Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

लोकमानस

अध्यात्म पातळीवर लिखाण हवे

रवींद्र खडपेकर लिखित ‘वेध काळाचा’ (२ मे) हा लेख वाचला. लेखकाला नेमके काय सुचवायचे आहे ते गहनतेच्या गर्तेतच विरून गेल्याचे जाणवते. काळ आणि गती याचे गणित आपणास माहीत असलेल्या मापकानुसारच आपण लावू शकतो, परंतु कालावकाशमयता याचा एकत्रित विचार करता ती परिमाणे फिकी पडतात, व नवनिर्मितीसाठी उद्दीपित करीत असतात.
‘काळाचे कारण’ हा भेद समजून घ्यायचा असल्यास काळ आपल्या अस्तित्वाचे कारण स्वत:च अंकुरतो, हे समजून घेतले पाहिजे. स्थळ व काळाचा छेदनबिंदू अशा

 

कारणांच्या अंकुरल्याने सगुणित होतो व बोधप्रद ठरतो. म्हणजेच निर्गुणाने स्वबोधित किंवा आत्मबोधित होण्यासाठीच सगुणाची मदत घ्यावयाची असते. ज्ञानेश्वरी किंवा ऋग्वेदातील संदर्भ हे पूर्णत: वैज्ञानिक जाणावेत. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीतला ‘आद्या’ ही जर विश्वशाश्वताची सैद्धान्तिक मांडणी गृहीत धरली तर ‘उत्पत्ती, पालन, संहाराचे निज, ज्याचे होते बीज त्याचे हाती’ या संत तुकारामांच्या अनुभवसिद्धतेची उकल होऊ शकते; परंतु लेखकाने हे सगळे अकारण जडजंबाळ तर केलेच शिवाय ‘खास हिंदू भारतीय पद्धत’ म्हणून जर त्याचा गवगवा केला असेल तर मात्र गहन प्रश्न पडतो तो असा की, उद्या कोणी ते ब्राह्मण भारतीय, दलित भारतीय, मराठा भारतीय, बौद्ध भारतीय, शीख भारतीय, जैन भारतीय, ख्रिश्चन भारतीय, पारशी भारतीय किंवा मुस्लिम भारतीय असे संबोधले तर मात्र मोठी पंचाईत होईल. म्हणून किमान विज्ञान लेखकाने तरी धर्म सोडून प्रत्येक धर्मातला मूळ गाभा असलेल्या अध्यात्म पातळीवर लिखाण करावे.
प्रा. आनंद शेडगे,
मुंबई

‘तो’ मी नव्हे

महाराष्ट्र पाठय़पुस्तक मंडळाचे इयत्ता तिसरीचे भूगोल विषयाचे, जून २००९ पासून लागू होणारे नवीन पुस्तक बाजारात उपलब्ध झाले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी गुणवत्ता परीक्षण केले असे लिहिले आहे. या गोष्टीचा मी जाहीरपणे इन्कार करीत आहे. शिवाय या पुस्तकात नेहमीप्रमाणे बऱ्याच चुका आहेत. पाठय़पुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी यांना याबद्दलचा खुलासा मी पाठविला आहेच.
मला ‘बालभारती’ने पुस्तकाची प्रत न दाखविता केवळ थोडे नकाशे दाखविले होते. याबाबत मला नियुक्तीचे पत्र देऊन नंतर माझ्या संमतीचे पत्र मिळाल्यावरच पुस्तकाच्या घडणीत माझा सहभाग अधिकृत होऊ शकला असता. मी पुण्याला बालभारतीच्या कोणत्याही सभेस व चर्चेस गेलो नाही की कसलेही मानधन माझ्या नावावर नाही. अंतिम प्रत मला दाखवून त्यावर सही घेतली असती तर गोष्ट निराळी पण गुप्ततेच्या कारणास्तव आमंत्रित तज्ज्ञाला अंतिम प्रत न दाखविणे, बालभारतीच्या कुठल्या तत्त्वानुसार ठरते? पुस्तकातील चुकांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी माझ्यावर नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो.
विद्याधर अमृते,
विलेपार्ले, मुंबई

चोरटे भंगार घेणाऱ्यांवर जरब बसवा

ठाणे-नेरूळ उपनगरीय लोहमार्गात चोरटय़ाने काढून टाकलेले लोखंडी झाकण आडवे झाल्यामुळे गाडी रुळावरून घसरली, ही बातमी वाचली. लोहमार्गाची अशी लूट ‘काळे सोने’ समजल्या जाणाऱ्या लोखंडाला भंगारवाले चांगला भाव देतात म्हणून चालते.
रेल्वे प्रशासनाने काळजी घेतली नाही तर रेल्वे परिसर चोरटय़ांसाठी नंदनवन ठरेल. मुंबईत रेल्वेचे दाट जाळे असूनही तेथे लोखंड चोरीचे प्रमाण तुलनात्मकदृष्टय़ा अल्प आहे. कारण रेल्वेचे पोलीस व सुरक्षा दल यांची करडी नजर, भंगार माल विकत घेणाऱ्यांवर असते. परिणामी रेल्वेतून चोरलेला माल विकत घेण्यास कुणी धजावत नाही.
चोरलेल्या झाकणामुळे गाडी घसरण्याची घटना जेथे घडली, त्या नव्या मुंबईत असा धाक भंगारवाल्यांवर नसावा, असे वाटते. उलट भंगारवाल्यांची लॉबी तिथे बळकट असल्याचे ऐकिवात आहे. यावर भंगारवाल्यांवर जबर वचक बसविणे हाच तरणोपाय आहे.
मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात, या तत्त्वानुसार वागले तरच रेल्वेरुळांच्या चोरीला आळा बसेल.
ज्ञानेश्वर गावडे,
फोर्ट, मुंबई

आरक्षणाचेच रक्षण करा!

मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण आहे. हे आरक्षण मागासवर्गीयांना प्रामाणिकपणे आणि हक्काने न मिळावे यासाठी मागच्या बऱ्याच वर्षांपासून आरक्षण विरोधक सक्रिय आहेत. मंडल- कमिशनच्या शिफारशी लागू व्हायला एक पिढी लागली, मंडल शिफारशी लागू झाल्या त्याही अर्धवट शिवाय उच्च शिक्षणातला प्रश्न अद्याप तसाच आहे. अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण धोक्यात आणणारे विधेयक राज्यसभेत पारित झाले. एकूण ४८ संस्थांमध्ये आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आधीच आरक्षित जागांचा अनुशेष इतका वाढत चाललाय की आरक्षित जागा तेवढय़ा रिक्त सोडून इतर सर्व जागा भरल्या जात आहेत, अशी स्थिती आहे. ‘आरक्षण’ हे मागासवर्गीचा स्तर उंचावण्याचे एक साधन आहे. मात्र मागासवर्गीयांना प्रगतीच करू देऊ नये, अशा मानसिकतेतूनच आरक्षणास विविध स्वरूपातून विरोध होत आला आहे.
जर आरक्षणाचे रक्षण झाले नाही तर देशातील ८५ टक्के लोकांना प्रगतीच्या वाटा कायमच्या बंद होतील. खासगीकरण आणि वैश्वीकरण हे अप्रत्यक्षपणे आरक्षणाचे नवे शत्रू आहेत, याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे आणि आरक्षणाच्या रक्षणाची लढाई सुरू ठेवली पाहिजे.
डॉ. हर्षवर्धन कांबळे,
नागपूर

सहसंवेदना महत्त्वाची

‘एक चेहरे पे कई चेहरे’ (२५ एप्रिल) हा ‘त्रिकालवेध’ वाचल्यावर आठवला तो मास्लोचा (MASLOW) मानवी गरजांचा त्रिकोण. ज्यात सर्वात आधी अन्न, वस्त्र, निवारासारख्या जीवनावश्यक गरजा येतात, त्यानंतर स्थैर्य व नंतर अवतीभवतीच्या लोकांकडून स्वत:ची पावती मिळविणं आवश्यक वाटतं. त्यानंतर येतात त्या कला-कौशल्यासारख्या गरजा. समूहाचा एक नायक असला, की इतरांनाही त्या पदावर जाण्याची इच्छा असते. असमानता हे वैश्विक सत्य आहे. मानवाच्या स्वप्रतिमा व समाजातील प्रतिमा यांचा विचार करताना सर्वप्रथम स्वप्रतिमा ही जास्तीत जास्त ‘आदर्श’ असण्याचा धोका निश्चित असतो कारण प्रत्येकाला आपले विचार, कृती, मानसिकता ही योग्य वाटत असते. ही स्वप्रतिमा वास्तव आहे की नाही हे ठरविणार कोण?
स्वप्रतिमा आणि प्रोजेक्टेड इमेज यातली पोकळी स्वत:ला जाणवली तर बदलाची प्रक्रिया सुरूही होऊ शकते. जर त्याची नोंद सुहृदांनी वेळीच घेऊन त्याला मदत केली, तर ती प्रक्रिया जलद होऊ शकते. पण त्यासाठी आवश्यक असणारा सहवास, संवाद आणि सहसंवेदना यांचीच सध्या मोठय़ा प्रमाणात वानवा आहे.
माया भाटकर,
चारकोप, मुंबई

‘मेक ओव्हर’ झाला जीवनाचा भाग

‘मनुष्य नावाचा प्राणी’ (११ एप्रिल), ‘स्वभावशैलीत भांडवलशाहीचा आत्मा’ (१८ एप्रिल)आणि ‘एक चेहरे पे कई चेहरे’ (२५ एप्रिल) हे ‘त्रिकालवेध’मधले लेख वाचत असताना मार्क्‍स आणि एंगल्स यांचेच तत्त्वज्ञान वेगळ्या भाषेत तर वाचत नाही ना असा भास होतो. मार्क्‍सच्या टंचाईविषयक लिखाणाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला त्याचे विक्रीयोग्य वस्तूविषयीचे जे मत आहे, त्याची सोप्या भाषेतली परखड आवृत्ती वाचतो आहोत, असा भास होतो. भांडवलशाहीत बाह्य़ सौंदर्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले, ही वस्तुस्थिती आहे, पण आकर्षकता नसेल तर कुणी उत्पादनाला हात लावणार नाही.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही दशकांत भारताने निर्यात केलेल्या काही वस्तू परत आल्या. कारण त्यांचे ‘फिनिशिंग’ चांगले नव्हते. आज तशा बातम्या फार कमी वाचायला मिळतात. कारण मालाचा चेहरा बदलण्याची क्रिया आपल्याला जमू लागली, हे असावे. टोळीजीवनात माणसाचे कपडे कमीत कमी असायचे. पुढे लाजलज्जेने संस्कृतीला वेढले. समाजात वागण्याचे नियम झाले. हा भांडवलशाहीचा विस्तार नाही तर गरज, आणि ‘जरा बरे दिसावे म्हणून’ या गोष्टी आल्या. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स’ हा नंतरचा भाग झाला. पण आज या सर्व गोष्टी जीवनात अविभाज्य झाल्या आहेत.
सचिन गोडबोले,
पुणे