Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

श्रीगोंदे तालुक्यातील घोड कालव्याच्या पोटचाऱ्यांची दुरवस्था झाली असून, उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा असा अपव्यय होत आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांच्या कामकाजास सुरुवात
पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी

नगर, ६ मे/प्रतिनिधी

प्रभाग समित्या अस्तित्वात आल्या नसल्या, तरी महापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाले. या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात फिरून पावसाळा पूर्व कामांची पाहणी करावी व ती तत्काळ सुरू करावीत, असा आदेश आयुक्त कल्याण केळकर यांनी दिला.

कोही अधिकारी,
बहुसंख्य बिगारी!
तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

राजू इनामदार, नगर, ६ मे
अनेक तांत्रिक त्रुटी असूनही मुळा धरणातून वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत रोज ५६ दशलक्ष लिटर पाणी टप्प्याटप्प्याने येते. मात्र, पुढची वितरण व्यवस्था इतकी ढिसाळ व अकार्यक्षम आहे की पुरेसे पाणी असूनही शहराला ते व्यवस्थित मिळत नाही. अंतर्गत जलवाहिन्या जुनाट आहेत. त्यांच्यावर क्षमतेपेक्षा जास्त नळजोड आहेत. १२५पेक्षा अधिक ‘व्हॉल्वमन’ मनपाकडे आहेत, पण त्यातील ९० टक्के कर्मचारी बिगारी (म्हणजे कौशल्य आवश्यक असणारे कोणतेही काम न येणारे) आहेत. त्यांना पाणीपुरवठा, जलवाहिनी, व्हॉल्व यासंबंधीचे कसलेही तांत्रिक ज्ञान नाही. ते देण्यातही आलेले नाही.

ब-बदलाचा
बदल आहे सृष्टीचा नियम, स्थायीभाव आणि श्वासही. कालचक्रात हरघडी प्रत्यंतरास येणारा सृष्टीतील हा बदल नानाविध रूपात नित्य दिसतही असतो. जसा सर्वपरिचित असा ऋतुचक्रातील वैशिष्टय़पूर्ण बदल. ग्रीष्मानंतर येतो वर्षां ऋतू आणि वर्षांनंतर येतो शरद. आणि फिरत्या अव्याहत चक्रात पुन्हा येऊन प्रामाणिकपणे तापवताना दिसतो ग्रीष्म. हे अभिनव ऋतुचक्र साहजिकच असतंही अंतर्बाह्य़ जोडलेलं इथल्या नेहमीच लक्षणीय ठरलेल्या हवामानाशी. ऋतुचक्राशीच निगडित अशा या पहिल्या बदलासारखा दुसरा बदलही असतो पुन्हा नित्य अवतरत प्रत्येक नव्या दिवसाबरोबर.

‘तनपुरे’चे २० कामगार निम्मे वेतन घेण्यास राजी
राहुरी, ६ मे/वार्ताहर

तनपुरे साखर कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर पडावा, या उद्देशाने कारखाना कामगारांनी दरमहा ५० टक्के पगार कमी घेण्याची तयारी दर्शविली आहे. सुरुवातीला २० कामगारांनी यात भाग घेतला आहे.

‘भारत निर्माण’मुळे ६५ गावे टँकरमुक्त!
हजारावर गावे, वाडय़ा-वस्त्यांना पाणीयोजनेचा लाभ
नगर, ६ मे/प्रतिनिधी
चांगला लोकसहभाग मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ‘भारत निर्माण’ योजना राबविण्यात नाशिक विभागात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन वषार्ंत या योजनेच्या माध्यमातून योजनेतील ८० टक्के म्हणजे तब्बल १ हजार २० गावे, वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला. वर्षांनुवर्षे टँकरने पाणीपुरवठा होत असलेली किमान ६५ गावे-वाडय़ा आता ‘टँकरमुक्त’ झाले आहेत.

प्रशासकीय दिरंगाईमुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली
नगर, ६ मे/वार्ताहर

तालुक्यातील पिण्याचा पाणीप्रश्न तीव्र होत असून, या टंचाईस प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील टाकळी खातगाव, वाकोडी, तसेच पोखर्डीच्या नाथनगर भागातही पाणीटंचाई आहे. तालुक्यातील टाकळी खातगाव व कुलटवस्ती येथील पाण्याचा टँकर २८ एप्रिलपासून बंद होता. टँकर नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.

कोपरगावला दूरध्वनी सेवा विस्कळित
कोपरगाव, ६ मे/वार्ताहर

रस्ते व जलवाहिनीच्या कामाच्या वेळी केबल तुटल्याने शहरातील दूरध्वनी सेवा विस्कळित झाली आहे. इंदिरा पथ, तहसील कार्यालय, मार्केट यार्ड परिसरात जेसीबीने रस्त्याच्या साईडपट्टय़ा खोदल्याने शहरातील जवळपास २ हजार ५०० दूरध्वनी संच बंद आहेत.
केबल तुटल्याबरोबर दुरुस्त करता येते. मात्र,पूर्वसूचना न दिल्याने गोंधळ होतो. ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी पालिकेने तहसील कार्यालयाजवळ खोदलेल्यामुळे वायर तुटून १ हजार २०० दूरध्वनी बंद झाले. इंदिरा पथ येथेही रस्त्याची कड खोदल्याने ८०० कनेक्शन, मार्केट यार्ड परिसरातही हीच अवस्था आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांपासून शहरातील २ हजार ५०० ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सर्व सेवा सुरळीत चालू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पतसंस्थांच्या विरोधातील गुन्हे दडपण्याचा प्रयत्न करू नका’
नगर, ६ मे/प्रतिनिधी

पतसंस्थांच्या विरोधात होणाऱ्या पोलीस केसेस महाराष्ट्र राज्य पतसंस्था व जिल्हा पतसंस्था फेडरेशनने दडपण्याचा प्रयत्न करू नये. निवेदने, बातम्या देऊन व मोर्चे-बंद ठेवून तक्रारदारांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. पतसंस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत पार पाडावे, असे आवाहन शिवाजी डमाळे, अनिता दिघे, राजेंद्र गडाख आदी वकिलांनी निवेदनाद्वारे केले. पतसंस्थेचे पदाधिकारी कायद्याच्या चौकटीत काम न करता आर्थिक गुन्ह्य़ांचा धुमाकूळ घालत आहेत. समाजसेवेसाठी काम न करणाऱ्या पतसंस्थांची नोंदणी रद्द करता येते. पतसंस्थांचे सामाजिक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारभाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पतसंस्थाचालकांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत पोलीस व प्राप्तिकर खात्याने चौकशी करणे आवश्यक आहे.असे असतानाही आपल्या गुन्ह्य़ांवर पांघरून घालण्यासाठी फेडरेशन दडपण आणत आहे. पतसंस्थांनी आपले गैरव्यवहार स्वत दुरुस्त करावेत, व्याजदर व दामदुप्पटीच्या कायद्याचा अंमल करावा, दाखल केलेल्या १३८च्या केसेस त्वरित मागे घ्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक आदींना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर राम धोत्रे, संजय झिंजे, श्रीराम वाघ, मनीषा पंडित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या तिघांवर कारवाई
देवळाली प्रवरा, ६ मे/वार्ताहर
राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातून वाळूचा मोठय़ा प्रमाणात उपसा सुरू आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत अडकलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी आज उशिरा का होईना तिघांविरुद्ध कारवाई केली. राहुरी शहराजवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळून टेम्पो (एमएच ०४ सी ७००४)मधून दीड ब्रास डबर विनापरवाना नेताना कामगार तलाठी शाहूराव शेलार यांनी पकडून फिर्याद दिली. याबाबत मधुकर काळभोर (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तांदुळवाडी शिवारातून बिगर क्रमांकाच्या महिंद्रा ट्रॅक्टरमधून वाळू नेताना कामगार तलाठी भिका रणदिवे यांनी आज पहाटे ५ वाजता पकडले. ट्रॅक्टरचालक पळून गेला. रणदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तिसऱ्या घटनेत केंदळ बुद्रुक येथील तलाठी सुरेश तारडे यांनी अशोक शेळके (रेल्वेस्टेशन गावठाण) हा मुळा नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू नेताना खळवाडीजवळ पकडण्यात आले.

राजुरी मारामारी प्रकरणी आणखी एकास कोठडी
जामखेड, ६ मे/वार्ताहर
तालुक्यातील राजुरी येथील दोन गटांमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी जामखेड पोलिसांनी काल मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चंदू माणिक काळदाते (राजुरी) याला अटक केली. त्याला दि. ८पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या १२ झाली आहे.

उघडय़ावर शौचाबद्दल मिरीत ८जणांवर कारवाई
पाथर्डी, ६ मे/वार्ताहर

उघडय़ावर शौचास बसणाऱ्या ८जणांवर मिरीत पंचायत समितीच्या स्वच्छता कक्ष विभागाने कारवाई केली. पंचायत समितीने मिरी भागात प्रथमच ही कारवाई केली. सरकारी सेवेत असणाऱ्यांकडे शौचालय असणे बंधनकारक असले, तरी अशा अनेक कर्मचाऱ्यांकडे शौचालये नाहीत. कारवाईत पंचायत समितीचे कक्ष अधिकारी दौंड, विस्तार अधिकारी कासार, ग्रामविकास अधिकारी डी. एच. घुमरे यांनी भाग घेतला.

बस-जीप अपघातात सहा प्रवासी जखमी
कोपरगाव, ६ मे/वार्ताहर

मुंबई-नागपूर रस्त्यावरील संवत्सरजवळील चौफुलीवर एस. टी. बस व टाटा सुमोची धडक होऊन सुमोमधील ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले. नागरिकांनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. आज सायंकाळी ४.३०च्या दरम्यान कोपरगाव-वारी एस. टी. बस (एमएचडब्ल्यू ९४५६) संवत्सर चौफुलीवरून वारीकडे जात असताना वैजापूरकडून येणारी टाटा सुमो (एमएच १७ टी ६२०५) ही जोराने येऊन बसवर आदळली. त्यामुळे बसचे नुकसान झाले. तशी फिर्याद बसचालक उत्तम कुसाळकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. जीपमधील ६ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त समजले. मात्र, सुमोचालकाने रात्री उशिरापर्यंत पोलिसांशी संपर्क साधला नव्हता.

‘घोड’मधून दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू
श्रीगोंदे, ६ मे/वार्ताहर

घोड कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, चाऱ्या-पोटचाऱ्यांची दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत घोडवर सुमारे ४५ कोटी रुपयांची दुरुस्ती कामे सुरू आहेत. मात्र, हे काम ज्या ठिकाणी होणार नाही, त्या पोटचाऱ्यांची अवस्था दयनीय आहे. वितरिका १७ वरील श्रीगोंदे कारखान्याजवळून जाणाऱ्या एका पोटचारीतून पाणी सोडण्यात आले असले तरी तेथे पाणी पोटचारीच्या बाजूने पसरले असून, उन्हाळ्यात पाणी वाया जात आहे.