Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप
८६ आरोप निश्चित ’ आजपासून खटल्याला सुरूवात
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

सहा महिन्यांपूर्वी २६/११ च्या रात्री सीएसटी, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि

 

चौपाटी येथे पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबने आपल्या साथीदारासह घातलेले मृत्यूचे तांडव शेकडो मुंबईकरांनी स्वत: पाहिले. पण असे असतानाही ‘यह सब कुछ गलत हैं, मुझे यह कबूल नहीं’ असे सांगत कसाबने आज विशेष न्यायालयाने त्याच्यावर निश्चित केलेले आरोप निर्लज्जपणे अमान्य केले. दरम्यान, अभियोग पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रस्तावित केलेल्या ३१२ आरोपांपैकी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी अवघे ८६ आरोप कसाब, मृत दहशतवादी, फरारी दहशतवादी आणि दोन भारतीय संशयितांविरुद्ध निश्चित केले. यामध्ये भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचून प्रत्यक्ष युद्ध करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांसह १६६ निष्पापांचे बळी घेतल्याच्या मुख्य आरोपांचा समावेश आहे.
अभियोग पक्षाने ३१२ प्रस्तावित आरोपांचा मसुदा न्यायालयात सादर केला होता. मात्र न्या. टहलियानी यांनी आज त्यातील ८६ आरोप कसाब आणि अन्य आरोपींवर तीन भागांत निश्चित केले. यातील पहिल्या भागात कसाब, नऊ मृत दहशतवादी, ३५ फरारी दहशतवादी आणि फईम अन्सारी व सबाउद्दीन शेख या दोन भारतीय संशयितांविरुद्ध न्यायालयाने भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणे, २६/११ च्या रात्री मुंबईतील विविध ठिकाणी हल्ला करून त्या कटाची अंमलबजावणी करणे, बनावट ओळखपत्रांद्वारे समुद्रमार्गे बेकायदेशीरपणे भारतात घुसणे, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी करणे, पोलीस अधिकाऱ्यांसह १६६ जणांचा खून करणे, २३४ जणांना गंभीररीत्या जखमी करणे, सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे आदी भारतीय दंड संहिता, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके कायदा, परदेशी नागरिक कायदा, कस्टम कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले तर दुसऱ्या भागात न्यायालयाने कसाब आणि चौपाटी येथे पोलीस चकमकीत ठार झालेला त्याचा साथीदार अबू इस्माईलविरुद्ध आरोप निश्चित केले. त्यात या दोघांनी ठरवून हल्ला केल्याच्या मुख्य आरोपासह पोलीस अधिकाऱ्यांसह ७२ निष्पापांचा बळी घेणे, १३२ जणांना गंभीररीत्या जखमी करणे, स्कोडा कार चोरल्याच्या आरोपांचा समावेश आहे. न्यायालयाने तिसऱ्या भागात एकटय़ा कसाबवर आरोप निश्चित केले असून त्यात सीएसटी, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि चौपाटी येथील हल्ला, स्कोडा कार चोरी, विलेपार्ले टॅक्सीस्फोट घडवून आणल्याच्या आरोपांचा समावेश आहे. हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या फईम आणि सबाउद्दीनवर न्यायालयाने कटाच्या सूत्रधारांना मदत केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले असून फईमवर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कम्प्युटर इन्स्टिटय़ूमध्ये प्रवेश घेणे आणि रिलायन्सचा मोबाईल फोन विकत घेतल्याचा स्वतंत्र आरोप ठेवला आहे. त्यानंतर न्यायालयाने कसाब, फईम आणि सबाउद्दीनला त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेले आरोप समजावून सांगितले तसेच ते मान्य आहेत का, अशी विचारणा केली. मात्र तिघांनीही आपल्याला हे आरोप मान्य नसल्याचे उत्तर दिले. . आजच्या संपूर्ण सुनावणीदरम्यान विशेष म्हणजे न्यायालयाकडून निश्चित केलेले आरोप समजावून सांगितले जातानाही कसाब सतत हसत होता. आरोप निश्चितीनंतर न्यायालयाने उद्यापासून खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरूवात होणार असल्याचेही स्पष्ट केले.