Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

विवाह मंडपात माथेफिरूचा धुडगूस; एकजण ठार
पोलीस गोळीबारात माथेफिरूही जखमी
कोल्हापूर, ६ मे / प्रतिनिधी
विवाह समारंभ सुरू असतानाच एका माथेफिरूने मंडपामध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात एकजण ठार झाला, तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात माथेफिरू जखमी झाला. हा खळबळ उडवून देणारा प्रकार आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील चिंचवाड या गावी घडला. संतोष कोगे असे माथेफिरू तरुणाचे नाव असून तो जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जंबूअण्णा कोगे यांचा मुलगा आहे. मांडीत गोळय़ा घुसलेल्या संतोष कोगे याला पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून एका अज्ञात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चिंचवाड या गावी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ग्रामस्थांकडून संशयित आरोपी संतोष कोगे याच्या घरावर हल्ला होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वेतन आयोग लागू करण्यासाठी
खातेनिहाय दोन लाखांची मागणी
सांगली पालिका कर्मचारी संघटनेचा आरोप
सांगली, ६ मे / प्रतिनिधी
सांगली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रत्येक खात्यातील कर्मचाऱ्यांनी दोन लाख रुपये सत्ताधारी विकास महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांना द्यावेत. अन्यथा, ठराव मंजूर केला जाणार नाही, अशी धमकी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला.

रेल्वेवरील दरोडे रोखण्यासाठी प्रसंगी गोळीबार
सोलापूर, ६ मे/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्य़ात रेल्वे गाडय़ांवर अलीकडे सतत पडणाऱ्या दरोडय़ांमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असताना अखेर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत रेल्वेची सुरक्षा वाढविण्याचा आणि दरोडे रोखण्यासाठी प्रसंगावधान राखून गोळीबार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सोलापूर-पुणे लोहमार्गावर विशेषत जिंतीरोड, पारेवाडी,अनगर, दुधनी आदी भागात दरोडे घालून रेल्वे प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सतत वाढू लागल्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात येऊन हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिनाभरात रेल्वे गाडय़ांवर दरोडे पडून प्रवाशांना लुटण्याचे लागोपाठ चार प्रकार घडले.

वाईत दोन गटात झालेल्या मारामारीत सहा गंभीर जखमी
वाई, ६ मे / वार्ताहर
येथील गणपती आळीत दोन गटात जोरदार मारामारी झाली. त्यात ६ जण गंभीर जखमी झाले असून एका गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यात ४५ हजारांचे नुकसान झाले.
गणपती आळीतील श्री अपार्टमेंट समोरील रस्त्यावर युवकांच्या दोन गटात तलवार, हॉकी स्टीक, काठय़ांनी तुंबळ मारामारी झाली. या मारामारीत विकास दिनकर िशदे, विजय िशदे, सुनील जाधव, प्रमोद कांबळे व दुसऱ्या बाजूचे मधुकर सखाराम जाधव, पांडुरंग शामराव जाधव हे गंभीर जखमी झाले. याबाबत वाई पोलीस ठाण्यात विकास िशदे व सुलोचना सुधाकर जाधव यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्या आहेत. विकास िशदेच्या फिर्यादीत उदयनराजेंचा प्रचार केला म्हणून आपापसात मारहाण झाल्याची, तर सुलोचना जाधव यांच्या फिर्यादीत सोनपरी डॉलच्या प्रकरणात गणपती आळीतील युवक व महिलांना पोलीस तक्रारीस प्रवृत्त केले म्हणून विकास िशदे व इतरांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.

तांदळाचा अपहार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
फलटण, ६ मे / वार्ताहर
तांदळाचा अपहार करून तो परस्पर विकल्याप्रकरणी संतोष दिगंबर सुतार (रा. बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) यांच्याविरुद्ध फलटण पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.
दादासाहेब नथुराम पलेकर (रा. उंबरमळा, ता. खटाव, जि. सातारा) (सध्या रा. गुलमोहर हौसिंग सोसायटी, खारघाट, मुंबई) यांच्या मालकीचा ट्रक क्र. एम.एच.-०४ सीपी ४३७७ मधून बेल्लारी (कर्नाटक) येथून तांदळाची पोती घेऊन सुतार पालघर (मुंबई) कडे जात होता. तेथे पोहोचण्यापूर्वी सुतार याने तांदळाच्या २५ किलो वजनाच्या २४० पिशव्या विकल्या व ट्रक फलटणमध्ये सोडल्याचा त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कराडच्या ‘वेध’ प्रदर्शनात पुण्याचे ‘इम्पलस् कॉम्प्युटर’ प्रथम
कराड, ६ मे/वार्ताहर

