Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या उभारणीचे गेले पाच वर्षे सुरू असलेले काम पूर्ण झाले असून मंदिरावर सुवर्णकळस बसविण्याचा धार्मिक कार्यक्रम बुधवारी विधीवत करण्यात आला. फुलगावचे स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते हा कळस बसविण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरात होमहवनसह अन्य धार्मिक कार्यक्रम करण्यात आले, तसेच मंदिरावर फुलांच्या तोरणांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती. चौकटीत छायाचित्रात सोन्याचा कळस.

उरळीत आजपासून पुन्हा कचऱ्याच्या गाडय़ा अडविण्याचे आंदोलन
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

उरळी येथे कचरा टाकण्यासंबंधीचे नियम महापालिका पाळत नसल्याच्या निषेधार्थ कचरा गाडय़ा अडविण्याचे आंदोलन ग्रामस्थांतर्फे उद्या (गुरुवार) पासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. फुरसुंगी व उरळी ग्रामपंचायत, कचरा डेपो हटाव समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन सुरू केले जात असल्याचे आज सांगण्यात आले. कचरा डेपोच्या विरोधात गेल्या महिन्यात आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कचरा डेपो हटाव कृती समितीच्या एकत्रित बैठकीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जपानी कंपनीत काम करण्याची ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना संधी
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये जपानच्या टोयोटा कंपनीच्या सहकार्याने साजरा करण्यात आलेल्या ‘करीअर डे’ अंतर्गत आयटीआयच्या १३ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोटार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य जपान येथील टोयोटा मोटर्स या कंपनीच्या ‘टोयोटा टेक्नीकल एज्युकेशन प्रोग्राम’अंतर्गत मोरवाडी येथील आयटीआयमध्ये आज ‘करीअर डे’ साजरा करण्यात आला.या अंतर्गत मेकॅनिक मोटार व्हेईकल या व्यवसायासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३५ विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा तसेच मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केली आहे.

भोसरीत एका तडीपार गुंडासह दोघांचा खून
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

भोसरी-मोशी प्राधिकरण येथील पाण्याच्या टाकीजवळ आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आलेले दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यापैकी एक मृतदेह हा तडीपार गुंडाचा आहे. पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बबन येळवंडे (वय २६, रा. मोई, चऱ्होली) असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतदेहाचीही एका घरफोडीच्या गुन्ह्य़ातील तो आरोपी आहे.

पुणे व पिंपरीसाठी १ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित
पुणे, ६ मे / खास प्रतिनिधी

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा १ जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा धरणांमध्ये आरक्षित करण्यात आला असून पुरंदरमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नाझरे धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याच्या राखीव साठय़ानंतर उरलेले पाणी ग्रामीण भागांत सिंचनासाठी सोडण्यात येणार आहे.
वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्य़ाच्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, चाऱ्याची टंचाई, पाण्याअभावी बंद पडलेली शेतीची कामे असे दृश्य दिसत आहे.

शहराच्या निम्म्याहून अधिक भागामध्ये आज सात तास वीज बंद
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

शहराच्या विविध भागांमध्ये दुरुस्तीची मोठी कामे करण्यात येणार असल्याने उद्या (गुरुवारी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील निम्म्याहून अधिक भागामध्ये सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे. पर्वती विभागामध्ये फरासखाना, लक्ष्मीरस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, नवी पेठ, गांजवे चौक, अंबिल ओढा, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, बुधवार पेठ, विजयनगर कॉलनी, भरतनाटय़ मंदिर, माणिकबाग, सिंहगड रस्ता, शारदामठ व धनकवडीचा भाग बंद राहणार आहे.

राजगुरूनगर येथे तरुणाचा निर्घृण खून
राजगुरूनगर, ६ मे/वार्ताहर

राजगुरूनगर येथील पंचायत समिती चौकामध्ये बुधवारी रात्री नऊ वाजता दत्ता किसन थिगळे या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. तलवारी, चॉपर यांसारख्या शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यात आले. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. होता. ‘आयर्न कॅपिटल’ या व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या काचांची तसेच जवळपास असणाऱ्या गाडय़ांची जमावाकडून तोडफोड करण्यात आली. तेथील वातावरण रात्री उशिरापर्यंत तणावग्रस्त होते. संतप्त जमाव पोलिसांच्या आटोक्यात येत नव्हता. खून करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे. तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतल्याने बराच वेळ मृतदेह रस्त्यावर पडून होता.राजगुरुनगरमध्ये अशा प्रकारचे कृत्य प्रथमच घडल्याने शहरात खळबळ माजली होती. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

