Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

प्रादेशिक

बोरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे नसल्याचा पोलिसांचा दावा
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत दगड व खडी टाकल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एअर वर्क्‍सच्या दोघा कर्मचाऱ्यांनी भरत बोरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुठलेही पुरावे चौकशीत आढळलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र या दोघांनी बोरगे यांना आपली नावे न सांगण्याबाबत धमकावले होते, असे बोरगेंच्या सहकाऱ्यांचे म्हणणे असले तरी ते स्पष्ट करता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रचंड दबावाखाली असलेल्या बोरगे यांना या दोघा कर्मचाऱ्यांनी निश्चितच धमकावले असावे आणि त्या दिशेने पोलिसांनी तपास करायला हवा, अशी मागणी बोरगे यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

शाळांच्या फी नियमनासाठी समिती
मुंबई, ६ मे/प्रतिनिधी

२२ वर्षांपूर्वी केलेल्या कॅपिटेशन फी प्रतिबंधक कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांच्या फीचे नियमन करण्यासाठी राज्य सरकार येत्या दोन महिन्यांत समिती नेमणार असून या समितीचा अहवाल येईपर्यंत सध्या लागू असलेली फी वाढवू नये, असे परिपत्रक राज्यातील सर्व शाळांना पाठविणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील ‘स्टुडन्टस वेल्फेअर असोसिएशन’ने (नियोजित) अध्यक्ष प्रा. एम. एस. देशमुख यांच्यामार्फत केलेल्या याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्या. जय नारायण पटेल व न्या. श्रीमती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे आला होता.

लाखमोलाच्या ‘नॅनो’नंतर आता टाटांचा चार लाखातील घराचा नजराणा
मुंबई, ६ मे/ व्यापार प्रतिनिधी

एक लाखात गाडीचे स्वप्न ‘नॅनो’ सादर करून साकारणाऱ्या टाटा समूहाने आता सामान्यजनाची सर्वात मूलभूत गरज म्हणजे निवाऱ्याच्या प्रश्नाला हात घालताना, वन-रूम किचन फ्लॅट चार लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत देण्याचे वचन दिले आहे.

शक्य होते तितके सरकारी कर्मचाऱ्यांना दिले, पुढचे आताच सांगता येत नाही
दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई, ६ मे/प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारी वाढ सरकारने जितकी शक्य आहे तितकी दिली आहे, असे आज राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मात्र अनेक गोष्टींबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळालेले नसून कर्मचारी व शासन यांत बोलणी सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्याबाबत पुढील गोष्टी देता येतील किंवा नाही, याबाबत मी आताच काही सांगू शकणार नाही, असे सूचक उद्गारही वळसे -पाटील यांनी काढले.

इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्यास मनाई
संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी
डीएड व आरोग्य विज्ञान या अभ्यासक्रमांसाठी इंटर्नशिप करणे अनिवार्य असून हा कालावधी अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. असे असतानाही इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यास मनाई करण्याचा निर्णय मुंबई शहरच्या विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी काल तीव्र आंदोलन केले.

ठाणे पालिका आयुक्तांना उच्च न्यायालयात हजेरी लावण्याचा आदेश
मुंबई, ६ मे/प्रतिनिधी

वर्तकनगर भागातील एक बेकायदा इमारत पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळे आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध फिर्याद का दाखल केली नाही, याचा जाब विचारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना उद्या गुरुवारी सकाळी जातीने हजर राहण्यास सांगितले आहे.

डॉ. गो. मा. पवार यांना ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

‘शब्द - द बुक गॅलरी’तर्फे देण्यात येणारा ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ या वर्षी लेखक-समीक्षक गो. मा. पवार यांच्या ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ या मौज प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाला जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरिवली (प.) येथील सोडावाला लेन महापालिका शाळेच्या सभागृहात १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या हस्ते डॉ. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात मौज प्रकाशनचे संजय भागवत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान प्रा. सुधीर रसाळ भूषवतील.

‘वाढीव वीज बिलांबाबत रिलायन्सने ग्राहकांची माफी मागावी’
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

विजेची वाढीव बिले आल्याने उपनगरातील ग्राहक संतप्त झालेले असतानाच आता टाटा-रिलायन्सच्या वीजखरेदी करारामुळे समान वाटपाबरोबरच समान दर आकारणे रिलायन्सला बंधनकारक करावे आणि उपनगरवासीयांना झालेल्या त्रासाबद्दल रिलायन्सने माफी मागावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

लालबाग पुलाचा ३५ टक्के भाग जमीनदोस्त
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी

लालबाग येथील संत ज्ञानेश्वर पूल पाडण्याच्या कामाने आज आणखी वेग घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुलाचा ३५ टक्के भाग जमीनदोस्त करण्यात आल्याचे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले. चार कटर्स, दोन वायर सॉ, दोन कॉम्बी क्रशर्स, सात पोकलेन आणि एका जेसीबीच्या मदतीने आज दिवसभरात पुलाचे पाडकाम सुरू होते. पुलाच्या ६३ मीटर लांबीच्या ऑब्लिगेटरी स्पॅनपैकी आठ स्लॅब कापण्यात आले.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
गोंधळाशिवाय पार पडण्याबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी
अकरावीसाठी यंदा ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. घरबसल्या प्रवेश होणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ कमी होणार असल्याचे चित्र रंगविले जात आहे. परंतु, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कोणत्याही गोंधळाशिवाय पार पडू शकेल का? याबाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संघाचे कार्यकर्ते अनंत घैसास कालवश
मुंबई, ६ मे / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दहिसर प्रभागाचे संचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत बाळकृष्ण घैसास उर्फ घैसास काका यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या ४० वर्षांपासून संघाची शाखा मोठय़ा निष्ठेने चालविणाऱ्या घैसास काकांचे सामाजिक कार्य उदंड होते. दहिसरमधील जनसेवा समितीचे ते अध्यक्ष होते. दहिसर ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार, ज्येष्ठ नागरिक सहयोग केंद्र, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, श्रीमद् रामायण परिचय योजना, पर्यावरण समिती, ग्राहक समिती अशा अनेक संस्थाच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.