Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

विशेष

ब्रिटनने धसका घेतलेल्यांची यादी
दहशतवादाचा; तसेच अन्य अतिरेकी तत्त्वांचा धसका घेतलेल्या ब्रिटनने आपल्या देशात ज्यांनी प्रवेश करू नये, अशा लोकांची एक यादी प्रकाशित केली आहे. अशी यादी ब्रिटनच्या गृहखात्याकडून प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत इस्लामी अतिरेकी, दहशतवादाला चिथावणी देणारे, समाजात द्वेष पसरविण्यास कारणीभूत ठरू शकणारे, तसेच ज्यांच्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात, अशांचा समावेश आहे. २००५ सालापासून ‘नको असलेल्या’ मंडळींना ब्रिटनमध्ये येऊ न देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. मार्चपर्यंत संपलेल्या पाच महिन्यांत २२ लोकांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्यांची यादी प्रथमच जाहीर झाली. या २२ जणांपैकी १६ जणांची नावे सरकारने उघड केली. उर्वरित सहा नावे ‘सामाजिक हित’ लक्षात घेऊन उघड करण्यात आली नाहीत. ब्रिटिश सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध मुस्लिम कौन्सिल ऑफ ब्रिटनने आक्षेप घेतला आहे. एखाद्याचा दृष्टिकोन काय आहे हे पाहून त्याच्याविरुद्ध कृती करू नका.

सामूहिक दफनभूमीचे उत्खनन
मागील शतकात झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांमध्ये झालेल्या एका भीषण लढाईत एका रात्रीत २३०० ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन सैनिक ठार झाले होते. या लढाईत अन्य ५००० सैनिक जखमी झाले होते. १९ जुलै १९१६ या दिवशी झालेल्या लढाईत मरण पावलेल्यांवर योग्य अंत्यसंस्कारही झाले नव्हते. फ्रान्समधील एका खेडय़ालगत पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्यांचे दफन करण्यात आले; पण त्या ठिकाणी कोणाचे दफन, कधी केले या संदर्भात काहीही तपशील उपलब्ध नव्हता. जर्मनीने त्या लढाईत मरण पावलेल्या शत्रूराष्ट्राच्या सैनिकांचे सामूहिक दफन केले; पण १९१६ च्या लढाईचा मागोवा घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन सरकारला गेल्या वर्षी, ‘त्या’ लढाई झालेल्या परिसरात पाच सामूहिक दफनभूमी आढळल्या.

कान कोणी कापला?
जगप्रसिद्ध चित्रकार विन्सेण्ट वान गॉ याने आपला कान स्वत:च कापल्याचा आतापर्यंत सर्वाचा समज होता. पण त्या सर्व समजाला छेद देणारी माहिती आता उपलब्ध झाली आहे. या आधीच्या माहितीनुसार, मानसिक विकाराने त्रस्त असलेल्या गॉ याने १८८८ मध्ये फ्रान्समधील एका गावात रागाच्या भरात रेझरने आपला कान कापला, असा समज होता. पण तसे घडले नसल्याचा दावा नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीत करण्यात आला आहे. विन्सेण्ट वान गॉ आणि त्याचा सहकारी चित्रकार पॉल गॉगिन यांच्यात एका वेश्यागृहालगत वादावादी झाली. त्याचे पर्यावसान गॉचा कान कापण्यात झाले. गॉगिनने तलवारीने गॉचा कान कापल्याची माहिती या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात देण्यात आली आहे. १० वर्षांच्या अभ्यासाअंती, गॉचा कान त्याच्या सहकाऱ्याने कापल्याचा निष्कर्ष या पुस्तकाद्वारे काढण्यात आला आहे. हान्स काफमन आणि रिटा वाइल्डगान्स या दोघांनी हे संशोधन केले आहे. या सर्व घटनांच्या नंतर गॉगिन ताहितीला गेला. तर विन्सेण्ट वान गॉने छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. भांडणात आपल्या मित्राचा कान कापणारा गॉगिन खरेच ‘महान’ असला पाहिजे!

व्याख्यानमालांची ‘लाही लाही’
नागरिकांची वैचारिक भूक भागविण्यासाठी ज्या शहरांमध्ये सदैव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, अशा शहरांमध्येच विचारवंत तसेच बुध्दिवंतांची फौज मोठय़ा प्रमाणावर तयार होत असते, असे म्हटले जाते. यादृष्टीने नाशिकमध्ये आयोजित व्याख्यानमालांकडे बघावयास हवे. ‘दर्जा आणि ऊर्जा’ दोन्हीही टिकवून ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी झालेल्या या व्याख्यानमालांना अलीकडे मिळणाऱ्या प्रतिसादाचा विषय कायम चर्चिला जात असला तरी त्याची कारणेही वेगळी आहेत. मुळात मनोरंजनाची तसेच वैचारिकतेची विविध साधने उपलब्ध झाली असताना ज्ञानसत्राची ही मालिका अखंडपणे सुरू ठेवणे हेच मोठे दिव्य मानावे लागेल. या दिव्यातून नाशिकच्या अनेक व्याख्यानमाला यशस्वीपणे पार पडत असताना या वर्षी त्यांच्यापुढे हवामानाने वेगळेच संकट उभे केले आहे.

काँग्रेस बंडखोराला खरी रसद कोणाची?
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी राजकीय सारीपाटावर खेळलेल्या वादग्रस्त दुटप्पी भूमिकेची चर्चा काँग्रेसमध्ये जोरदार सुरू आहे. आपल्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा व पर्यायाने आपला स्वत:चा हक्काचा मतदार आहे, हे सिद्ध करीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांना काहीसे मताधिक्य मिळवून द्यायचे, तर दुसरीकडे खानापूर- आटपाडी, जत व कवठेमहांकाळ-तासगाव या आपल्या हक्काच्या तीन विधानसभा मतदारसंघांत मात्र काँग्रेस उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी सक्रिय भूमिका पतंगरावांनी बजावली आहे, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.