‘प्रसारमाध्यमांची भूमिका मानवी लढय़ांमध्ये महत्त्वाची’
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अनेक मानवी लढे लढले. या लढय़ांमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिकाही महत्त्वाची होती, असे मत दैनिक ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत संगोराम बोलत होते. ‘मानवी हक्काचे लढे आणि पत्रकारिता’ हा व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. जयदेव गायकवाड होते. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, माजी महापौर दत्ता एकबोटे, अरिफ बागवान, रवींद्र माळवदकर, निशा पाटोळे, पंडित कांबळे आदी उपस्थित होते.
जगन्नाथ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानमालेचे आयोजन चंद्रशेखर धावडे यांनी केले होते.

रेडक्रॉस दिनानिमित्त उद्या विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

रेडक्रॉस दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन येत्या ८ मे रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव आर. व्ही. कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये मोफत अस्थिव्यंग तपासणी व एक्स-रे तपासणी शिबिर, थालसेमियाग्रस्त बालकांसाठी मोफत सेरम फेरिटिन टेस्ट व गरीब बालकांसाठी मोफत औषधोपचार तसेच थायसेमियाग्रस्त मुलांची चित्रकला स्पर्धा व त्यांना खाऊ वाटप या उपक्रमांचा समावेश आहे. उपक्रमांबद्दलची माहितीपत्रके यशवंतराव चव्हाण नाटय़गृह व प्रभात चित्रपटगृह येथे सात मे रोजी देण्यात येणार आहे. तसेच आठ मे रोजी ब्लड स्टोरेज सेंटर, एक्स-रे व सोनोग्राफी यंत्रणेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी डॉ. विक्रम फाटक, नवशेद नानावटी व डॉ. चंद्रा उपस्थित होत्या.

संजीवन रुग्णालयात सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन
पुणे, ६ मे / प्रतिनिधी

संजीवन रुग्णालयात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेत शहरातील १०५ बालकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. शर्मिला गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. तीन वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. सहा बालरोग तज्ज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सर्व बालकांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. यशस्वी स्पर्धकोंची नावे पुढीलप्रमाणे, वयोगट, क्रमांक आणि नाव या प्रमाणे- सहा महिने ते एक वर्ष वयोगट- प्रथम क्रमांक- आरोशी मेटकर, द्वितीय- हिमानी आदे, तृतीय- निहार रेलकर. वयोगट एक ते तीन वर्षे- पहिला- स्वरा व्यवहारे, द्वितीय- श्रेयना राना, तृतीय- राहुल महेश. तीन ते पाच वर्षे वयोगट- प्रथम क्रमांक- यशोधन गडकरी, द्वितीय- स्वराली जोशी, तृतीय- अवनी कुलकर्णी अशी बक्षीस पटाकविणाऱ्या बालकांची नावे आहेत. या बालकांना डॉ. शर्मिला गांधी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक, बक्षिस आणि भेटवस्तू देण्यात आली.

ठाण्यातील मुद्रांक खटला मोक्कामध्ये वर्ग करण्यासाठी अर्ज
पुणे, ६ मे / प्रतिनिधी

बनावट मुद्रांक घोटाळ्यातील ठाणे येथे दाखल करण्यात आलेला खटला पुण्यातील जिल्हा न्यायालयाच्या मोक्का येथील विशेष न्यायालयाच्या मोक्का खटल्यात वर्ग करण्यात यावा, यासाठी सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी अर्ज केला आहे. येथील मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. आर. बोरा यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या खटल्यात घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहब तेलगी याच्यासह दोन पोलीस अधिकारी तसेच अन्य कर्मचारी अशा सातजणांचा समावेश आहे. काही वर्षांपासून हा खटला ठाणे येथे सुरू असून तो पुण्याच्या मोक्का न्यायालयाच्या मोक्का प्रकरणात वर्ग करण्यात यावा, यासाठी सरकारी वकिलांनी अर्ज दाखल केला आहे.

