Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९

‘ रॉयल आफ्रिकन सफारी ’
दक्षिण आफ्रिकेतील जंगलाचे ‘ रॉयल चॅलेंज ’ स्वीकारण्यासाठी बंगलोरचा संघ जीपमधून रवाना झाला. कुंबळेच्या नेतृत्वाखालील या संघाच्या जंगल सफारीची धुरा बहुतेक द्रविडवर असावी.

पालिका-एमएमआरडीएच्या वादात
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

विकासकामांवरून महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यात वाद रंगला असून एमएमआरडीएच्या कामांमुळे येत्या पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची भीती महापौर शुभा राऊळ यांनी व्यक्त केली आहे.
एमएमआरडीने शहरात सर्वत्र अर्धवट कामे केली आहेत, तसेच विविध कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर एमएमआरडीएने साहित्य तसेच सोडल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य वाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे, असे ताशेरे राऊळ यांनी एमएमआरडीएवर मारले आहेत. तर पालिकेने प्रसारमाध्यमातून आरोप करणे आधी थांबवावे, असा सल्ला देऊन एमएमआरडीएने पालिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. हजारो कोटींची कामे करून एमएमआरडीने पालिकेला उलट मदतच केली आहे, असे एमएमआरडीएने पालिकेला सुनावले आहे.

वयाबाबतचा खोटारडेपणा कसाबकडूनच उघड!
मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी मी १७ वर्षांचा, तर आता साडेसतरा वर्षांचा ‘बच्चा’ असल्याचा दावा करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने वयाबाबतीतील खोटारडेपणा स्वत:च आज न्यायालयात उघड केला. न्यायालयात वैयक्तिक माहिती नोंदविताना कसाबने त्याचे वय २१ वर्ष असल्याचे सांगून अल्पवयीन असल्याच्या स्वत:च्याच दाव्यातील हवा काढली.

उत्तम झाल्टे ‘महावितरण’चे कार्यकारी संचालक
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

‘महावितरण’च्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता उत्तम झाल्टे यांना कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून त्यांनी कार्यकारी संचालक-२ या पदाची सूत्रे आज स्वीकारली. उत्तम झाल्टे यांचे मुख्यालय पुणे येथे राहणार असून त्यांच्याकडे कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि पुणे या परिमंडळांचा कारभार राहणार आहे. १९८० मध्ये झाल्टे कनिष्ठ अभियंता म्हणून राज्य वीज मंडळात रुजू झाले. त्यानंतर पदोन्नत्या घेत ते डिसेंबर २००५ मध्ये मुख्य अभियंतापदापर्यंत पोहोचले.

कसाबवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप
८६ आरोप निश्चित ’ आजपासून खटल्याला सुरूवात

मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

सहा महिन्यांपूर्वी २६/११ च्या रात्री सीएसटी, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि चौपाटी येथे पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबने आपल्या साथीदारासह घातलेले मृत्यूचे तांडव शेकडो मुंबईकरांनी स्वत: पाहिले. पण असे असतानाही ‘यह सब कुछ गलत हैं, मुझे यह कबूल नहीं’ असे सांगत कसाबने आज विशेष न्यायालयाने त्याच्यावर निश्चित केलेले आरोप निर्लज्जपणे अमान्य केले. दरम्यान, अभियोग पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रस्तावित केलेल्या ३१२ आरोपांपैकी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी अवघे ८६ आरोप कसाब, मृत दहशतवादी, फरारी दहशतवादी आणि दोन भारतीय संशयितांविरुद्ध निश्चित केले. यामध्ये भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचून प्रत्यक्ष युद्ध करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांसह १६६ निष्पापांचे बळी घेतल्याच्या मुख्य आरोपांचा समावेश आहे.

अपघातग्रस्तांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल
मुंबई, ६ मे/प्रतिनिधी

रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांच्या अल्पवयीन वारसांना मंजूर झालेल्या भरपाईची रक्कम न्यायालयाकडून मुदत ठेव म्हणून ठेवली गेली तरी त्याच्या व्याजाच्या रकमेतून प्राप्तिकर (टीडीएस) कापून घेण्याची बँकांची कृती कायद्याला धरून आहे का, याची तपासणी मुंबई उच्च न्यायालय करणार आहे. मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरण अपघातग्रस्तांच्या अल्पवयीन वारसांना मंजूर होणारी भरपाईची रक्कम बँकेत ठेवण्याचे आदेश देत असते. तसेच न्यायाधिकरणाच्या निवाडय़ाविरुद्ध विमा कंपन्यांनी केलेली अपिले दाखल करून घेतानाही उच्च न्यायालय भरपाईची सर्व रक्कम जमा करण्याचे आदेश देत असते. अशा प्रकारे न्यायालयात जमा होणारी रक्कम प्रकरणाचा अंतिम निकाल होईपर्यंत न्यायालयातर्फे बँकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवली जाते. व्याजाची रक्कम वर्षांला १० हजाराहून जास्त झाली तर त्यातून ‘टीडीएस’ कापून घेण्याचा प्राप्तिकर विभागाचा नियम आहे. हाच सर्वसाधारण नियम न्यायालयातर्फे ठेवल्या जाणाऱ्या ठेवींनाही लागू होतो का, असा प्रश्न आता न्यायालयापुढे निर्णयासाठी आला आहे.

