Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

नवनीत

मुनी महाराजांच्या प्रवचनाला रोजच खूप गर्दी व्हायची. अगदी साध्या साध्या शब्दांत साधी उदाहरणं देऊन लोकांना धर्माचं महत्त्व सांगत. ‘जीवन म्हणजे सुई आहे व धर्म दोरा. सुईमध्ये दोरा ओवलेला असला की सुई हरवत नाही. सहज सापडते. तसेच जीवनात धर्म म्हणजे सदाचरण, सद्विचार असेल की माणूस बहकत नाही. वाईट मार्गाला जात नाही.’
एके दिवशी एका भक्तानं वंदन करून म्हटलं, ‘महाराज, किती प्रयत्न केले, पण व्यसन

 

सुटत नाही. पुन:पुन्हा व्यसनाकडे वळतो. काय करू?’
‘वत्सा! असं होणं शक्य नाही. तुझे प्रयत्न, आत्मशक्ती कमी पडली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो.’
‘एका मुनीला त्याच्या प्रिय शिष्यानं विचारलं, ‘प्रभू, या जगात अशी काही वस्तू आहे का जी शिळेपेक्षा कठीण असते?’
‘हो, लोखंड शिळेपेक्षा कठीण असते.’
‘लोखंडापेक्षा काही मजबूत प्रखर असते का?’
‘हो! अग्नी लोखंडालाही वितळवतो.’
शिष्यानं पुन्हा विचारलं ‘आणि अग्नीपेक्षा बलवान?’
‘जल- पाणी जे आगीला विझवून टाकतं’.
‘आणि जलापेक्षा?’
‘वायू! जो जलप्रवाह बदलून टाकतो. पाणी वर्षवणाऱ्या मेघांनाही उधळून लावतो..’
‘प्रभो, वायूपेक्षा बलवान काय आहे या जगात?’
मुनी महाराज म्हणाले, ‘मनुष्याची शक्ती. आपल्या शक्तीनं, बुद्धीनं माणसानं अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. महान शोध लावले आहेत. सामान्य माणूस जे करू शकणार नाही, ते माणसानं आपल्या मन:शक्तीनं करून दाखवलं आहे. शक्तीमुळे, आत्मशक्तीमुळे, मन:शक्तीमुळे मनुष्य परमात्माही होऊ शकतो..’ शिष्यानं यापुढे काही विचारलं नाही आणि भक्तही म्हणाला, ‘महाराज मी ही शक्ती उपयोगात आणीन.’
लीला शहा

ग्रहाचे अधिक्रमण म्हणजे काय? ते किती काळाने होते?
अधिक्रमण म्हणजे एक प्रकारचे ग्रहणच. अधिक्रमण हे फक्त अंतग्र्रहाचेच होऊ शकते. तसेच अधिक्रमणे ही अंतग्र्रहांच्या अंतर्युतीच्या वेळेसच होता. अंतग्र्रहांच्या कक्षा या सूर्य व पृथ्वी या दरम्यान आहेत. अंतर्युतीच्या वेळी कधी कधी अंतग्र्रह सूर्य व पृथ्वी यांच्या अगदी मध्ये येतो. त्या वेळेस पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्यिबबावरून संथपणे सरकणारा अंतग्र्रहाचा काळा ठिपका दिसू शकतो. यालाच त्या ग्रहाचे अधिक्रमण म्हटले जाते. अधिक्रमणातील बुध व हा सूर्यबिंबाच्या सुमारे अर्धा टक्का आकाराचा, तर शुक्र हा तीन टक्के आकाराचा दिसतो. ग्रह हा अधिक्रमणाच्या काळात सूर्यिबबाच्या सुमारे अर्धा टक्का आकाराचा तर शुक्र हा तीन टक्के आकाराचा दिसतो. ग्रह हा अधिक्रमणाच्या काळात सूर्यिबबाच्या जितका केंद्राजवळून जाईल, तितकं अधिक्रमण अधिक काळ चालते. बुधाच्या अधिक्रमणाचा कमाल कालावधी सहा तासांइतका असतो. बुधापेक्षा धिम्या गतीने प्रवास करणाऱ्या शुक्राचे अधिक्रमण जास्तीत जास्त आठ तासांपर्यंत चालते.
सूर्याच्या कक्षेच्या प्रतलाशी बुधाच्या कक्षेचे प्रतल हे ७ अंशांचा तर शुक्राच्या कक्षेचे प्रतल हे ३ अंशांचा कोन करते. त्यामुळे प्रत्येक अंतर्युतीच्या वेळी सूर्य, ग्रह आणि पृथ्वी अगदी एका रेषेत येतातच असे नाहीत. म्हणूनच जसे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही, तसेच प्रत्येक अंतर्युतीच्या वेळेस अधिक्रमण होऊ शकत नाही. मे किंवा नोव्हेंबर महिन्यांत बुधाची अंतर्युती होत असेल तर त्या वेळी बुधाचे अधिक्रमण होऊ शकते. अशी स्थिती निर्माण होण्यास लागणारा किमान कालावधी तीन वर्षांचा आणि कमाल कालावधी १३ वर्षांचा असतो. शुक्राचे अधिक्रमण हे जून किंवा डिसेंबर महिन्यांत अंतर्युती झाल्यास घडून येते. शुक्राचे अधिक्रमण ही ८, १०५, ८, १२२ वर्षांच्या चक्रात घडून येतात. शुक्राची सूर्याभोवतालच्या भ्रमणाची गती बुधापेक्षा मंद असल्यामुळे शुक्राची अधिक्रमणे ही दुर्मिळ आहेत.
मृणालिनी नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

