Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

सामाजिक वनीकरणातर्फे पर्यावरणविषयक उपक्रम
जळगाव / वार्ताहर

सध्या सुटीचे दिवस असून जिल्ह्य़ातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्यामध्ये पर्यावरण विषयक गोडी कायम रहावी, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक बाबींविषयी नव्याने माहिती मिळणार आहे. उन्हाळ्यामध्ये बाजारात आंबा, फणस, जांभूळ इत्यादी विविध प्रकारची फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ही फळे खाताना त्यापैकी चांगल्या फळांच्या बिया गोळा करण्यात याव्यात तसेच शाळा किंवा घराजवळ मोह, चंदन, नीम, करंज, एरंड या तेल बियांची झाडे असतील तर त्याच्याही बिया गोळा करण्यात याव्यात.

पाणीटंचाईमुळे वादावादीला तोंड
वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ातील काही गावांमधील पाणी टंचाईने भीषण रुप धारण केल्याने लहान-मोठय़ा वादांना स्थानिक पातळीवर तोंड फुटले आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना राजकीय हस्तक्षेप, प्रशासनाचे आडमुठे धोरण, कामातील दिरंगाई याबाबी चव्हाटय़ावर येऊ लागल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकरवी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मूठभर लोकांनीच याचा लाभ घेण्याचे सत्र अवलंबले असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील वाडी-शेवाडी या धरणातील पाण्याचा वादही गाजू लागला आहे.

वऱ्हाडाला अपघात; एक ठार, १५ जखमी
वार्ताहर / वणी

वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वऱ्हाडाच्या टेम्पोस झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर १५ जखमी झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात वणी-सापुतारा महामार्गावर खोरी या गावाजवळ हा अपघात झाला. दिंडोरी तालुक्यातील श्रीरामनगर येथील वऱ्हाड सुरगाण्याजवळील सराड येथे विवाह सोहळ्यास गेले होते. दुपारी विवाह आटोपल्यानंतर अस्वलीपाडा येथे आणखी एका विवाहासाठी वऱ्हाडाला घेऊन टेम्पो निघाला. टेम्पोमध्ये प्रमाणापेक्षा अधिक गर्दी होती. दुपारी अडीचच्या सुमारास खोरी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. अपघातात मैनाबाई संतोष तलवारे (५५, रा. कोपूर्ली, ता. पेठ) या जागीच ठार झाल्या तर चालक साहेबराव शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एकूण १७ जणांचा समावेश आहे. परिसरातील नागरिकांनी त्वरित मदतकार्य सुरू केले. जखमींना वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन
धुळे / वार्ताहर

तालुक्यातील मुकटीसह २१ गाव पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करावी या मागणीसाठी आंदोलन केल्यामुळे अटकेत असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ३० मार्च रोजी २१ गाव पाणीपुरवठा योजनेची कार्यवाही सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आंदोलन करण्याात आल्याने सर्व ९० आंदोलकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलकांमध्ये सोनवणे यांच्यासह महानगरप्रमुख हिलाल माळी, जिल्हा परिषद अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, प्रा. शरद पाटील यांचाही समावेश होता. या सर्वाना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

‘एमएचटी सीईटी’साठी चार हजार परीक्षार्थी
धुळे / वार्ताहर

आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सामूहिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) १२ मे रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ४ हजार ९४८ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जी. व्ही. परदेशी यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उपकेंद्राचा कोड नंबर आणि विद्यार्थी संख्या (केंद्राचे नाव व विद्यार्थी संख्या या क्रमाने) जयहिंद हायस्कूल- १००८, जिजामाता कन्या विद्यालय- ५७६, एल. एम. सरदार उर्दू हायस्कूल - ५२८, कि. सो. कम्यूसिटी हायस्कूल- ३८४, आर. आर. पाडवी नूतन विद्यालय- ३३६ जे. आर. सिटी हायस्कूल- १६८, महाराणा प्रताप हायस्कूल- १४४ हे सर्व एम. बी. कोडनुसार केंद्र आणि विद्यार्थ्यांची संख्या अशी. एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज - ४८०, एकवीरादेवी विद्यालय- ४८०, महाजन हायस्कूल -२६४ असे एकूण १,२२४ विद्यार्थी आहेत. बी. बी. कोडनुसार छत्रपती शिवाजी हायस्कूल- ५७६, एम. बी. एम. एम. व बी. बी. कोडनुसार असे एकूण ४,९४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आला असून केंद्रात केवळ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

शहादा तालुक्यात बैल चोरांना अटक
शहादा / वार्ताहर

तालुक्याच्या ग्रामीण भागात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बैल चोरटय़ांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इतरही काही ठिकाणच्या बैलचोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शेती औजारे, मोटार, वायर असे साहित्य चोरणारे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे बैलांची चोरी करू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. काही घटनांमध्ये शेतकऱ्यांनीच चोरांना पकडून देण्याचे काम केले आहे. वैजाली येथील शांताराम पाटील यांच्या गोठय़ातून युवराज ठाकरे व राजू ठाकरे या दोन संशयितांना रात्री दोनच्या सुमारास बैल चोरून घेऊन जात असताना पाटील यांनी पाहिले. त्यांनीच मग या चोरटय़ांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या एका घटनेत ब्राम्हणपुरी येथील शेतकरी युवराज पाटील यांचे सुमारे २५ हजार रूपये किंमतीची बैलजोडी सुलतानपूर येथील बिरू ठाकरे याने पहाटे चारच्या सुमारास गोठय़ातून चोरली. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर पाटील यांनी शोधाशोध सुरू केली असता लांबोळा गावाजवळ चोरटय़ास बैलांसह पकडण्यात आले. बैलजोडी तळोद्याच्या बैल बाजारात विकण्याचा चोरटय़ाचा डाव होता. पोलिसांनी ठाकरेविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मान्सूनपूर्वी जनावरांचे लसीकरण करण्याचे आवाहन
नंदुरबार / वार्ताहर

पावसाळ्यापूर्वीच सर्व जनावरांना लसीकरणासाठी पशुसंवर्धन अधिकारी तसेच सर्व पशुधन विकास अधिकारी यांनी नियोजन करावे तसेच सर्व पशुपालकांनी गुरांना लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के. आर. सिंघल यांनी केले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी तसेच आपत्ती व्यवस्थापन संबंधीची बैठक घेण्यात आली. यावेळी सिंघल यांनी राष्ट्रीय विकास योजनेसंबंधीच्या कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जनावरांच्या विविध साथीच्या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंबंधी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच बर्ड फ्लू, स्वाइन फिवर, ईक्वाईन इन्फल्युएन्झा रोगासंबंधी पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्क राहण्याची सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सिंघल यांनी बैठकीत दिल्या. अडचण आल्यास ०२५६४-२१००१६, ९८२३०५९४८९ या क्रमांकावर डॉ. सिंघल यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. के. एन. सामुद्रे, डॉ. व्ही. एम. गावित, डॉ. वाय. बी. साळुंखे, डॉ. टी. जी. गीते, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, डॉ. जमदाळे उपस्थित होते.