Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९‘मॅजेस्टिक’ने साजरी केली ‘ग्रंथपंचमी’
तीन पुस्तकांचे प्रकाशन, दोन लेखकांचा सत्कार

प्रतिनिधी

मला दिलेला ‘ग्रंथोपासक’ हा पुरस्कार मी स्वीकारतो, पण माझ्यापेक्षा अजूनही मोठमोठे ग्रंथोसापक आहेत. त्यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात यावा, अशी अपेक्षा श्री. बा. जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. आपल्या छोटेखानी मनोगतात त्यांनी डोंबिवलीचे शरद जोशी आणि दत्ताराम दामू गायकर या दोन ग्रंथोपासकांचा आवर्जून उल्लेख केला. श्री. बा. जोशी यांनी सांगितले की, शरद योशी पदरमोड करून नव्याने बाजारात येत असलेल्या वाचनीय पुस्तकांची यादी असलेली पत्रके छापत आणि डोंबिवली ते सीएसटी या प्रवासात ते ही पत्रके वाटत. जेणेकरून किमान त्या रेल्वेच्या डब्यातील माणसांनी ही पुस्तके वाचावीत तर मुंबईतील एका महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करणारे दत्ताराम गायकर हे रस्त्यावरून पुस्तके खरेदी करत आणि अशा प्रकारे सुमारे एक हजार पुस्तके त्यांनी आपल्या गावच्या ग्रंथालयासाठी पाठविली.

अकरावीसाठी ‘ऑनलाइन प्रवेश’ अनिवार्य
प्रतिनिधी

अकरावीसाठी यंदा ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे घरबसल्या प्रवेश होणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ कमी होणार असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कोणत्याही गोंधळाशिवाय पार पडू शकेल का याबाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षीही अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

सेंच्युरी गिरणीच्या कामगारांचा शनिवारी विजय मेळावा
सचिन रोहेकर

मुंबईतील कापड गिरण्या उद्ध्वस्त झाल्या, त्यांच्या जमिनी फस्त झाल्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतील या आद्यउद्योगाचे एव्हाना उरलेसुरले नामोनिशाणही (उंच धुरांडी वगळता) नष्ट झाले; पण तेथे काम करणाऱ्या गिरणी कामगारांची दूरवस्था मात्र अजून कायम आहे. अशा इतिहासजमा झालेल्या गिरणी कामगारांचा एक आगळावेगळा संघर्ष मात्र मुंबईत चालू स्थितीत असलेली शेवटची गिरणी ‘सेंच्युरी मिल्स’ने पाहिला. देशातील संघटित कामगार चळवळीचे जनक असलेल्या गिरणी कामगारांच्या झुंजार वारशाचे भरतवाक्य तरी या अनोख्या विजयाने लिहिले जाईल. येत्या शनिवारी ९ मे रोजी या संघर्षांचा पहिला विजयदिन कामगारांनी मेळावा घेऊन साजरा करण्याचे ठरविले आहे.

संकल्पना उत्क्रांतीच्या
डार्विनपूर्वी उत्क्रांतीचा विचार अनेक विचारवंतांनी केला होता.. त्यातून विकसित झाल्या संकल्पना उत्क्रांतीच्या.. अखेरीस डार्विनने भक्कम पुरावे देत उत्क्रांतिवाद स्पष्ट केला.. ख्रिस्तपूर्व ५२० साली ग्रीक तत्त्वज्ञ अॅनॅक्सिमँडरनं पृथ्वीवरील जीवन सर्वप्रथम समुद्रात विकसित झाल्याचं नमूद करून पुढे पृथ्वीवर जीवन उत्क्रांत झाल्याचं नमूद केलं.. ख्रिस्तपूर्व ५०० साली झिनोफेनस याने चक्क जीवाश्मांचा अभ्यास करत उत्क्रांती मांडण्याचा प्रयत्न केला.. ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटलनंही सागरी जीवसृष्टीचा अभ्यास करून पृथ्वीवरील सजीव सृष्टी कशी विकसित झाली असावी याचा होरा बांधला.. जॉन रे या शास्त्रज्ञानं तर १६८६ साली वनस्पतींची लांबलचक सूची देत त्यांचा विकास एकाच मूळ पूर्वजांपासून झाल्याची संकल्पना मांडली..

