Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पाणीटंचाईमुळे वादावादीला तोंड
वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ातील काही गावांमधील पाणी टंचाईने भीषण रुप धारण केल्याने लहान-मोठय़ा वादांना स्थानिक पातळीवर तोंड फुटले आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना राजकीय हस्तक्षेप, प्रशासनाचे आडमुठे धोरण, कामातील दिरंगाई याबाबी चव्हाटय़ावर येऊ लागल्या

 

आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकरवी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मूठभर लोकांनीच याचा लाभ घेण्याचे सत्र अवलंबले असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील वाडी-शेवाडी या धरणातील पाण्याचा वादही गाजू लागला आहे. मूळ प्रस्तावानुसार या धरणाचे पाणी डाव्या कालव्याव्दारे ज्या गावांना मिळायला हवे ती गावे पाण्यापासून वंचितच आहेत. यामुळे शिंदखेडा शहर व परिसर प्रवासी संघर्ष समितीने आता हा मुद्दा कळीचा बनवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कायम दुष्काळी म्हणून शिंदखेडा तालुक्याचे नाव शासकीय पटलावर नोंदले गेले आहे. तत्कालीन आमदार कै. ठाणसिंग जिभाऊ यांनी वाडीशेवाडी धरणाची संकल्पना मांडून त्यास प्रशासकीय मंजुरीही मिळविली होती. त्यांच्या निधनानंतर आमदार द. वा. पाटील यांनी विधानसभेत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आणि धरणात पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मूळ प्रस्तावानुसार या धरणात पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मूळ प्रस्तावानुसार हे पाणी डाव्या कालव्यांद्वारे थेट तापी काठच्या शेती आणि काही गावांपर्यंत न्यायचे होते. यात अमळथे, सोनेवाडी, अनकडसे, नेवाडे, वरपाडे याही गावांचा समावेश आहे, पण आता याच गावांना वाडीशेवाडी धरणाच्या पाण्यापासून वंचित राहायची वेळ आली आहे.
धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी वाढवून ती तापी काठापर्यंत न्यावी अशी संघर्ष समितीची आता मागणी आहे. वाडी-शेवाडी धरणाबाबत निश्चित झालेली सूत्रे नकाशाप्रमाणेच राबविली जावीत, तापी काठच्या शेतांच्या बांधापर्यंत धरणाचे पाणी पोहोचत नाही तोपर्यंत हे पाणी दुसरीकडेही जावू देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्याने हे प्रकरण प्रशासकीय पातळीवर महत्वाचे ठरले आहे. सुलवाडे बॅरेजमध्ये साठविलेले पाणीही उचलून ते शेतजमिनीत टाकण्यात यावे, अशीही समितीची मागणी आहे. समितीने या संदर्भातील लेखी निवेदने मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, तापी पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी यांना पाठविले आहेत. समितीचे अध्यक्ष सलीम तांबोळी, उपाध्यक्ष प्रेमराज मराठे, सचिव मोहन परदेशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या या निवेदनावर सह्य़ा आहेत.
धुळे तालुक्यातील निमडाळे गावातही पिण्याच्या पाण्याची अशीच टंचाई निर्माण झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी थोडे थोडके पाणी असून रणरणत्या उन्हात पाणी मिळविण्यासाठी सर्व ग्रामस्थांना पायपीट करावी लागते आहे. धुळे तालुक्यातील सरवडगाव पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम जाहीर झाला असताना या योजनेंतर्गत कोणती कामे करावीत यासंदर्भात सरपंच रामराव पाटील हे सदस्यांशी साधी चर्चाही करत नाहीत, ते ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने चालवतात असा आरोप करून पाच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. पाच मे रोजी तो तहसीलदार प्रमोद भामरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
पाण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची समस्या असो ग्रामस्थांचा संयम सुटल्याने अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या वादांना तोंड फुटले आहे. दरवर्षी धुळे जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. फेब्रुवारीपासून काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. पण गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने आजवर पाणी पुरले आहे.