Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

उरळीत आजपासून पुन्हा कचऱ्याच्या गाडय़ा अडविण्याचे आंदोलन
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

उरळी येथे कचरा टाकण्यासंबंधीचे नियम महापालिका पाळत नसल्याच्या निषेधार्थ कचरा गाडय़ा अडविण्याचे आंदोलन ग्रामस्थांतर्फे उद्या (गुरुवार) पासून पुन्हा सुरू केले जाणार

 

आहे.
फुरसुंगी व उरळी ग्रामपंचायत, कचरा डेपो हटाव समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन सुरू केले जात असल्याचे आज सांगण्यात आले. कचरा डेपोच्या विरोधात गेल्या महिन्यात आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कचरा डेपो हटाव कृती समितीच्या एकत्रित बैठकीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत दिलेल्या आश्वासनांचे पालन महापालिका करेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, कचऱ्याचे वर्गीकरण करून तो टाकण्याबाबत कोणतीही कार्यवाही महापालिकेकडून होत नसल्यामुळे अखेर पुन्हा आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
उरळी येथील कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी शहरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभारणे, कचरा डेपोचे विकेंद्रीकरण करणे, उरळी येथे फक्त ओला कचरा प्रक्रियेसाठी पाठविणे, ओल्या कचऱ्याची वाहतूक बंदिस्त वाहनातून करणे यासह अनेक आश्वासने सहा महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. त्यांची पूर्तता महापालिकेने आजवर केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन व ग्रामस्थांच्या २ मे रोजी झालेल्या बैठकीतही ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचीही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्गीकरण सुरू आहे-प्रशासन
दरम्यान, महापालिकेचे आरोग्यप्रमुख आर. आर. परदेशी म्हणाले की, महापलिका कचऱ्याचे वर्गीकरण करतच नाही, हे म्हणणे योग्य ठरणार नाही. अनेक भागात वर्गीकृत कचरा गोळा केला जात आहे. तसेच संपूर्ण शहरातील हॉटेलमध्ये तयार होणारा ओला कचरा वेगळा करून तो उचलण्याचे कामही योग्य पद्धतीने सुरू आहे. नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांना गांडूळखत प्रकल्पही सक्तीचे करण्यात आले आहेत. याशिवाय काही वॉर्डमध्ये कचऱ्यापासून गॅस तयार करण्याच्या प्रकल्पांचे कामही मार्गी लावण्यात आले आहे. कचरा गोळा करणाऱ्यांमार्फतही सुका कचरा वेगळा करून तो मोठय़ा प्रमाणावर गोळा होत आहे. तसेच शहरात घंटागाडय़ांचीही व्यवस्था प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
कचरा वर्गीकरणाचे काम ज्या प्रमाणात महापालिका करते, त्याच प्रमाणात नागरिकांनीही जबाबदारी उचलणे आवश्यक असून तसे न केल्यास दंडात्मक वा अन्य काही कारवाई करता येईल काय, याबाबत प्रशासन लवकरच निर्णय करेल, असेही परदेशी म्हणाले. कचरा डेपोच्या जागेवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे प्रक्रिया वा कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, हे म्हणणे तितकेसे योग्य ठरणार नाही, असाही दावा त्यांनी केला.