संख्येने पाठ फिरवली. देशासमोर खूप मोठी आव्हाने असतानाही बहुसंख्य मतदारांनी मतदानच न केल्यामुळे त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय, याचे उत्तर शोधण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ‘मौन-मतदार-पाहणी’ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदान न केलेल्या मतदारांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

बादल कुटुंबाची सत्तेची हाव अकाली दल-भाजपला भोवणार
सुनील चावके

अवघ्या दोन वर्षांंत प्रकाशसिंग बादल सरकारने जनतेच्या मनातील निर्माण केलेला रोष, डेरा सच्चा सौदाशी अकाली दलाचे असलेले वैर, सत्तेसाठी हपापलेल्या बादल कुटुंबाची मनमानी याचा परिपाक यंदा पंजाबमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या तेरा जागांवर दिसण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदासाठीची उमेदवारीही यंदा पंजाबमधील निवडणुकीत रंगत आणणार आहे.

मायावतींसंबंधीच्या वादग्रस्त सीडीची चौकशी करण्याचे आदेश
मुजफ्फरनगर, ६ मे/ पीटीआय

भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणारे भाषण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती एका प्रचारसभेत करीत आहेत असे दृष्य चित्रित केलेल्या वादग्रस्त सीडींच्या कथित वितरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या काईराना मतदारसंघाच्या उमेदवार तबस्सुम बेगम यांनी यासंबंधी तक्रार केली आहे. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काही विशिष्ट पक्षाचे सदस्य अशा सीडींचे वितरण करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गुजरातमधील एका निवडणूक प्रचार सभेत बसपच्या अध्यक्ष मायावती, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ काही वक्तव्य करीत असल्याचे कथित चित्रण या सीडींमध्ये आहे. तबस्सुम बेगम यांच्या तक्रारीवरून काईरानाचे उप-विभागीय दंडाधिकारी संतकुमार यांनी सीडी वितरणात सामील असलेल्या तीन कार्यकर्त्यांविरोधात अधिकृत नोटिसा बजावल्या आहेत.

रालोआतर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी नव्हे अडवाणीच! - नितीशकुमार
नवी दिल्ली, ६ मे/वृत्तसंस्था

पंतप्रधानपदासाठी भावी उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपमधील काही जण पुढे करीत असले तरी हा विचार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना रुचलेला नाही. लालकृष्ण अडवाणी हेच रालोआतर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यास नितीशकुमार यांनी आज स्पष्ट नकार दिला. पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, रालोआचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून आम्ही फक्त लालकृष्ण अडवाणींनाच पाठिंबा देऊ. अडवाणींव्यतिरिक्त आम्ही अन्य कोणालाही ओळखत नाही. अडवाणी यांचे राजकीय वारसदार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आणण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू असतानाच नितीशकुमार यांनी जाहीरपणे हे विधान करून भाजपच्या बेतांना सुरूंगच लावला आहे. पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाला भाजपमधील अरुण शौरी व रविशंकर प्रसाद या दोन नेत्यांनी गेल्या महिन्यात पाठिंबा दिला होता.

संजय निरुपम यांना अटक करण्याची
राम नाईक यांची मागणी

मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

मुंबई उत्तर मतदारसंघात २९ आणि ३० एप्रिलच्या मध्यरात्री काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम आणि उत्तर मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अशोक सुत्राळे हे साथीदारांसह पैसे वाटत असल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येऊनही पोलिसांनी या दोघांना अटक न करता उलट तक्रारदारांनाच अटक केल्याची तक्रार युतीचे उमेदवार राम नाईक यांनी पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे केली आहे. तसेच निरुपम यांना निवडणूक काळात पैसे वाटप केल्याप्रकरणी तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

मतदानानंतर केलेल्या पोलिसांच्या ‘निवडणूक’ बदल्या रद्द
मुंबई, ६ मे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील बहुतांश मतदारसंघांतील मतदान उरकल्यानंतर निवडणुकांचे कारण देऊन राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या दुसऱ्यांदा केलेल्या बदल्याही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) आज रद्द केल्या.