Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

पीक कर्ज घेणे आणखी कठीण
सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद होणार

नागपूर, ६ मे/ प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनांमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असला तरी सहकारी बँकांनी नवीन पीक कर्ज देताना सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकलेल्या अटी शेतकऱ्यांसाठी जाचक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्ज घेणे शेतकऱ्यांना सोपे राहिले नाही. विदर्भासह देशातील इतरही भागात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे असलेल्या अनेक कारणांपैकी थकित कर्ज हे प्रमुख कारण असल्याने केंद्र सरकारने प्रथम पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे सर्व थकित कर्ज माफ केले होते.

प्रमोद अग्रवालचे संचालक नातेवाईक फरार
पोलीस कोठडीत वाढ

नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

प्रमोद अग्रवाल पोलिसांची दिशाभूल करीत असून त्याचे दोन्ही संस्थांवरील पदाधिकारी असलेले नातेवाईक फरार झाले असल्याची महत्वपूर्ण माहिती तपास पथकाने बुधवारी न्यायालयाला दिली. या प्रकरणाचा आवाका पाहता न्यायालयाने आरोपी प्रमोद अग्रवालची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवून दिली. आरोपी प्रमोद अग्रवाल याची पोलीस कोठडी संपल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जी.आर. ढेपे यांच्यापुढे हजर केले. प्रमोद अग्रवाल हा सीए असल्याचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल करीत आहे.

मनालीतील विचित्र अपघातात कामठीच्या डॉ. चौधरींचा मृत्यू
पत्नी गंभीर जखमी, कन्या सुखरूप

नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे रोहतांग पासनजीक मंगळवारी दुपारी झालेल्या विचित्र अपघातात कामठीच्या चौधरी इस्पितळाचे संचालक डॉ. विक्रम धन्नुलाल चौधरी (५४) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंजू (४८) अपघातात जखमी झाली. या दांपत्यासमवेत असलेली मुलगी भूमिका (१२) हिच्या डोळ्यासमोर हा अपघात घडला. भूमिका अगदी सुखरूप असली तरी वडिलांच्या अपघाती निधनाने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.

महापालिका शाळांमधील मराठी टक्का घसरतोय
राजेश्वर ठाकरे, नागपूर, ६ मे

राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्ष मराठी भाषेच्या भरभराटीची आग्रही भूमिका घेत असताना राज्यातील शहरी भागातील मराठी शाळांमध्ये विशेषत महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेनदिवस कमी होत आहे. नागपूर महापालिकेच्या मराठी शाळांना उतरती कळा लागली असून हिंदी शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने चक्रपाणीनगरात खळबळ
आईच्या तक्रारीवरून पतीस अटक

नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका युवतीचा मंगळवारी रात्री उशिरा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने हुडकेश्वर मार्गावरील चक्रपाणी नगरात खळबळ उडाली. अंगावरील हळद सुकण्यापूर्वीच मृत्यू झाल्याने विवाहितेच्या आईचा शोकावेग आवरत नव्हता. आईच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी विवाहितेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. अर्चना जागेश्वर बांते हे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. कामठीतील बंडू मारोतराव ठवकर (रा. नगर परिषदमागे) यांची ती मुलगी.

कांद्याच्या मालगाडीला कन्हान यार्डात आग
नागपूर, ६ मे/ प्रतिनिधी

नागपूरहून चितपूरला कांदे घेऊन जात असलेल्या मालगाडीला कन्हान रेल्वे यार्डात आज दुपारी तीनच्या सुमारास आग आगली. कळमना गुड्स शेडमधून कांदाची पोती भरून दुपारी २ वाजताच्या सुमारास एक मालगाडी चितगावच्या दिशेने जात होती. प्रवासी गाडय़ांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी कन्हान रेल्वे यार्डात ही गाडी थांबवण्यात आली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे गाडी यार्डात होती. त्यावेळी एका वाघिणीमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. धूर इंजिनला लागून असलेल्या ब्रेकव्हॅन जवळील वाघिणीमधून निघत होता. हे बघून कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. अचानक धुराचे लोंढे वाढू लागल्याने नागपूर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. दोन आगीचे बंब घटनास्थळी आणण्यात आले. एका तासात आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली आणि आगीत किती नुकसान झाले, या विषयी सांगण्यास दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीपकुमार यांनी असमर्थता दर्शवली. घटनास्थळी साहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक व्ही.जी. शामकुळे आणि दोन वाणिज्य निरीक्षक पोहोचले होते.