‘पुणे विद्यापीठाने अवैध नियुक्त्यांना मान्यता देऊ नये’
पुणे, ६ मे/प्रतिनिधी

महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या एम.फिल, पीएच.डी. वर आधारित अवैध नियुक्त्यांना संमती दिल्यास न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल, त्यामुळे पुणे विद्यापीठाने अवैध नियुक्त य़ांना मान्यता देऊ नये, अशा आशयाचे निवेदन नेटसेट संघर्ष समितीच्या वतीने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांना देण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानुसार नेटसेटच्या निकषावर आधारित असलेल्या नियुक्त य़ांमध्ये ‘क्वालिटी पीएच.डी.’साठी सूट देण्यात आली असली तरी एम.फिलसाठी कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे एम. फिल, पीएच.डी. वरील अवैध नियुक्त य़ांना विद्यापीठातर्फे संमती दिली जाऊ नये. अवैध नियुक्त य़ांना संमती दिल्याचे आढळून आल्यास नेट सेट संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. याप्रसंगी दत्ता माने, ऊमा काळे, वैजिनाथ राख उपस्थित होते.

सिंहगड रस्ता परिसरात आज पाणीपुरवठा नाही
पुणे, ६ मे/प्रतिनिधी

वडगाव जलकेंद्र येथील तातडीची दुरुस्तीकामे गुरुवारी (७ मे) केली जाणार असल्यामुळे वडगाव, धायरी, सिंहगड रस्त्यासह अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे. तसेच या सर्व भागांत शुक्रवारी (८ मे) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत - वडगाव बुद्रुक, वडगाव -धायरी, सिंहगड रस्ता परिसर, तळजाई, धनकवडी, कात्रज, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, केदारेश्वर आणि कात्रज-कोंढवा रस्ता परिसर.

बालेवाडी स्टेडियममधील प्रशिक्षणार्थीचे साहित्य चोरले
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

बालेवाडी स्टेडियम येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या परगावच्या प्रशिक्षणार्थीचे साहित्य चोरून नेण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी दहा ते पावणेदोनच्या सुमारास घडला.
िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास अच्युत जोशी (वय ३३, रा. वाडिया इस्टेट, कुर्ला पश्चिम, मुंबई) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. जोशी हे मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास आपल्या आठ सहकाऱ्यांसह म्हाळुंगे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. ते चार खोल्यांना कडी लावून प्रशिक्षणासाठी गेले. चोरटय़ांनी त्यांच्या खोल्यांच्या कडय़ा उचकटून एक कॅमेरा, रोख पाच हजार रुपये असा १५ हजार तीनशे पन्नास रुपयांचा माल चोरून नेला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे काळे धंदे असल्याचा आरोप
पिंपरी, ६मे / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादागिरी सुरू असून गुंडगिरी व राजकीय बळाचा वापर करून राष्ट्रवादीचे नगरसेवक काळे धंदे करतात, असा आरोप भाजपचे नगरसेवक भीमा बोबडे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात तोंड बंद ठेवलेल्या विरोधी पक्षाने आता राष्ट्रवादीच्या गुंडगिरीवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली असून भाजप नगरसेवक बोबडे यांनी यासंदर्भातील आपल्या तीव्र भावना नुकत्याच पत्रकारांकडे व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक गुंडगिरीचा वापर करून शासकीय परवाने असणारे धंदे बंद करतात आणि स्वत: मात्र विनापरवाना तसे धंदे चालवितात, असे सांगत शासनाचे परवाने असलेले धंदे बंद करणारे तुम्ही कोण, असा सवाल बोबडे यांनी केला आहे.

कामगारनेते जयशंकर पणीकर यांचे निधन
पिंपरी, ६ मे/ प्रतिनिधी

चिंचवड येथील एसकेएफ कंपनीतील कामगार नेते जयशंकर नारायण पणीकर (४८ वर्षे)यांचे दीर्घ आजाराने नुकतेच राहत्या घरी निधन झाले.त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, चार भाऊ असा परिवार आहे. ते चांगले क्रीडापटू होते. खडकी येथील निर्भीड संघटनेचे ते क्रियाशील प्रतिनिधी होते. गरवारे नायलॉन्स कामगारांच्या अहमदनगर कंपनीचे मालक होण्याच्या स्वप्नाला आर्थिक मदत करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अनेक वर्षे कामगार संघटनेचे खजिनदार होते. त्यांच्या निधनामुळे एसकेएफ, तसेच इंटरनॅशनल मेटल फेडरेशन या बहुराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कामगारांत दु:खाची छाया होती. जेष्ठ कामगार नेते मधू मोरे, एल.डी.मिसाळ ,पी. भास्करन, सतीश नायर, केशव मोरे, गणेश दराडे, अनंत ठकार, राम नलावडे, केशव मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आरोग्य शिबिराचा दीड हजार कामगारांना लाभ
पुणे, ६ मे / प्रतिनिधी