नक्षलवाद्यांचा भूसुरुंगस्फोट; सात पोलिसांसह ११ ठार
देवेंद्र गावंडे, रायपूर, ६ मे

छत्तीसगडमधील कोंटा जिल्हय़ात आसरगुडाजवळ बुधवारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंग स्फोटात सात पोलिसांसह ११ जण ठार झाले. हा भाग सीमावर्ती असल्याने छत्तीसगडसह महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इंजराम पोलीस ठाण्यातील केंद्रीय राखीव दलाचे दोन जवान पाच विशेष पोलीस अधिकाऱ्यांसह आज सकाळी आसरगुडा पोलीस मदत केंद्रावरील पोलीस जवानांसाठी नेहमीप्रमाणे धान्याचा साठा घेऊन गेले. ते पोहोचवून झाल्यानंतर हे जवान भेजी मार्गाने पायीच इंजरामकडे परतत होते. पोलीस ठाणे चार किलोमीटरवर असताना या जवानांना एक ट्रॅक्टर तिकडे जाताना दिसला. पायपीट करून थकलेल्या या जवानांना ट्रॅक्टरमध्ये बसण्याचा मोह आवरला नाही आणि नेमका येथेच घात झाला. हे सात जवान ट्रॅक्टरमध्ये बसल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या सुमारे शंभर नक्षलवाद्यांनी सुरुंगस्फोट घडवून आणला. यात ट्रॅक्टर सुमारे २० फूट उंच उडाले. यानंतर लगेच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. दुपारी दोन वाजता झालेल्या स्फोटानंतर सुरू झालेली चकमक तासभर सुरूच होती. यात सात जवान शहीद झाले तर, चार गावकऱ्यांना जीव गमवावा लागला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात सहा टक्के वाढ
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारीपासून पूर्वलक्षी स्वरुपात लागू होणार असून थकबाकीची रक्कम रोख्यात मिळणार आहे.निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने आपल्या सुमारे १६ लाख कर्मचाऱ्यांना या महिन्यापासूनच सहावा वेतन आयोग लागू केला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी २१ टक्के वाढ झाली आहे. यापाठोपाठ सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता १६ टक्क्यांवरून आता २२ टक्के झाला आहे. सरकारने आश्वासन पाळल्याबद्दल अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

‘शक्य होते तितके दिले, पुढचे आताच सांगता येत नाही!'
मुंबई, ६ मे/प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारी वाढ सरकारने जितकी शक्य आहे तितकी दिली आहे, असे आज राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मात्र अनेक गोष्टींबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळालेले नसून कर्मचारी व शासन यांत बोलणी सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्याबाबत पुढील गोष्टी देता येतील किंवा नाही, याबाबत मी आताच काही सांगू शकणार नाही, असे सूचक उद्गारही वळसे -पाटील यांनी काढले.जगभरातील अनेक विकसित देशांना आर्थिक मंदीने ग्रासलेले असताना महाराष्ट्राने मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक महसूल गोळा केल्याचे वळसे यांनी सांगितले. २००७-०८ या आर्थिक वर्षांमध्ये राज्याने ७९५८३.१५ कोटी रुपये इतका महसूल गोळा केला होता. तर २००८-०९ या आर्थिक वर्षांमध्ये मात्र ८२८६९.९३ कोटी रुपये एवढा महसूल गोळा झाला आहे.

शहीद विजय साळसकर यांच्या मुलीला २० लाखाची शिष्यवृत्ती
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

मुंबईच्या नगरपाल इंदू सहानी यांच्यातर्फे चार विद्यार्थिनींना लंडन येथील वेस्टमिन्स्टर विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यामध्ये दिवंगत पोलीस अधिकारी विजय साळसकर यांनी मुलगी दिव्या साळसकर हिचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थिनींना प्रत्येकी २० लाख रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ही सर्व शिष्यवृत्ती लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठाने प्रायोजित केली आहे. दिव्या साळसकर हिने एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला असून पुढील शिक्षणासाठी तिला परदेशात जायचे होते. तिने या स्कॉलरशीपसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये गुणवत्तेनुसार ती पात्र ठरल्याने तिला ही शिष्यवृत्ती मिळाल्याचे सहानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. अन्य विद्यार्थिनींनाही याच निकषानुसार शिष्यवृत्ती मिळाल्याचे त्या म्हणाल्या. ही शिष्यवृत्ती उद्या (गुरूवारी) गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी वेस्टमिन्स्टर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू मेस्झेका गुझकॉस्का तसेच विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती विभागाचे संचालक कॉलीन मॅथसन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा नगरपालांचे कार्यालय, तळमजला, सिटी सिव्हील कोर्ट, मुंबई विद्यापीठाच्या समोर, फ्लोरा फाऊंटन येथे सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी