Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

कुलगुरूंच्या घरावर बौद्ध भिक्खूंचा मोर्चा
औरंगाबाद, ६ मे/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संरक्षण भिंत पाडली म्हणून प्रशासनाने बौद्ध लेणी परिसरात राहणारे भन्ते विशुदानंद बोधी यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला. याच्या निषेध म्हणून बौद्ध भिक्खूंनी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या घरावर आज सकाळी मोर्चा काढून धरणे धरले. आंदोलक आणि कुलगुरू आपापल्या भूमिकांवर ठाम होत्या. हनुमान टेकडी ते बौद्ध लेणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरून हा वाद आहे. जुन्या वहिवाटीचा रस्ता विद्यापीठाच्या जागेतून जातो.

सशस्त्र मारामारीत चार जखमी
नांदेड, ६ मे/वार्ताहर

पूर्ववैमनस्यातून रमेश गोडबोले व विलास धबाले यांच्या गटात आज सशस्त्र मारामारी झाली. भरदुपारी उच्चभ्रूंची वस्ती समजल्या जाणाऱ्या भाग्यनगर परिसरात झालेल्या या मारामारीत चार जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. नल्लागड्डाचाळ परिसरात राहणाऱ्या रमेश गोडबोले व विलास धबाले यांच्यातील वैमनस्य सर्वश्रृत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून हे वैमनस्य अधिकच वाढले. वाद संपुष्टात यावा यासाठी पोलिसांसह अनेकांनी प्रयत्न केले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

‘मायाळू’ कायदा!
सोमवारचा बाजार दिवस. ‘बाजारला’ म्हणून माणसं यायची. गाव जवळच असल्यामुळं, अध्र्याच्या वर माणसं बाजारात यायची. पाहुण्या-रावळ्याच्या गाठीभेटी, चहा-पाणी दिवसभर होत राहायचं. काही जण आठवडय़ाचा रोजगार वसूल करायला या बाजारच्या वायद्यावर यायची. अशा मालकाच्या गाठीभेटी लवकर होतच नसत. रोजावारी कामं करणारी माणसं, अशा मालकाचा शोध घेत, साऱ्या बाजारभर फिरायची. आखरीला उन्हातान्हाचं दमूनभागून पाण्याच्या टाकीखाली गार सावली धरून इसावा घेत असत..

पाण्यासाठी संतप्त महिलांचा हिंगोली नगरपालिकेवर मोर्चा
हिंगोली, ६ मे/वार्ताहर

शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने संतप्त महिलांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी भांडी घेऊन नगरपालिकेवर मोर्चा नेला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी दिलीप कच्छवे यांनी तातडीने १० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चेकरी महिला परतल्या. वीजपंप जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. जिजामातानगर परिसरातील महिलांनी आज सकाळी नगरापलिकेच्या कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा नेला.

विलासराव खरात एवढे आक्रमक कशासाठी?
लक्ष्मण राऊत, जालना, ६ मे

काँग्रेसचे नेते व माजी आमदार विलासराव खरात यांनी जिल्हानिर्मिती दिनी घनसावंगी येथील आपल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केलेले आक्रमक भाषण सध्या जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश टोपे आणि संपर्कमंत्री असलेले त्यांचे पुत्र राजेश टोपे यांच्याविरुद्ध श्री. खरात यांनी आक्रमक भाषण केले. हे भाषण त्यांच्या आगामी राजकारणाची दिशा दाखविणारे आहे. आगामी राजकारण म्हणजे अर्थातच विधानसभेची येती निवडणूक.

