Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पालिका-एमएमआरडीएच्या वादात
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

विकासकामांवरून महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

 

(एमएमआरडीए) यांच्यात वाद रंगला असून एमएमआरडीएच्या कामांमुळे येत्या पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची भीती महापौर शुभा राऊळ यांनी व्यक्त केली आहे.
एमएमआरडीने शहरात सर्वत्र अर्धवट कामे केली आहेत, तसेच विविध कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर एमएमआरडीएने साहित्य तसेच सोडल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य वाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे, असे ताशेरे राऊळ यांनी एमएमआरडीएवर मारले आहेत. तर पालिकेने प्रसारमाध्यमातून आरोप करणे आधी थांबवावे, असा सल्ला देऊन एमएमआरडीएने पालिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. हजारो कोटींची कामे करून एमएमआरडीने पालिकेला उलट मदतच केली आहे, असे एमएमआरडीएने पालिकेला सुनावले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात मुंबई जलमय होत आहे. शहरात अनेक ठिकाणी एमएमआरडीएची कामे सुरू असून ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात पाणी साचत आहे, असा पालिकेचा आरोप आहे.आता पावसाळ्याच्या तोंडावर या दोन संस्थांमधील वाद रंगला आहे. लालबहादूर शास्त्री (एलबीबीएस) मार्गावर एमएमआरडीएने विविध प्रकारची कामे केली आहेत. पालिकेला रस्ते हस्तांतरण करताना ही कामे व्यवस्थित करण्यात आली नाहीत, त्यामुळे एलबीएस रोड या वर्षी पाण्याखाली जाणार, अशी भीती महापौर राऊळ यांनी व्यक्त केली आहे.
आज महापौरांनी विविध ठिकाणी भेट देऊन एमएमआरडीए आणि पालिकेच्या कामांची पाहणी केली. नालेसफाई किती झाली आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. अंधेरी येथे मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी मोगरा नाल्यात भराव टाकण्यात आला आहे. या संदर्भात महापौरांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंत्याला धारेवर धरले. मात्र महापौरांनाच त्याने उलट उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पर्यायी कच्चा नाला बांधला पाहिजे, असे मत महापौरांनी व्यक्त केले. या प्रकरणी येत्या ११ मे रोजीच्या बैठकीत आपण एमएमआरडीएला जाब विचारणार आहोत, असे महापौरांनी स्पष्ट केले. एमएमआरडीए आपल्या कामांबाबत पालिकेसोबत समन्वय करीत नाही, अशी तक्रार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा केली आहे. मात्र या दोन संस्थांमधील समन्वय सुधारण्यापेक्षा बिघडतच चालला असून आता तर या संस्थांमधील वाद चिघळला आहे.
लालबाग येथे जलवाहिनी फुटल्याचे खापर पालिकेने एमएमआरडीएवर फोडले. जलवाहिनी दुरुस्तीचा साधारण सहा लाख खर्च एमएमआरडीएकडून वसूल करणार, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनील डिग्गीकर यांनी जाहीर केले. मात्र याला एमएमआरडीएने आक्षेप घेतला आहे. एवढेच नव्हे तर पालिका एमएमआरडीएवर नाहक आरोप करीत आहे, लालबाग येथील काम आम्ही मार्च महिन्यातच पूर्ण केले आहे, असे स्पष्ट करून पालिकेकडे शासकीय शिष्टाचाराचा अभाव असल्याची टीका एमएमआरडीएच्या परिवहन, दळणवळण विभागाचे प्रमुख पी. आर. के. मूर्ती यांनी केली आहे. एमएमआरडीए शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी पालिकेची आहे, मात्र एमएमआरडीए यात वाटा उचलत असून आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये एमएमआरडीएने खर्च केली आहेत. ३०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारे उड्डाण पूलही पालिकेकडेच हस्तांतरीत करण्यात येणार आहेत, असेही मूर्ती यांनी सुनावले आहे.