Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस बंडखोराला खरी रसद कोणाची?
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राजकीय सारीपाटावर खेळलेल्या वादग्रस्त दुटप्पी भूमिकेची चर्चा

 

काँग्रेसमध्ये जोरदार सुरू आहे. आपल्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा व पर्यायाने आपला स्वत:चा हक्काचा मतदार आहे, हे सिद्ध करीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांना काहीसे मताधिक्य मिळवून द्यायचे, तर दुसरीकडे खानापूर- आटपाडी, जत व कवठेमहांकाळ-तासगाव या आपल्या हक्काच्या तीन विधानसभा मतदारसंघांत मात्र काँग्रेस उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी सक्रिय भूमिका पतंगरावांनी बजावली आहे, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला! या मतदारसंघाला बंडखोरी नवी नाही. हिंदकेसरी मारुती माने यांच्यापासून ते दिनकर पाटील, मदन पाटील यांसारख्या अनेक दिग्गजांनी या मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवली. परंतु मतदार मात्र काँग्रेसच्याच पाठीशी ठाम राहिल्याचा इतिहास आहे. या मतदारसंघात या वेळी झालेली बंडखोरी मात्र बंडखोर उमेदवाराच्या भूमिकेपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बजावलेल्या कूटनीतीच्या राजकीय चालीने गाजत आहे. निवडणूक निकालाआधीच पतंगरावांनी सातारा येथे सांगलीवगळता राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असल्याचे वक्तव्य करून आपली नाराजी प्रकट केली होती.
विश्वजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असती, तर काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीच नसती, असेही ते म्हणाले होते. तसेच काँग्रेसमध्ये गद्दारांचीच चलती आहे, असे पत्रकार बैठकीत स्पष्ट केले होते. परंतु दरवेळेप्रमाणे बंडोबा थंडोबा झाले व प्रचारावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण पक्षाचा प्रचार करीत आहे, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळीही पतंगराव आपले बंधू जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव यांच्यासाठी प्रयत्नशील होते. पण अखेर वसंतदादा घराण्याचे म्हणून प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळीही पतंगराव कमालीचे नाराज झाले होते व त्यांच्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तब्बल १५ हजार मतांनी प्रथमच पिछाडीवर राहिली होती. त्यामुळे पतंगरावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाब विचारला होता. मात्र काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसमधील पतंगरावांची बंडखोरी फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही.
पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, तसेच ते चतुर राजकारणी म्हणूनही परिचित आहेत. त्यांना दोन वेळा भिलवडी-वांगी मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी हा मतदारसंघ मजबूत करण्याच्या इराद्याने या तालुक्यात विकासाचा भक्कम पाया रचला आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ काँग्रेसपेक्षा पतंगरावांचा मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पतंगरावांनी आदेश दिला असता तर बंडखोर उमेदवाराला तब्बल ३० ते ४० हजारांचे मताधिक्य देऊ शकले असते. परंतु काँग्रेसशी असलेली एकनिष्ठता जपण्यासाठी पतंगरावांनी या मतदारसंघात काँग्रेसलाच मताधिक्य मिळेल, याची दक्षता घेतली. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला निसटते बहुमत मिळवून द्यायचे व इतरत्र आपल्या कार्यकर्त्यांना बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी उभे करायचे, अशी दुहेरी चाल खेळल्याचे काँग्रेस वर्तुळात ठामपणे बोलले जात आहे.
या मतदारसंघात काँग्रेसमधील बंडखोरीचा त्रास जसा झाला आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांनी विकास महाआघाडीच्या माध्यमातूनही अजित घोरपडे यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची जिल्हय़ातील राजकारणात कोंडी करण्याचा प्रयत्नही जयंत पाटील यांच्या गटाने केल्याचे स्पष्टपणे जाणवून आले. तासगाव विधानसभा मतदारसंघात आमदार संजय पाटील यांनी जी भूमिका बजावली, तीही आर. आर. पाटील यांना अडचणीत आणणारीच होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच वसंतदादा पाटील यांच्या पश्चात जिल्हय़ाचे राजकारण कोणाकडे? काँग्रेसची सूत्रे हाती घेण्यासाठी पतंगराव, तर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे जयंत पाटील यांच्याकडे जातील का? हे स्पष्ट होणार आहे.
या मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी पतंगरावांनी आपले बंधू मोहनराव व त्यानंतर चिरंजीव विश्वजित यांच्यासाठी अथक प्रयत्न केले, परंतु दिल्लीदरबारी पतंगरावांचा शब्द अखेरचा ठरत नाही, हे गेल्या तीन ते चार निवडणुकींतून दिसून आले आहे. सांगलीतून उमेदवारी मिळविण्यासाठी यापुढील काळात पतंगराव स्वत: इच्छुक असू शकतात व चिरंजीवास भिलवडी-वांगी मतदारसंघातून विधानसभेत पाठविण्यासाठी बेरजेचे राजकारण करू शकतात. परंतु या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील हे विजयी झाल्यास या जिल्हय़ाची सूत्रे आपसूकच वसंतदादा घराण्याकडे जाणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे आर. आर. पाटील यांच्या ताब्यात अबाधित राहतील. मात्र त्यासाठी दि. १६ मेची वाट पाहावी लागणार आहे.
गणेश जोशी