Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

भोसरीत एका तडीपार गुंडासह दोघांचा खून
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

भोसरी-मोशी प्राधिकरण येथील पाण्याच्या टाकीजवळ आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आलेले दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यापैकी एक मृतदेह हा

 

तडीपार गुंडाचा आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बबन येळवंडे (वय २६, रा. मोई, चऱ्होली) असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतदेहाचीही एका घरफोडीच्या गुन्ह्य़ातील तो आरोपी आहे. ओळखपटली असून दुसऱ्या मृतदेहाचे वय अंदाजे २३ वर्षे आहे. गणेश येळवंडे यास २८ एप्रिल २००८ रोजी निगडी पोलिसांनी दोन वर्षांकरिता शहरातून तडीपार केले होते. तरीदेखील तो वारंवार तडीपार आदेशाचा भंग करून शहरात घरफोडी, लूटमारीचे प्रकार करीत होता. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो भोसरी पीएमटी चौकातील मजूर अड्डय़ावरून केटरिंगच्या कामासाठी मजूर म्हणून जात होता. त्याच्याविरुद्ध निगडी, चाकण, खेड पोलीस ठाण्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी पाण्याच्या टाकीजवळ दोन मृतदेह पडले असल्याची माहिती पोलिसांना दिली. दोन मृतदेह पडल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मोहन विधाते, फौजदार भागवत मरळे, पी. एम. पवार यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची मृतदेहाची निर्घृण हत्या झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी डॉ. महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कदम, किशोर जाधव यांना कळताच त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. यातील एक मृतदेह हा तडीपार गणेश येळवंडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही मृतदेहांवर धारदार शस्त्रांनी वार करून तसेच दगडाने ठेचून मारल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. मात्र, या दोघांचा खून करण्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.