Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

घारापुरी बेटावर गोवरची साथ
उरण/वार्ताहर -
घारापुरी बेटावर गोवरची साथ पसरली असून, रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घारापुरी बेटावर राजबंदर, शेतबंदर व मोराबंदर अशी तीन गावे असून, इथली लोकसंख्या १२००च्या आसपास आहे. या बेटावरील रहिवाशांना सध्या गोवरच्या साथीने ग्रासले आहे. गोवरचे ३५ ते ४० रुग्ण काही दिवसांपासून आढळून आले आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होत असल्याची माहिती घारापुरी ग्रामपंचायत सदस्य अजय म्हात्रे यांनी दिली. गोवरच्या साथीबरोबरच मलेरिया, अतिसाराचेही रुग्ण आढळून येत आहेत. मात्र घारापुरी बेटावर वैद्यकीय सोयीचा अभाव असल्याने येथील रुग्णांना उपचारांसाठी उरण, मुंबईसारख्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. घारापुरी बेटावर उद्भवलेल्या रोगाच्या साथीबाबत ३० एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही ग्रामपंचायत व वैद्यकीय विभागाने त्याकडे दुर्लक्षच केल्याने दिवसेंदिवस साथीच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होत चालली असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. आरोग्य विभागाकडून वेळीच उपाययोजना न झाल्यास रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

पनवेलमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
पनवेल/प्रतिनिधी -
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे ३० मे ते २ जून या कालावधीत राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील १६ पुरुष आणि १६ महिला संघ सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील आठ संघही या स्पर्धेत कौशल्य पणाला लावणार आहेत. एकूण ५६० खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने पनवेलमध्ये येणार आहेत. या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघांचे चार गट पाडण्यात आले असून, दोन्ही गटांचे प्रत्येकी २४ सामने होणार आहेत. दिल्ली, जोधपूर, चेन्नई, भोपाळ, हैदराबाद, पुणे, सातारा, नाशिक, मुंबई आदी ठिकाणचे अव्वल संघ स्पर्धेत उतरणार असल्याने पनवेलकरांना अतिशय चुरशीचे सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

उरणचे माजी नगराध्यक्ष रवी भोईर अपात्र
उरण/वार्ताहर -
उरण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा बोलाविण्यात दाखविलेली अनियमितता आणि सत्तेचा गैरवापर करून जादा दराच्या निविदा स्वीकारल्याचा ठपका ठेवून शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य रवी भोईर यांना मुख्यमंत्र्यांनी सहा वर्षांंसाठी अपात्र ठरविले आहे. यामुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.
उरण नगर परिषदेच्या २००७ साली नगराध्यक्षपदी सेनेचे रवी भोईर हे विराजमान होते. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये घेण्यात आली नाही, तसेच उरण नगर परिषदेच्या सवरेदयवाडी व टाऊन हॉल येथील जीएसआर टाकीच्या आऊटलेट व इनलेट या कामासाठी आलेल्या दहा टक्क्यांहून अधिक असल्याने फेरनिविदा काढणे आवश्यक होत्या. मात्र ३१ ते ३७ टक्के जादा रकमेच्या निविदा स्वीकारून नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी विरोधी सभागृह गटनेते चिंतामण घरत यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून दाद मागितली होती. या तक्रार अर्जावर सुनावणी होऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या दोन्ही प्रकरणात रवी भोईर यांना दोषी ठरविले.