Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जपानी कंपनीत काम करण्याची ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना संधी
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये जपानच्या टोयोटा कंपनीच्या सहकार्याने साजरा करण्यात आलेल्या ‘करीअर डे’ अंतर्गत आयटीआयच्या १३

 

विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मोटार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य जपान येथील टोयोटा मोटर्स या कंपनीच्या ‘टोयोटा टेक्नीकल एज्युकेशन प्रोग्राम’अंतर्गत मोरवाडी येथील आयटीआयमध्ये आज ‘करीअर डे’ साजरा करण्यात आला.
या अंतर्गत मेकॅनिक मोटार व्हेईकल या व्यवसायासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३५ विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा तसेच मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केली आहे. आज सायंकाळी या सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती पुणे, कोल्हापूर आणि नाशिक येथील शाखेत करण्यात आल्याचे जाहीरही करण्यात आले. पुणे आणि कोल्हापूर येथील डीएसके टोयोटा कंपनीसाठी नितीन सरोदे, पंकेश काळजे, रियाज मोमीन, दिनेश गवारी, नवनाथ पिलाणे, विशाल खंडागळे, सतीश ठुबे, शंकर चव्हाण यांची तर नाशिकच्या डीएसके वासन या कंपनीत ज्ञानेश्वर सुपे, लक्ष्मण केसरे, नागेश गवळी, अविनाश शिंगाडे, प्रवीण पवार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य विजय पायगुडे यांनी दिली.
टोयाटो कंपनी आणि पिंपरी पालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘करीअर डे’च्या उपक्रमाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती व लेखी परीक्षा आज घेण्यात आल्या. आयुक्त शर्मा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पालिका ‘आयटीआय’ चे कौतुक केले. ही नावाजलेली संस्था असून येथील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी पालिकेकडून आवश्यक ती सर्व मदत आयटीआयला करण्यात येईल तसेच जास्तीत जास्त सुविधा मनपाकडून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘प्लेसमेंट सेल’ निर्माण करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, टोयोटाचे सुधीर चौगुले, नितीन सातपुते, अतुल शहा, शिक्षणाधिकारी विष्णू जाधव, प्राचार्य विजय पायगुडे आदी उपस्थित होते.