एक डॉक्टर निलंबित;दोघांना नोटिसा
औरंगाबाद, ६ मे/प्रतिनिधी

जिवंत असलेले नवजात अर्भक मृत असल्याचे जाहीर केल्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आज सायंकाळी सादर झाल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली. त्या वेळी कामावर असलेल्या एका कनिष्ठ डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. एक अधिव्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रविड यांनी सांगितले. कारवाई करण्यात आलेल्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. हा अहवालच दडविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता नेमकी कोणावर कारवाई झाली हे दडविण्यात येत आहे. ‘‘ही नेहमीची कारवाई असल्यामुळे मी नावे सांगणार नाही,’’ असे डॉ. द्रविड म्हणाले. जिवंत असलेल्या अर्भकाला मृत घोषित करण्याबरोबरच त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही पालकांना देण्यात आले होते. रुग्णालयात दि. २७ एप्रिलला हा प्रकार घडला होता. नेमलेल्या समितीने आज सायंकाळी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे डॉ. द्रविड यांनी सांगितले. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या त्या महिलेला वाचविण्यास प्राधान्य होते. तरीही त्या अर्भकाकडे दुर्लक्ष झाले, असे मान्य करण्यात आले आहे.

अपघातात दोन मुले ठार; आई-वडील जखमी
नांदेड, ६ मे/वार्ताहर

वेगाने जाणाऱ्या मालमोटारीखाली दुचाकी वाहन आल्याने झालेल्या अपघातात दोन मुले ठार झाली व त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले. मालेगाव रस्त्यावर काल रात्री साडेनऊ वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, हरयाणातील एक मालमोटर वसमतकडे जात होती. गुरुद्वारा मंडळातील कर्मचारी गेंदासिंग कामठेकर पत्नी व दोन मुलासह मोटारसायकलवरून जात होते. भरधाव वेगात जाणाऱ्या मालमोटारीखाली दुचाकी आल्याने रमण कामठेकर (वय ७) व कशीशसिंग कौर (वय ४) जागीच ठार झाले. गेंदासिंग व त्यांची पत्नी रेणुकौर गंभीर जखमी आहेत. गेंदासिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. अपघातानंतर मालमोटारीचा चालक फरारी झाला.

घरगुती गॅसची ११३ सिलिंडर जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा
तुळजापूर, ६ मे/वार्ताहर

जादा किमतीने विकण्यासाठी घरगुती वापराच्या गॅस टाक्या नेणारी दोन वाहने नळदुर्ग पोलिसांनी काल मानेवाडी पाटीजवळ ताब्यात घेतली. दोन वाहनांसह ११३ गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त करून वाहनचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील भेडशी येथील ‘वैशाली गॅस एजन्सी’चा चालक महेश पाटील, कमलाकर लक्ष्मण धावणे, जयंत सुभाष भोसले, अंकुश प्रल्हाद धुमाळ व संजय सुखराव गाढवे (सर्व भेडशी) अशी आरोपींची नावे आहेत. महेश पाटील वगळता चार जणांना नळदुर्ग पोलिसांनी आज अटक करून तुळजापूरचे न्यायालयात हजर केले. त्यांची जामिनावर सुटका झाली.

वेतन आयोगाबद्दल शिक्षण सेवकांची नाराजी
जालना, ६ मे/वार्ताहर

सहाव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात शिक्षण सेवकांचा अजिबात विचार करण्यात आला नाही. शिवाय वाहन आणि घरभाडे भत्ता याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सहाव्या वेतन आयोगाची अधिसूचना २२ एप्रिल २००९ या परिपत्रकानुसार जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सुधारित निर्णयानुसार ५ वेतन बॅण्ड व १९ ग्रेड पे ऐवजी आता ३६ ग्रेड पे देण्यात आले आहेत. हकीम यांच्या राज्य वेतन सुधारणा समितीमध्ये पी.बी.-१ साठी ग्रेड पे हा संबंधित वेतनश्रेणीच्या कमाल मर्यादेच्या ४० टक्के म्हणजेच दोन हजार ७०० रुपये होता; परंतु सरकारने सुधारित रचनेनुसार तो आता ५० टक्के म्हणजे ३६०० रुपये असा केला आहे. सहाव्या वेतन आयोगातील विकल्प सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयामार्फत भरून द्यावेत, असे आवाहन परिषदेचे विभागीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी केले आहे.