विक्रम सावरकर यांना सावरकर स्मारक समितीचा जीवन गौरव पुरस्कार
नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते विक्रम सावरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ९ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विक्रम सावरकर यांनी काकांना म्हणजे विनायक दामोधर सावरकर यांना नेता आणि गुरू मानले आहे. नागपुरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक, राजकीय कार्याला प्रारंभ केला. वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता, युवकांचे संघटन व विद्यार्थी हिताच्या चळवळीत ते सक्रीय होते. यूकॅरिस्टिक काँग्रेस विरोधी आंदोलन, भाववाढ विरोधी आंदोलन, शंकराचार्य प्राणरक्षा आंदोलन, सिमला करार विरोधी आंदोलन, कच्छ विरोध, बंगाली निर्वासित पुनर्वसन चळवळ इत्यादींमध्ये विक्रम सावरकर सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे ते संस्थापक सदस्य आहेत. गेल्या ४१ वर्षांंपासून ते प्रज्वलंत मासिकाचे संपादन करीत आहेत. पुरस्कार समारंभाला ज्येष्ठ साहित्यिक व वीर सावरकर बोलपटाचे दिग्दर्शक वेद राही व प्रवचनकार प्रा. सु.ग. शेवडे उपस्थित राहणार आहेत.

मतमोजणीपूर्वी यंत्रांचे बारकोडिंग करण्याची आयोगाकडे मागणी
नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

मतदान केंद्रानुसार झालेले मतदान गुप्त ठेवण्यासाठी यंत्रांचे बारकोडिंग करण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्राव्दारे जेव्हापासून मतदान होत आहे, तेव्हापासून यंत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र केंद्रानुसार झालेले मतदान गुप्त ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर किती मतदान झाले याची माहिती उमेदवाराला मिळते. त्यामुळे गुप्त मतदानाचा हेतू साध्य होत नाही. दलित, मुस्लिम आणि आदिवासी वस्तीत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली हे सुद्धा कळत असल्याने त्याचे परिणाम निवडणुकीनंतर दिसून येतात. पूर्वी सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येत होत्या व नंतर त्याची मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे वितुष्टता येत नव्हती. यंत्रात अशी कोणतीच पद्धत नसल्याने केंद्रानिहाय मतदानाची माहिती उमेदवारांना मिळते. त्यामुळे सर्व यंत्राचे बारकोडिंग करावे, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी आयोगाकडे केली आहे.

जर्मन संभाषण वर्गाचे उद्घाटन
नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

वसुंधरा समाज दर्पण अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी जर्मन संभाषण वर्गाचे उद्घाटन प्रीती छाब्रा यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्रनगरातील अरविंद अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या संभाषण वर्गात शालेय विद्यार्थी, गृहिणी आणि व्यावसायिक सहभागी झाले आहेत. दोन महिने हा संभाषण वर्ग चालणार आहे. गीता पितळे या वर्गामध्ये जर्मन भाषेविषयी माहिती देणार आहेत. यावेळी प्रीती छाब्रा म्हणाल्या, जर्मन ही भाषा अवघड असली तरी, प्रयत्नपूर्वक ती आत्मसात करता येऊ शकते. रोजगार मिळवण्यासाठी तसेच बायोडाटा अपग्रेड करण्यासाठी या भाषेचे शिक्षण उपयोगी ठरू शकते. लक्षपूर्वक अध्ययन केल्यास दोन महिन्यात जर्मन भाषेत संवाद साधता येऊ शकतो, असेही प्रा. छाब्रा यांनी सांगितले. यापूर्वीच्या र्वगमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेले संवाद कौशल्य बघून विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. जर्मन भाषेतील खाचखळग्यांची, मनोरंजक शब्दांची, ग्रामीण जर्मन आणि शहरी जर्मन यांच्यातील फरकाचीही माहिती प्रा. छाब्रा यांनी दिली. संस्थेतर्फे उन्हाळ्यात जपानी, फ्रेंच, इंग्रजी, आणि रशियन संभाषण वर्गाचेही आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग १५ आणि २२ मे पासून सुरू होतील. इच्छुकांनी अरविंद अकादमी, नरेंद्रनगर, रिंग रोड किंवा ९९२२०६७१०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