‘आमचा पूल’ पाडल्याचे दु:ख होतंय!
लालबागवासियांचे संत ज्ञानेश्वर पुलाला ‘फेअरवेल’

कैलास कोरडे

साडेतीन दशकांहून अधिक काळ लालबागची मुख्य ओळख बनलेला संत ज्ञानेश्वर पूल पाडण्यास एमएमआरडीएने मंगळवारी पहाटेपासून सुरुवात केली. तत्पूर्वी त्याला ‘फेअरवेल’ देण्यासाठी लालबागवासियांनी रात्री उशिरापर्यंत या पुलावर एकच गर्दी केली होती. कुणी पूल जमीनदोस्त होण्यापूर्वी त्यावर फिरण्यासाठी आले होते, तर कुणी पाडकामाच्या कुतूहलापोटी.

सार्वजनिक वाहतूकीसाठी पुलांची गरज
येत्या आठवडय़ाभरात लालबाग येथील संत ज्ञानेश्वर पुलाचे नामोनिशाणही उरणार नाही. लालबागचा हा पूल स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षांत मुंबईत उभ्या राहिलेल्या उण्यापुऱ्या सहा पुलांपैकी एक होय. ३८ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. राणीबाग-परळदरम्यान बांधण्यात येणारा सुमारे अडीच किमी लांबीचा नवा फ्लायओव्हर त्याची जागा घेणार आहे. इतकी वर्षे दक्षिण मुंबईतील वाहतुकीचा भार हलका करणारा हा पूल गिरणगावातील एक मानबिंदु होता.

भेंडीबाजार घराण्याची माहिती देणाऱ्या वेबसाइटचे उद्घाटन
प्रतिनिधी

शास्त्रीय संगीतातील काहीशा अप्रसिद्ध अशा भेंडीबाजार घराण्याची माहिती देणाऱ्या swarmandakini.com या वेबसाइटचे उद्घाटन नुकतेच झाले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी भेंडीबाजार घराण्याच्या पाचव्या पिढीतील प्रसिद्ध शिष्यांचा व ज्यांनी या वेबसाइटच्या निर्मितीत हातभार लावला त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पं. शरद करमरकर, पं. श्रीकांत पारगावकर, फय्याझ हुसेन खाँ, संगीता पंढरपूरकर, वासंती साठे, शुभा जोशी, अनुराधा मराठे, अनुराधा कुबेर आदी शिष्य उपस्थित होते. ही वेबसाइट सुधीर गद्रे व गद्रे कुटुंबीयांनी विकसित करून जुन्या जमान्यातील आकाशवाणी गायिका मंदाकिनी गद्रे व विसूभाऊ गद्रे यांना अर्पण केली आहे. या समारंभात वेबसाइटसंबंधी माहिती देण्यात आली, तसेच भेंडीबाजार घराण्याचे बुजुर्ग उस्माद अमानअली खाँ, पं. शिवकुमार शुक्ल व पं. रमेश नाडकर्णी यांच्या गायनाची ध्वनिफीत ऐकविण्यात आली. त्याचा वेबसाईटमध्ये समावेश केला आहे. भेंडीबाजार घराण्याच्या अमानअली खाँ व त्यांच्या शिष्यांनी रचलेल्या २०० बंदिशींचा या वेबसाईटमध्ये समावेश केला आहे व त्यापैकी सुमारे ६० बंदिशी आता एमपी-३ ऑडिओफाईल स्वरूपात ऐकता व वाटल्यास डाऊनलोड करता येतील, अशी व्यवस्था वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत गोरे यांनी उत्तमरीत्या केले.