डुकरे शहराबाहेर हलविण्यासाठी नोटिसा
औरंगाबाद, ६ मे/प्रतिनिधी

स्वाईन फ्लूच्या भीतीने पालिका प्रशासनाने काल कारवाई करताना डुकरांना मारण्यास सुरुवात केली होती. याला मोठय़ा प्रमाणावर विरोध आणि मुदतीसाठी विनंती होऊ लागल्याने संबंधितांना आता तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या तीन दिवसांत शहरातील सर्व डुकरे हे बाहेर जायला हवीत अन्यथा सर्व डुकरांना मारण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. आठजणांना प्रत्यक्ष नोटिसा देण्यात आले असल्याचे मुख्य पशू संवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
शहरात डुकरे पाळण्याचा परवाना कोणालाही देण्यात आलेला नाही; त्यामुळे शहरात डुकरे दिसणेच अपेक्षित नाही. आतापर्यंत काय झाले आणि कशामुळे झाले याशिवाय आतापासून नियमानुसार शहरात डुकरे दिसता कामा नये एवढी खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या मुदतीनंतर कोणालाही पुन्हा मुदत देण्यात येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बोर्ड परीक्षेत पालिकेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
औरंगाबाद, ६ मे/प्रतिनिधी

इयत्ता चौथी आणि सातवी बोर्ड परीक्षेत औरंगाबाद पालिका शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टीका होत असलेल्या पालिकेच्या शिक्षण विभागासाठी ही सुखावणारी वार्ता असल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी विजय जावरे यांनी सांगितले. परीक्षेस बसलेले सर्व विद्याथी उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पुन्हा एकदा पालिका शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे लोटाकारंजा, मोतीकारंजा, जुना बाजार, गांधीनगर यासह शहरातील सात ठिकाणी यापूर्वी बंद करण्यात आलेल्या पालिका शाळा येत्या शैक्षणिक वर्षांपासून नव्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची सर्व तयारी झाली असून शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेश देण्यात येईल, असेही जावरे यांनी सांगितले. पालिका शाळेमध्ये पुस्तकांसह गणवेशही मोफत देण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळेच्या दर्जाचे गणवेश देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पाथरी येथे उपअभियंत्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
हिंगोली, ६ मे/वार्ताहर

पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शेख अब्दुल शेख समद यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हिंगोलीतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. संबंधित कंत्राटदाराला तत्काळ अटक करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठांना दिलेल्या निवेदनावर ए. आर. दन्नाक, एस. ए. जब्बार, भरत कानिंदे, भीमराव धनजकर, एस. एन. देशपांडे, एस. एच. लाहोटी, संजय दांडेगावकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वीज चोरी प्रकरणी चार शेतक ऱ्यांविरुद्ध गुन्हे
लातूर, ६ मे/वार्ताहर

महावितरणच्या उदगीर विभागांतर्गत चाकूर उपविभागातील सुगाव व मुरंबी येथील चार शेतकऱ्यांवर वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुगाव मुरंबी येथे काही पंपधारक शेतात वीजतारांवर आकडे टाकून वीजचोरी करून वापरत असल्याची तक्रार लातूर परिमंडल कार्यालयाला प्राप्त झाली होती. यानुसार उपकार्यकारी अभियंता डी. टी. चौरे, सहायक अभियंता चंद्रकांत दहिफळे यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी सुगाव येथील बंडू मारुती मेकले याने २६ हजार ९३५ रुपये, पुरुषोत्तम यशवंतराव कुलकर्णी याने आठ हजार १३५ रुपये, निवृत्ती मलबा शेळके याने १३ हजार ४८० रुपये तर मुरंबी येथील विलास माधवराव पाटील याने १३ हजार ४८० रुपयांची वीजचोरी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे चारही कृषीपंपधारक वीजतारांवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.