बाळुताई खरे, मालतीबाई बेडेकर आणि विभावरी शिरूरकर ही नावं तीन नव्हे तर एकाच स्त्रीची आहेत. पण आपले साहित्य मात्र या तिन्ही नावांनी लिहिणाऱ्या बंडखोर लेखिका मालतीबाई बेडेकर यांचा जन्म रायगड जिल्हय़ातील अलिबाग तालुक्यातील ‘अवास’ या गावी १ ऑक्टोबर १९०५ रोजी झाला. माहेरचे त्यांचे नाव बाळुताई खरे. वडील मास्तर म्हणून घरात शिक्षणाचे वातावरण, िहगण्याच्या वसतिगृहातून त्या पदवीधर झाल्या. दरम्यानच्या काळात विश्राम बेडेकर या चित्रपट व्यवसायातील तरुणाशी त्यांनी विवाह केला.
सरकारच्या महिला सेवाग्राम या खात्यात काम करत असताना अनाथ, विधवा व पीडित स्त्रियांचे दु:ख त्यांना जवळून पाहायला मिळाले. या दु:खांना त्यांनी वाचा फोडली साहित्यातून. मौज, तरुण भारत, स्त्री, मनोहर, केसरी आदी मासिकांतून स्त्री, तिचे हक्क, शिक्षण, समाजातील स्थान यावर जळजळीत लिखाण विभावरी शिरूरकर या नावाने केले. त्या काळात एका स्त्रीने स्त्रीचे तत्कालीन समाजातील वास्तव इतके स्पष्टपणे आणि निर्भीडपणे लिहावे हे समाजाला पटले नसते, म्हणून हे टोपणनाव घेतले.
‘हिंदोळय़ावर’, ‘विरलेले स्वप्न’, ‘जाई’, ‘शबरी’ या कादंबऱ्यांतून स्त्रियांच्या समस्या हाताळल्या. ‘बळी’तून गुन्हेगारी विश्व, ‘शबरी’तून सुशिक्षित स्त्रीची शोकांतिका, ‘कळय़ांचे नि:श्वास’ या कथासंग्रहातून प्रौढ कुमारिकांचे प्रश्न याशिवाय विधवाकुमारी, ‘खरे मास्तर’ हे वडिलांचे चरित्र, अलंकार मंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे ग्रंथ ‘विभावरी’ या टोपणनावाने लिहून मराठी साहित्य जगतात खळबळ उडवून दिली. जवळ जवळ दीड दशकांनी ‘साखरपुडा’ या चित्रपटाच्या कथेनिमित्ताने त्यांचे खरे नाव लोकांसमोर आले. त्यांच्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार तसेच अन्य भाषांतही भाषांतर झाले. ७ मे २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

शेतातल्या झाडाला भले थोरले मधाचे पोळे लागले होते. शेतकऱ्याने ते पाहिले. पोळे काढून त्यातला मध एका छोटय़ाशा रांजणामध्ये भरून ठेवला. त्याने विचार केला, की सणासुदीला पोरेबाळे आवडीने खातील. वैद्याकडे थोडा देऊ. त्याला औषधे देताना उपयोगी पडेल.
एका टपोऱ्या, धष्टपुष्ट गांधीलमाशीने तो मध पाहिला. रांजणात जाऊन तिने मध चाटला आणि ती फारच तृप्त झाली. आपल्याला सापडलेला गोडाचा ठेवा तिने इतर गांधीलमाश्यांना दाखवला. सगळय़ा लगबगीने आल्या आणि मधाच्या रांजणावर त्यांनी ताव मारला. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की मध खाताना त्यांचे पंख, पाय मधाने लडबडून गेले आहेत. त्यामुळे त्या रांजणाला चिकटल्या होत्या. प्रत्येकजण उडायची धडपड करू लागली. सारे बळ एकवटून पाय, पंख सोडवण्याचा सायास करू लागली. पण काहीही उपयोग होईना. एक पाय काढला तर दुसरा रुते, एक पंख सुटला तर दुसरा चिकटून बसे. त्यांना रांजण सोडून काही उडून जाता येईना. प्रयत्न करून करून सगळय़ा थकून गेल्या, निराश झाल्या.
दु:खीपणे रांजणावर बसून राहिलेल्या गांधीलमाश्या स्वत:लाच दोष देत होत्या. मधाने गोड झालेले तोंड दु:खाने आणि स्वत:वरच्या संतापाने कडू जहर झाले होते.
ज्या गांधीलमाशीने त्यांना मधाचा रांजण दाखवला तीही त्यांच्यातच होती. आपण हे काय करून बसलो. आपल्याबरोबर इतरजणींनाही आपण अडचणीत आणले, याचे तिलाही वाईट वाटत होते.
आपला आनंद, सुख, दु:ख याला आपणच कारणीभूत असतो. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद वाटतो, मजा वाटते, जी गोष्ट करायला आपल्याला आवडते ती गोष्ट जरूर करावी. पण तीच गोष्ट पुढे जर दु:खदायक ठरणार असेल तर त्या सुखाचा, मजेचा, आनंदाचा मोह टाळणे शहाणपणाचे ठरते.
आजचा संकल्प : परिणामाचा विचार करून मी कोणतीही गोष्ट करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com