उन्हाळय़ाच्या सुटीसाठी इंग्रजी व्याकरणाचे वर्ग
नागपूर, ६ मे/प्रतिनिधी

लक्ष्मीनगर येथील अथर्व कोचिंग क्लासेसतर्फे खास उन्हाळय़ाच्या सुटीसाठी इंग्रजी व्याकरणाचे वर्ग आयेाजित करण्यात आले आहेत. २० मे ते २० जून या कालावधीत हे क्लासेस घेतले जाणार आहेत. क्लासेसमध्ये इंग्रजी विषयाचे संपूर्ण व्याकरण, सृजनशील लिखाण, शब्दसंग्रह वाढवणे, इंग्रजी भाषेचा योग्य वापर, निबंध, पत्र लेखन, रिपोर्ट, डायलॉग, रायटिंग, नोट मेकिंग आदींचा समावेश राहील. अभ्यासक्रम संपल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी अर्चना जोशी, जे-६, २०२, कार्तिकेय अपार्टमेंट, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, नागपूर, दूरध्वनी क्र. २२४२७३५, भ्रमणध्वनी क्र. ९८६०११२३०८ येथे संपर्क साधावा.

कुंभार समाज महासंघास सामाजिक सेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार
नागपूर, ६ मे/प्रतिनिधी

दिवंगत द.आ. शिंदे स्मृती प्रतिष्ठान पुणेतर्फे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, विज्ञान व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांतर्गत, नागपूर जिल्हा महाराष्ट्र कुंभार समाज महासंघास सामाजिक सेवा-२००९चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. पुणे शहरातील एस.एम. जोशी सभागृहात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते, कार्याध्यक्ष सुरेश कोते, सुप्रसिद्ध शिल्पकार बी.आर. खेडकर तसेच, प्रतिष्ठानचे विश्वस्त विवेक शिंदे, प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हाध्यक्ष गोपाल बनकर व सरचिटणीस सुरेश पाठक यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महासंघाच्या या यशाबद्दल विदर्भ विभागीय संघटक गोविंद वरवाडे, महिला आघाडी अध्यक्ष सरोजिनी कन्हारे, कार्याध्यक्ष चंद्रकला चिकाणे, कुंभार प्रगती मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर वाल्दे, कुंभार सेवा पंचकमेटीचे अध्यक्ष राजीव खरे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्नीवर हल्ला करून रिक्षा चालकाची आत्महत्या
नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

गांजाच्या आहारी गेलेल्या एका रिक्षा चालकाने पत्नीला फावडय़ाने मारून स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. िहगण्यापासून तेवीस किलोमीटर अंतरावरील बेलतरोडी येथे मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारुती सूर्यभान अलोणे असे रिक्षा चालकाचे नाव असून तो गांजाच्या आहारी गेला होता. त्याने रिक्षा चालवणे बंद केल्याने घरात उपासमार होऊ लागली. ‘त्यामुळे घर चालणार कसे’ असे त्याची पत्नी सुनीताने म्हटल्याने तो संतप्त झाला. त्याने घरातील फावडे सुनीताच्या डोक्यावर मारले. जोरदार प्रहाराने ती बेशुद्ध झाली आणि खाली पडली. तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. ती मेली, असे वाटल्याने मारुतीची नशा खाडकन उतरली. तो घाबरला. घराच्या मागे असलेल्या शेतातील एका झाडाला त्याने वायरने गळफास घेतला. हे समजताच िहगणा पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी सुनीताला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मारुतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सुरुची अंधारेच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन
नागपूर, ६ मे / प्रतिनिधी

नागपूरची प्रतिभावंत चित्रकार सुरुची अंधारे-जामकर हिच्या ‘टेल ऑफ इटर्निटी अँड ट्रॅक्विलिटी’ चित्रमालिकेचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २५ मे ३१ मे पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सुरुचीने मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून एम.एफ.ए. केले असून तिच्या चित्रांचे देशभरातील १५ विविध गॅलरीजमध्ये प्रदर्शन झाले असून यात दिल्लीचे इंडिया इंटरनॅशनल सेंटर, मुंबईचे नेहरू सेंटरमधील प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सुरुचीच्या चित्रांना नेहरू कल्चरल पुरस्कार, डॉली कर्स्टजी पुरस्कार आदी प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले असून तिची उत्कृष्ट चित्रनिर्मिती, अचूक रंगसंगती, व्यासंग तसेच निरीक्षणाची दिग्गज कलावंतांनी प्रशंसा केली आहे. ऑईल पेंटिंग, अॅक्रिलिक पेंटिंग तसेच सिल्क कोलाजमध्ये तिचा हातखंडा आहे. सुरुचीचे पती स्क्वॉड्रन लीडर विश्वास जामकर मिग -२१ चे लढाऊ वैमानिक आहेत. सुरुचीच्या चित्रांचा खास प्रिव्ह््यू येत्या शुक्रवारी, ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून अंबाझरी हिलटॉपमधील ५, विहंगम या निवासस्थानी निवडक निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आला आहे.