Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

सामूहिक दफनभूमीचे उत्खनन
मागील शतकात झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांमध्ये झालेल्या एका भीषण लढाईत एका रात्रीत २३०० ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन सैनिक ठार

 

झाले होते. या लढाईत अन्य ५००० सैनिक जखमी झाले होते. १९ जुलै १९१६ या दिवशी झालेल्या लढाईत मरण पावलेल्यांवर योग्य अंत्यसंस्कारही झाले नव्हते. फ्रान्समधील एका खेडय़ालगत पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्यांचे दफन करण्यात आले; पण त्या ठिकाणी कोणाचे दफन, कधी केले या संदर्भात काहीही तपशील उपलब्ध नव्हता. जर्मनीने त्या लढाईत मरण पावलेल्या शत्रूराष्ट्राच्या सैनिकांचे सामूहिक दफन केले; पण १९१६ च्या लढाईचा मागोवा घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन सरकारला गेल्या वर्षी, ‘त्या’ लढाई झालेल्या परिसरात पाच सामूहिक दफनभूमी आढळल्या. आता या सर्व दफनभूमींचे उत्खनन करण्यात येणार आहे. सामूहिक दफन करण्यात आलेल्या सैनिकांचे अवशेष उकरण्यात येणार असून, ते कोणाचे आहेत, याचा शोध घेतला जाईल. पुढील सुमारे १५ महिने या संदर्भात काम केले जाईल. या सर्व सैनिकांसाठी नवी दफनभूमी उभारली जाईल. डिसेंबपर्यंत ते काम पूर्ण होईल. या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या नातलगांनी संपर्क साधण्याचे आवाहन ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन सरकारने केले असले तरी किती लोक याबाबत पुढे आले ते मात्र समजू शकले नाही. ‘कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन’ या सैनिकांच्या अवशेषांचे डीएनए नमुने घेणार असून, ते वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील. पुढील वर्षीच्या १९ जुलैला पहिल्या महायुद्धाच्या काळात झालेल्या या लढाईला ९४ वर्षे पूर्ण होतात. त्याच्या आत या सैनिकांच्या अवशेषांचे पुन्हा सन्मानाने दफन करण्याची कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशनची योजना आहे. मृत सैनिकांचे अवशेष बाहेर काढण्याचे काम पुरातत्त्ववेत्ते, पर्यावरणतज्ज्ञ आदींच्या देखरेखीखाली चालणार आहे.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, पश्चिम आघाडीवर जे एक लाख ६५ हजार कॉमनवेल्थ सैनिक ठार झाले त्यांचे पुढे काय झाले याचा अद्याप शोध लागलेला नाही. अशा बेपत्ता सैनिकांच्या दफनभूमींचा शोध घेणे, त्यांच्याविषयी माहिती मिळविणे, त्यांच्यावर पुन्हा सन्मानाने अंत्यसंस्कार करणे आदी कामे ‘कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन’कडून केली
जातात. फ्रान्समधील लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या अनामवीरांच्या सामूहिक दफनभूमीने उत्खनन हा त्या उपक्रमाचाच एक भाग आहे.