Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

ब्रिटनने धसका घेतलेल्यांची यादी
दहशतवादाचा; तसेच अन्य अतिरेकी तत्त्वांचा धसका घेतलेल्या ब्रिटनने आपल्या देशात ज्यांनी प्रवेश करू नये, अशा लोकांची एक यादी प्रकाशित केली आहे. अशी यादी ब्रिटनच्या गृहखात्याकडून प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत इस्लामी अतिरेकी, दहशतवादाला चिथावणी देणारे, समाजात द्वेष पसरविण्यास कारणीभूत ठरू शकणारे, तसेच ज्यांच्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात, अशांचा समावेश आहे. २००५ सालापासून ‘नको असलेल्या’ मंडळींना ब्रिटनमध्ये येऊ न देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. मार्चपर्यंत संपलेल्या पाच महिन्यांत २२ लोकांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्यांची यादी प्रथमच जाहीर झाली. या २२ जणांपैकी १६ जणांची नावे सरकारने उघड केली. उर्वरित सहा नावे ‘सामाजिक हित’ लक्षात घेऊन उघड करण्यात आली नाहीत. ब्रिटिश सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध मुस्लिम कौन्सिल ऑफ ब्रिटनने आक्षेप घेतला आहे. एखाद्याचा दृष्टिकोन काय आहे हे पाहून त्याच्याविरुद्ध कृती

 

करू नका. त्याने जर कायदा मोडला असेल तरच संबंधित व्यक्तीविरुद्ध कृती करा, असे या कौन्सिलचे म्हणणे आहे; पण गृहमंत्री जॅकी स्मिथ यांना हे म्हणणे मान्य नाही. बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणजे समाजात द्वेष पसरविण्याचे पाठ देण्याचा परवाना मिळाला, असे समजून चालता कामा नये. ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यांनी मर्यादांचे नक्कीच उल्लंघन केले आहे. आमच्या मूल्यांच्या विपरित वर्तन करणाऱ्यांना आम्ही आमच्या देशात प्रवेश करू देणार नाही, असे जॅकी स्मिथ यांचे म्हणणे आहे. गेल्या ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत ज्यांना ब्रिटनमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली त्या ‘हमास’चे मेम्बर ऑफ पार्लमेण्ट युनिस अल्-अस्तल आणि ज्यू अतिरेकी माईक गुझोवस्की यांचा अंतर्भाव आहे, तसेच ‘अ‍ॅण्टी गे’ भाष्य केल्याबद्दल ७९ वर्षांच्या फ्रेड वॉलड्रॉन फेल्प्स् या धर्मगुरूंचा आणि त्यांची मुलगी शर्ली फेल्प्स्-रोपर यांनाही ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. अमेरिकेत खळबळ माजविणाऱ्या मायकेल सॅवेज या ‘टॉक शो’चे आयोजन करणाऱ्या व्यक्तीचाही २२ जणांचा यादीत समावेश आहे. ब्रिटनने जाहीर केलेल्या यादीत वर उल्लेखित मंडळींच्या व्यतिरिक्त आमिर सिद्दिकी, पावेल स्काचेवस्की, साफवत हिजाझी, नासर जावेद, आर्तर रीनो आदींचा अंतर्भाव आहे. आपल्या देशाला नको असलेल्यांना प्रतिबंध करणे हा त्या त्या देशाचा अधिकार आहेच. ब्रिटनने तो बजाविण्यास आधीपासूनच प्रारंभ केला आहे. आता प्रथमच त्यांनी कोणाकोणावर प्रवेशबंदी लादण्यात आली आहे. त्यांची नावे घोषित केली आहेत इतकेच! पण २२ पैकी फक्त १६ जणांचीच नावे उघड केली आहेत हेही लक्षात घ्यायला हवे!