Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

थंडाव्याची अनुभूती.. कडाक्याच्या उन्हामुळे होणाऱ्या जीवाच्या काहिलीवर थंडगार पाण्यात डुंबण्यासारखा दुसरा उतारा तो काय असणार? त्यामुळेच जागोजागच्या तरण तलावांबरोबरच वॉटर पार्क सारख्या ठिकाणीही सध्या अशी तुडुंब गर्दी होत आहे. बच्चेकंपनी तर सुटीला पाण्यात डुंबण्याच्या आनंदाची जोड देण्यावरच भर देत असल्याचे दिसते.

दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश
१४ मोटारसायकलींसह साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत

प्रतिनिधी / नाशिकरोड

दिवसेंदिवस दुचाकी वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर नाशिकरोड पोलिसांनी दुचाकी चोरांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून तब्बल १४ हिरो होंडा मोटारसायकलसह एकूण चार लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांत दाखल १३ गुन्ह्य़ांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याच संशयितांकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जळगावमध्ये युती व आघाडीचे पारडे समान
निकालाचे काउण्टडाऊन,अविनाश पाटील

प्रचारादरम्यान प्रचंड उत्साह दाखविणारे बहुतांश राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी अंतर्धान पावत असल्याचे चित्र राज्यात सगळीकडे दिसत असताना त्यास जळगाव लोकसभा मतदारसंघाचा अपवाद कसा राहील ? त्यामुळेच अवघे ४२ टक्के झालेले मतदान राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार खा. अॅड. वसंत मोरे यांना पुन्हा एकदा संधी देणार की भाजप-सेना युतीचे ए. टी. पाटील यांच्या पथ्थ्यावर पडणार, या चर्चेचे गुऱ्हाळ सध्या मतदारसंघात सुरू आहे.

गुरुजी!
मंडळी गावची पाटील. त्यातही काळ जुना, म्हणजे गावात पाटलाचा शब्द अखेरचा. पण, एक निर्णय मात्र पाटील आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकले नाहीत. तो म्हणजे गावात चांगली शाळा बांधण्याचा. शाळेच्या इमारतीऐवजी मंदीर उभे रहावे या गावकऱ्यांच्या रेटय़ामुळे राजधर पाटलांची इच्छा अपुरीच राहिली.. परंतु, त्यांच्या मुलाने म्हणजे सी. आर. पाटील यांनी एका वेगळ्या आणि व्यापक अर्थाने या स्वप्नाची पूर्तता केली.

वीजेसंबंधित अडचणींवर मात करण्यासाठी १३० कोटींची योजना
विजेशी खेळ (३)

प्रतिनिधी / नाशिक

अनधिकृत बांधकामांमुळे सिडको परिसरातील वीज वाहिन्या भूमीगत करण्याच्या प्रश्नाने जटील स्वरूप धारण केले असले तरी शहरातील उर्वरित भागात तब्बल ४० किलोमीटर लांबीच्या उच्च व लघु दाबाच्या वीज वाहिन्या या पद्धतीने रूपांतरीत करण्याची प्रक्रिया लवकर सुरू होत आहे. वीज पुरवठय़ाशी संबंधित निर्माण झालेल्या विविध अडचणी लक्षात घेवून महावितरण कंपनीने तब्बल १३० कोटी रूपयांची खास योजना मांडली असून त्या माध्यमातून भूमीगत वीज वाहिनीच्या विषयाबरोबर तब्बल १,६८८ विद्युत रोहित्र बदलणे आणि शहरात आठ नव्या उपकेंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

एच.पी.टी.च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
प्रतिनिधी / नाशिक

एच.पी.टी. महाविद्यालयातील १९५५ ते १९५९ या काळातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा १० मे रोजी महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे. मेळाव्यासाठी जमणारी मंडळी आज ६५ ते ७० वा त्याहूनही अधिक वयाची आहेत. प्रदीर्घ काळानंतर जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे माजी विद्यार्थी एकत्र येणार आहेत. १० मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. या स्नेहमेळाव्यात एकत्रित छायाचित्र, सुसंवाद, कॅम्पसमध्ये फेरफटका, उद्घाटन, कृतज्ञता सत्कार आणि जुन्या स्मृतींना उजाळा व परिचय असा आराखडा आहे. मेळाव्यास गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, प्रा. एस. बी. पंडित, चंद्रकांत वर्तक, राम बापट आदिंना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, गुजरात, नाशिक, कोल्हापूर, बडोदा आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनंतर परस्परांना भेटणार आहेत.

कीर्तनकार विनायक कुलकर्णी यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

येथील प्रसिद्ध हरदासी, नारदीय कीर्तनकार विनायकराव केशव कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. कीर्तनप्रेमी दास बाळ विनायक या नावाने त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचा भक्त परिवार आहे. लहान वयातच त्यांनी प्रबोधनात्मक विचारांचा प्रसार करण्यासाठी कीर्तन माध्यमाचा उपयोग केला. त्यात दारूबंदी, साक्षरता, हुंडाबळी, राष्ट्रीय एकात्मता अशा विषयांचा समावेश असे. संत साहित्यातील साहिष्णु वृत्ती, करूणा, प्रेम यांचा उपयोग समाज व संस्कृती प्रगल्भ करण्यासाठी करावा, असा संदेश ते देत. लोकसंस्कृती, लोकसाहित्याची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांचा भर असे. विश्वास को-ऑफ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरी कुलकर्णी व धुळे येथील एनसीसी ऑफिसमधील अकौंटंट ऑफिसर भटू कुलकर्णी यांचे ते वडील होत.

फेस शिवारात एकाची हत्या
शहादा / वार्ताहर

तालुक्यातील फेस शिवारात दगडाने ठेचून सायसिंग करणसिंग भील (४५) यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.भील यांचा मृतदेह सकाळी आढळून आल्यानंतर त्यांचे पुतणे भरत भील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायसिंग यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.