कराड रोटरी क्लब आयोजित तीन दिवसीय वेध उज्ज्वल भवितव्याचा या शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासा संदर्भातील प्रदर्शनामध्ये पुण्याच्या इम्पलस् कॉम्प्युटरच्या दालनाला प्रथम क्रमांक मिळाला. कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय इमारतीमध्ये पार पडलेल्या या प्रदर्शनातून व्यावसायिक शिक्षणातील अनेक पैलूंच्या माहितीचा खजिनाच एकत्र मिळाल्याने हजारो युवक-युवतींनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन समाधान व्यक्त केले. दरवर्षी हे प्रदर्शन भरवले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अखेरच्या तिसऱ्या दिवशी तर प्रदर्शनास प्रचंड गर्दी उसळली होती. प्रदर्शनात संयोजकांनी उत्कृष्ट स्टॉल स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मॅक, व फ्लाईंग कॅट्स दालनांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. काव्‍‌र्हर पायलट ट्रेनिंग व डिम्स फॅशनच्या दालनाला अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला. स्पर्धेसाठी मांडणी, माहिती व संवाद याचा विचार करण्यात आला. प्रदर्शनाचे व्यवस्थापक म्हणून रणजित शेवाळे यांनी कामगिरी बजावली.

अक्कलकोटच्या बसस्थानकावर गैरसोयीचे साम्राज्य
अक्कलकोट, ६ मे/वार्ताहर

अक्कलकोट बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्वामी समर्थ दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भक्तजन मोठय़ा संख्येने येतात. मात्र, तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकाची दुर्दशा पाहता त्यांचा अपेक्षाभंग होतो. सर्वत्र कचरा पसरला असून, घाणीचे साम्राज्य आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूचा परिसर सार्वजनिक शौचालय झाले आहे. अस्वच्छतेमुळे डुकरांच्या झुंडी बसस्थानकावर फिरत असतात. बसस्थानकावर असलेला दवाखाना इतका अस्वच्छ आहे की, त्याकडे जातानासुद्धा डुकरांना ओलांडून जावे लागते. सर्वात महत्त्वाचे प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी केवळ नावाला आहे. अक्कलकोट मध्यवर्ती धार्मिक क्षेत्र आहे. येथून लांब पल्ल्याच्या गाडय़ादेखील सुटतात. इतके उत्पन्न असतानाही बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे कुणाचेच लक्ष नाही. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वणवण भटकावे लागते. आर्थिक ऐपत नसतानासुद्धा नाईलाजाने पाणी बाटली अथवा थंडपेये विकत घ्यावे लागते. थंडपेये विकणाऱ्यांच्या सोयीसाठीच पिण्याच्या पाण्याची गैरसोय केली असल्याची चर्चा प्रवाशांत आहे. देवदर्शन आणि लग्नसराईमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. तेव्हा तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

रयत सेवकांचे कार्य समर्पण भावनेचे- प्रा. बुरुगले
कराड, ६ मे/ वार्ताहर

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये रयत शिक्षण संस्थेने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, याचे श्रेय रयत सेवक व कार्यकर्त्यांनाच जाते असा गुणगौरव वाशी-नवी मुंबईच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुगले यांनी केला.
येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित सेवानिवृत्त सेवकांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या सामान्य प्रशासन विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. बी. एल. पाटील हे होते, तर प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, आर. एल. नायकवडी उपस्थित होते. प्रा. एस. एस. जुन्नरकर, लेखापरीक्षक बी. के. चव्हाण व वरिष्ठ लिपिक बी. एम. वाघ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. बुरुगले म्हणाले की, प्रत्येक रयत सेवक हा समर्पण भावनेने आपले कर्तव्य बजावत असतो. आज सेवानिवृत्त होणारी त्रिमूर्ती त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. एस. एस. जुन्नरकर, बी. के. चव्हाण, बी. एम. वाघ यांच्यासह रयतचे माजी सहसचिव प्राचार्य के. एस. मोहिते, आर. एस. काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रास्ताविक केले.