कामगारदिनाच्या औचित्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल व शिवसाई प्रतिष्ठानच्या वतीने असंघटित कामगारांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा दीड हजार कामगारांनी लाभ घेतला. यातील काही कामगारांना रोगनिदानानंतर उपचाराची सेवाही पुरविण्यात आली. वारजे माळवाडी येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी कामगार उपायुक्त पी. आर. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष संजय शेडगे, अॅड. हर्षद गोखले, नगरसेवक दिलीप बराटे, विकास दांगट,
शेखर दांगट-पाटील, चंद्रकांत पंडित, सदा शिंदे आदी उपस्थित होते. अंगमेहनतीचे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेकदा त्यांना वेगवेगळे विकार जडतात. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांचे रोगनिदान व उपचारासाठी हा प्रयत्न केल्याचे शेडगे यांनी यावेळी सांगितले. तिरुमला हॉस्पिटॅलिटी सव्र्हीसेसने या शिबिरासाठी सहकार्य केले.

तर मतदाराचे कर्तव्य काय?
मत म्हणजे देशाचा भविष्यकाळ असतो. हे वाचून आनंद झाला. परंतु एका दिवंगत माजी पंतप्रधानांचे राजीनामा दिल्यावरचे वृत्तपत्रातच वाचलेले वाक्य व त्या दुर्दैवी पंतप्रधानांचे चित्र डोळ्यासमोर आले. देशाचा पंतप्रधान मी असून माझे सरकार बाहेरून दुसरेच कोणतरी चालवत होते. म्हणून मी राजीनामा दिला. हे जर खरेच सत्य असेल तर मतदाराचे कर्तव्य काय?
सुरेश पितळीया, पुणे

पुणेकरांनो सावधान!
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, मतदान ४१ टक्के. जवळपास १० लाख पुणेकरांनी मतदान करून सुसंस्कृतपणा दाखविण्याचे टाळले, आपल्या शहराचे फार फार कौतुक देशातले लोक करीत असतील, वर्तमान पत्रातून, टीव्हीच्या विविध चॅनेलवरून मतदान कराच असे वारंवार लिहून किंवा सांगून झाले. आमच्यावर त्याचा परिणाम नाही. मतदान न करणाऱ्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत असेच चालणार. मतदान न करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या १० टक्के कर लावा, कामगार असेल तर एक महिन्याचा पगार कापा, तीन महिने ड्राव्हिंग लायसन्स रद्द करा, एक वर्षांकरिता पासपोर्ट रद्द करा. असे केले तरच आम्ही सुधारणार, नाहीतर असेच चालणार. वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत जगात कुणीही आमचा हात धरू शकत नाही. रस्त्यावरचे पांढरे पट्टे आम्हाला दिसतच नाहीत मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे दिवसभर पार्टी करणार किंवा वन डे ट्रीप करणार आणि तरीही पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणणार. पुढारी वाईटच असतात पण हे सगळे करूनही मी लायक आहे. जय हो! पुणेकरांनो सावधान, आपले नाव बदनाम होत आहे.
शांतीलाल सुरतवाला, पुणे

समाज उदासीनच!
पुण्यात जवळपास ६० टक्के लोकांनी ‘मतदारराजा’ म्हणून मिरवण्याची पर्वणी साधली नाही हे वाचून आश्चर्य वाटले. आपले नाव मतदारयादीत येण्यासाठी पाठपुरावा करण्याचे कष्ट न घेता, नेमक्या मतदानादिवशी मतदारयाद्यांत डोकावून पाहण्याचा फोलपणा पदरी घेणाऱ्या बऱ्याचशा अभाग्यांना आपल्या कर्तव्याची जाग केव्हा येणार? असेही ऐकले की ८० टक्के पोलीस कर्मचारीही मतदानापासून वंचित राहिले. अखेर सत्ता कोणीही उपभोगो, पण घडीभरच मतदार राजा होऊनही आपले भोग तेच राहणार आहेत, ही घाऊक भावनाच या सर्व उदासिनतेला कारणीभूत आहे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे