Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

व्याख्यानमालांची ‘लाही लाही’
नागरिकांची वैचारिक भूक भागविण्यासाठी ज्या शहरांमध्ये सदैव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, अशा शहरांमध्येच विचारवंत तसेच बुध्दिवंतांची फौज मोठय़ा

 

प्रमाणावर तयार होत असते, असे म्हटले जाते. यादृष्टीने नाशिकमध्ये आयोजित व्याख्यानमालांकडे बघावयास हवे. ‘दर्जा आणि ऊर्जा’ दोन्हीही टिकवून ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी झालेल्या या व्याख्यानमालांना अलीकडे मिळणाऱ्या प्रतिसादाचा विषय कायम चर्चिला जात असला तरी त्याची कारणेही वेगळी आहेत. मुळात मनोरंजनाची तसेच वैचारिकतेची विविध साधने उपलब्ध झाली असताना ज्ञानसत्राची ही मालिका अखंडपणे सुरू ठेवणे हेच मोठे दिव्य मानावे लागेल. या दिव्यातून नाशिकच्या अनेक व्याख्यानमाला यशस्वीपणे पार पडत असताना या वर्षी त्यांच्यापुढे हवामानाने वेगळेच संकट उभे केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या नाशिक नगरीतील वसंत व्याख्यानमालेने यावर्षी ८८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. राज्यातील अनेक महनीय वक्त्यांनी सहभाग घेतलेल्या या व्याख्यानमालेतील विषयांचे नियोजन करतानाही त्यात वैविध्य कसे राखता येईल, याविषयी आयोजक नेहमीच जागरूक राहात आले आहेत. त्यामुळेच खेडय़ापासून अगदी ग्लोबल समस्या मांडणाऱ्या व्याख्यानाचाही लाभ येथे घेता येणे शक्य आहे. वसंत व्याख्यानमालेच्या धर्तीवर नाशिकच्या वेगवेगळ्या भागात विविध मंडळांतर्फे व्याख्यानमालांच्या आयोजनास सुरूवात झाली. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेस पर्यायही निर्माण झाले. शहराचा विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या उपनगरांमधील नागरिकांची वैचारिक भूक भागविण्यासाठी लहान स्वरूपात का असेना व्याख्यानमाला सुरू झाल्या. नाशिकरोड, पंचवटी, सिडको, कॉलेजरोड, अंबड अशा ठिकाणी काही मंडळांनी हौसेने लावलेल्या रोपटय़ाने बऱ्यापैकी तग धरला असून सिडको वसंत व्याख्यानमालेने तर रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. बहुतेकवेळा नागरिकांचा प्रतिसाद हा वक्ता किती प्रसिध्द आहे, यावर अवलंबून असला तरी यंदा वाढत्या तापमानाने आयोजकांच्या समस्यांमध्ये वाढच झाली आहे. काही व्याख्यानमालांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सायंकाळी सहापर्यंत उन्हाचा तडाखा बसत असल्याने व्याख्यानांची वेळ सात करण्यात आली आहे. काहींनी तर आठची वेळ ठेवली. व्याख्यानमालांमध्ये खंड होऊ नये म्हणून बऱ्याच मंडळांनी व्याख्यानांची संख्याही कमी केली आहे. वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याने यशवंतराव महाराज पटांगणात होत असल्याने नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा सहज अंदाज घेता येतो. कमी प्रमाणात उपस्थिती असल्यास त्याचा वक्त्यावरही परिणाम होत असल्याने उपनगरांमधील आयोजकांनी यावर उपाय म्हणून थेट मंदिराचे सभागृह किंवा समाजमंदिरांची निवड केली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सिडको वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांनी तर कार्यक्रमच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पूर्वार्धात होणारी ही व्याख्यानमाला आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे. व्याख्यानमालांची संख्या वाढत असताना त्यांच्या समोरील समस्यांमध्येही भर पडत आहे. विशेष म्हणजे काही समस्यांचे सूत्र समान असून आर्थिक विवंचना बहुतेकांपुढे आहे. बडय़ा वक्त्यांच्या बडय़ा मानधनामुळे उपनगरांमधील मंडळांना आपणास हव्या त्या वक्त्याला बोलविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.
अविनाश पाटील